आयुक्त पावरा यांची तातडीने बदली करून सक्षम अधिकारी नेमण्याची सामाजिक न्याय विभाग मंत्री संजय शिरसाट यांच्याकडे निवेदनाद्वारे मागणी
कुडाळ :
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ठाकर समाजाच्या होणाऱ्या जात पडताळणी प्रक्रियेत विलंब होत असल्याच्या तक्रारी कुडाळ मालवण मतदार संघाचे आमदार निलेश राणे यांच्याकडे होत होत्या. त्यामुळं ठाकर समाजातील विद्यार्थी, लोकनियुक्त प्रतिनिधी, नोकरवर्ग यांना केवळ आर्थिक अपेक्षा ठेवून विभागीय आयुक्त दिनकर पावरा हे जाणीवपूर्वक त्रास देत होते. याबाबतची दखल घेत कुडाळ – मालवणचे आमदार निलेश राणे यांनी सामाजिक न्याय विभाग मंत्री महाराष्ट्र राज्य संजय शिरसाट यांना निवेदन दिले आहे.
त्या निवेदनात असे म्हटले आहे की, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जात पडताळणी समितीचे काम अत्यंत दिरंगाईने व अडवणुकीने सुरू असून त्याचा त्रास येथील लोकप्रतिनिधी ठाकर समाजातील विद्यार्थ्यांना व शासकीय कर्मचाऱ्यांना होत आहे. अनुसूचित जमाती प्रमाणपत्र तपासणी समिती (सह आयुक्त) कोकण विभाग दिनकर पावरा हे जाणीवपूर्वक अडवणूक करून जात वैधता प्रमाणपत्र देण्याबाबत दिरंगाई करत असल्याने त्यांच्या विरोधात अनेक तक्रारीत असून त्यांच्या या कृतीमुळे विद्यार्थ्यांच्या भविष्याचे नुकसान होत आहे. तरी अनुसूचित जमाती प्रमाणपत्र तपासणी समिती सह आयुक्त कोकण विभाग चे दिनकर पावरा यांची तातडीने बदली करून त्या ठिकाणी सक्षम अधिकाऱ्याची नियुक्ती करण्यास निर्देश द्यावे अशी मागणी कुडाळ – मालवणचे आमदार निलेश राणे यांनी निवेदनाद्वारे सामाजिक न्याय विभाग मंत्री महाराष्ट्र राज्य संजय शिरसाट यांच्याजवळ केली आहे.