You are currently viewing मालवण बांगीवाड्यात काम सुरु असलेल्या इमारतीवरून कोसळून कामगाराचा जागीच मृत्यू

मालवण बांगीवाड्यात काम सुरु असलेल्या इमारतीवरून कोसळून कामगाराचा जागीच मृत्यू

मालवण बांगीवाड्यात काम सुरु असलेल्या इमारतीवरून कोसळून कामगाराचा जागीच मृत्यू

कामगारांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर ; सखोल चौकशीची मागणी

मालवण

येथील समर्थ बिल्डर्स अँड डेव्हलपर्सच्या वतीने शहरातील बांगीवाडा येथे सुरु असलेल्या दहा मजली इमारतीत सेंटरींगचे काम करत असलेला रोहित कुमार चौधरी (वय-२८, रा. मध्यप्रदेश) हा आठव्या मजल्यावरून जमीनीवर कोसळून झालेल्या दुर्घटनेत त्याचा जागीच मृत्यू झाला. या दुर्घटनेनंतर येथे काम करणाऱ्या कामगारांच्या सुरक्षिततेचा मुद्दा ऐरणीवर आला आहे.

याबाबत येथील पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे. बांगीवाडा येथील लीलाधर सारंग यांच्या इमारतीमध्ये आज सकाळी ९ वाजता सेंटरिंगचे काम सुरु होते. यावेळी रोहित चौधरी याच्या समवेत विश्राम चौधरी मनोज चौधरी भागवत प्रसाद विश्वकर्म असे सात कामगार काम करत होते. मात्र रोहित कुमार चौधरी याने बांधलेला सेफ्टी बेल्ट काम करत असताना सुटला आणि तो आठव्या मजल्यावरुन खाली कोसळला. त्याला अन्य कामगारांनी मालवण ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. मात्र वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्याचा जागीच मृत्यू झाल्याचे स्पष्ट केले. पोलीस निरीक्षक प्रवीण कोल्हे, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक विलास टेंबुलकर यांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला.

या दुर्घटनेनंतर या इमारतीच्या बांधकामांमध्ये कामगारांच्या सुरक्षिततेकरिता असलेल्या शासनाच्या नियमावली प्रमाणे नियम पाळले जातात का ? असा प्रश्न निर्माण झाला आहे. नगरपरिषदे कडून इमारतीला परवानगी देताना कामगारांच्या सुरक्षिततेच्या अटीशर्थी असतात. त्याची संबंधितांकडून पूर्तता झाली आहे का ? याबाबत सखोल तपास करून यामध्ये त्रुटी आढळल्यास संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी होत आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा