कणकवली पर्यटन महोत्सवात अडीचशे कलाकारांचे नेत्रदीपक सादरीकरण ; ‘कनकसंध्या’तून कला, संस्कृतीचे दर्शन
कणकवली
कणकवली पर्यटन महोत्सव; अडीचशे कलाकारांचे नेत्रदीपक सादरीकरण ; ‘कनकसंध्या’तून कला, संस्कृतीचे दर्शन
कणकवली येथील पर्यटन महोत्सवातील दुसऱ्या सायंकाळी कणकवलीकरांना शहरातील अडीचशेहून अधिक कलावंतांनी ‘कनकसंध्या ‘तून भारतातील कला, संस्कृतीचे दर्शन घडवले. रंगकर्मी सुहास वरुणकर आणि प्रा. हरिभाऊ भिसे दिग्दर्शित या कार्यक्रमात उत्तर आणि दक्षिण भारतामधील संस्कृतीप्रमाणेच कोकणातील चालीरीती आणि नृत्य परंपरांचे सादरीकरण कलावंतांनी करचन रसिकांची दाद मिळवली.
गणेशवंदनाने कार्यक्रमाचा प्रारंभ झाला. यात बावल मेस्त्री यांच्यासह अन्य कलाकारांनी कालिमाता, बालाजी, पुष्पा २ आदी गाण्यांवर सादरीकरण केले. त्यानंतर विलास खानोलकर आणि प्रा. हरिभाऊ भिसे यांनी बतावणीचे सादरीकरण करत राजकीय, सामाजिक क्षेत्रातील गमती जमती रसिकांसमोर मांडल्या. तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालक आणि अभिनेत्यांनी तीन तासांच्या संपूर्ण कार्यक्रमादरम्यान कणकवली शहराचा बदलल्या राजकीय, सामाजिक विकासाचा पट उलगडून दाखवला. कलाकारांच्या मेहनतीचे यावेळी दर्शन झाले.
कार्यक्रमाच्या दरम्यान तायक्वाँदो स्पर्धेत यश मिळविलेला खेळाडू मृण्मय शिरवलकर आणि बालकलावंत सावी परब हिचा सत्कार माजी नगराध्यक्ष समीर नलावडे, माजी उपनगराध्यक्ष बंडू हर्णे, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष संदेश ऊर्फ गोठ्या सावंत आदींच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
दरम्यान, कणकवली पर्यटन महोत्सवातून स्थानिक कलाकारांना व्यासपीठ मिळाले आहे. अशा कार्यक्रमांमध्ये सातत्य राहावे, अशी मागणी स्थानिक कलाकारांनी केली.
धम्माल मालवणी नाटिकेला दाद
‘कनकसंध्या’ कार्यक्रमात मुलगी पाहायला जाणे ते विवाह सोहळ्यापर्यंतची धम्माल मालवणी नाटिका कणकवलीतील कलाकारांनी सादर केली. यातील कलावंतांच्या अभिनयाला रसिकांनीही दाद दिली. कार्यक्रमात रुचिरा वर्णे, हनीफ पीरखान, संजय राणे, खुशी आमडोसकर, गौरी कामत, दीक्षा पुरळकर, लक्ष्मी शेट्ये, स्वरा म्हाडेश्वर, शैलेश कुमार यांनी विविध बहारदार गाण्यांचे सादरीकरण केले, तर लावणी, पिंगा, वारकरी दिंडी आदींचेही सादरीकरण कलाकारांनी केले,