You are currently viewing जनतेच्या प्रश्नांचा आवाज आपण बनले पाहिजे- वैभव नाईक

जनतेच्या प्रश्नांचा आवाज आपण बनले पाहिजे- वैभव नाईक

*जनतेच्या प्रश्नांचा आवाज आपण बनले पाहिजे- वैभव नाईक*

*प्रत्येक बूथनिहाय आढावा घेऊन पक्षाची ताकद वाढवा- सतीश सावंत*

*लढाऊ कार्यकर्त्यांना प्रवाहात आणले पाहिजे- सुशांत नाईक*

*शिवसेना वैभववाडी तालुका कार्यकारिणीची बैठक संपन्न*

आमिषे सर्वांनाच येत आहेत मात्र त्या आमिषांना बळी पडावे की नाही हे आपण ठरवले पाहिजे. निष्ठावंतांना आज ना उद्या नक्की संधी मिळेल. जे कार्यकर्ते आमच्याबरोबर थांबले आहेत त्यांच्यासाठी आम्ही लढणार आहोत. जनतेचे अनेक प्रश्न प्रलंबित आहेत त्या प्रश्नांचा आवाज आपण बनले पाहिजे. चुकीच्या कामांना विरोध करण्यासाठी लोकांचे मनोधैर्य आपण वाढवलं पाहिजे. विकास कामांवर खर्च होणारा शासनाचा निधी योग्य पद्धतीने खर्च होत आहे की नाही, की त्यात भ्रष्टाचार होत आहे यावर लक्ष ठेवणे ही आपली जबाबदारी आहे. दीड वर्ष झाली गगनबावडा घाट बंद आहे. त्यावर आपण आवाज उठवला पाहिजे असे मार्गदर्शन माजी आमदार वैभव नाईक यांनी केले.

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वैभववाडी तालुका कार्यकारणीची बैठक आज वैभववाडी मध्ये डॉ बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवन येथे संपन्न झाली. यावेळी शिवसेना पदाधिकाऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.यावेळी नेत्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले.

याप्रसंगी कणकवली विधानसभा प्रमुख सतीश सावंत म्हणाले, आज आपल्याकडे सत्ता नाही म्हणून अनेकांना वाटेल की आपल्याकडून जनहिताची कामे होणार नाहीत. मात्र आपण विरोधक म्हणून चांगल्या पद्धतीने काम केले, जनतेच्या प्रश्नावर टोकाचा संघर्ष केला तर सत्ताधारी आणि अधिकाऱ्यांना आपली कामे करावीच लागतील. जनतेची दिशाभूल करण्याचा प्रयत्न होत असेल तर आपण जागरूक राहून जनतेला जागरूक करावे. प्रत्येक बूथनिहाय आढावा घेऊन पक्षाची ताकद वाढवण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करा असे सांगितले.

युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक म्हणाले, शिवसेनेने अनेक वादळी सोसली असून वेळोवेळी ती परतवून लावली आहेत. सिंधुदुर्गात पुन्हा एकदा संघटना बांधण्याचे काम आपण केले पाहिजे. आणि लढाऊ कार्यकर्त्यांना प्रवाहात आणले पाहिजे. येणाऱ्या निवडणुकांच्या अनुषंगाने आतापासूनच सर्वांनी कामाला लागा असे सांगितले.

यावेळी शिवसेना वैभववाडी तालुकाप्रमुख मंगेश लोके, लक्ष्मण रावराणे, नलिनी पाटील, सानिका रावराणे, मानसी सावंत, स्वप्निल धुरी, रोहित पावसकर, सरपंच सुनील कांबळे, सरपंच जितेंद्र तळेकर, विठोजी पाटील, सूर्यकांत परब, सुनील कांबळे, विलास पावसकर, डॉ.आर. व्ही. जाधव, राजाराम गडकर आदींसह शिवसेना पदाधिकारी व शिवसैनिक उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा