शिवस्वराज्य रथयात्रा १७ जानेवारीला मालवणात
शिवप्रेमींच्या वतीने भव्य स्वागत होणार : ३५१ महिला करणार औक्षण
मालवण
‘आम्ही पुणेकर’ या जपान मधील ग्रुपतर्फे जपान टोकीयो येथे ८ मार्च रोजी छत्रपती शिवाजी महाराज यांची आठ फुटी अश्वारुढ मूर्ती उभारण्यात येणार आहे. या मूर्तीची भारतातील नऊ राज्यांमधून शिवस्वराज्य रथयात्रा निघणार असून ही यात्रा १७ जानेवारी रोजी दुपारी तीन वाजता मालवणात दाखल होणार आहे. यावेळी शिवप्रेमींच्या वतीने या यात्रेचे भव्य स्वागत करण्यात येणार असून ३५१ महिला या यात्रेचे औक्षण करणार आहेत. अशी माहिती यात्रा कार्यक्रमाच्या समन्वयक सौ. प्रीती सावंत यांनी दिली आहे.
मालवण भरड येथील हॉटेल ओऍसिस येथे आयोजित पत्रकार परिषदेत सौ. प्रीती सावंत यांनी माहिती दिली. यावेळी त्यांच्यासमवेत सिंधुदुर्ग जिल्हा पर्यटन व्यावसायिक महासंघाचे अध्यक्ष बाबा मोंडकर, सामाजिक कार्यकर्त्या सौ. शिल्पा खोत, भाऊ सामंत, भूषण साटम आदी उपस्थित होते.
जपान मध्ये स्थापन होणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मूर्तीची महाराष्ट्रसह इतर राज्यातून यात्रा काढण्यात येणार आहे. महाराष्ट्रात ही यात्रा १५ जानेवारीला सातारा येथून सुरु होणार आहे. भारत व भारताबाहेरील असा संपूर्ण ७ हजार किलोमीटर अंतराचा प्रवास करून महाराजांची मूर्ती जपान मध्ये दाखल होणार आहे. जपान मधील टोकीयो येथे या मूर्तीची ८ मार्च रोजी प्रतिष्ठापना होणार आहे. जपान मधील या सोहळ्यास राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, ज्योतीरादित्य सिंधीया, रामदास आठवले, खासदार नारायण राणे यांच्यासह अन्य नेते उपस्थित राहणार आहेत.
शिवरायांच्या या मूर्तीची यात्रा शिवरायांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या मालवण भूमीत १७ जानेवारी रोजी दुपारी तीन वाजता दाखल होणार आहे.
मालवणात ही यात्रा दाखल झाल्यावर कुंभारमाठ येथील जानकी मंगल कार्यालय नजिक असलेल्या शिवरायांच्या पुतळ्याच्या ठिकाणी यात्रेचे जंगी स्वागत होईल. तेथून ही यात्रा ढोल ताशांच्या गजरात आणि शिवप्रेमींच्या उपस्थितीत मालवण शहरातून मार्गक्रमणा करून मालवण बंदर जेटी येथे सिंधुदुर्ग किल्ल्यासमोर दाखल होईल. आमदार निलेश राणे हे या यात्रेचे प्रतिनिधित्व करतील. छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाला ३५१ वर्षे पूर्ण होत असल्याने बंदर जेटी येथे ३५१ महिला या यात्रेचे औक्षण करतील. त्यानंतर एक दिवस दर्शनासाठी शिवरायांची मूर्ती मालवणात ठेवण्यात येणार आहे. त्यानंतर ही यात्रा मालवणवरून गोव्याच्या दिशेने प्रयाण करेल, अशी माहिती यावेळी बाबा मोंडकर यांनी दिली.
जपान मध्ये टोकियो येथे वास्तव्यास असणारे आपल्या पुणे मधील हिंदू बांधव शिवस्मारक स्थापन करत आहे. त्या अगोदर अश्व रूढ महाराजांची प्रतिमा महाराष्ट्रातील प्रत्येक गड किल्ल्यावर शक्य होईल तसे रथयात्रे मार्फत दर्शनासाठी मार्गक्रमण करणार आहे. मालवण कुंभारमाठ येथे रथ यात्रेचे स्वागत करण्यासाठी जिल्ह्यातील समस्त शिवप्रेमींनी उपस्थित रहावे. असे आवाहन
प्रीती सावंत मोबा : 7588451189, सोनाली पाटकर 7498698449, नीलम शिंदे 9373771383, पूजा वेरलकर 9421236290, अमिता निवेकर 9923921507 यांसह शिवप्रेमी यांच्या वतीने करण्यात आले आहे. तरी या यात्रेत तमाम शिवप्रेमींनी सहभागी व्हावे, यात्रेचे औक्षण करण्यासाठी इच्छुक महिलांनी सौ. प्रीती सावंत (७५८८४५११८९) यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.