*सावंतवाडीच्या सौंदर्यावरच घातला घाला..*
*मोती तलावाचे दुर्गंधीयुक्त अशुद्ध पाणी.. रस्त्यांची दुरावस्था याला जबाबदार कोण..?*
विशेष संपादकीय…….
सावंतवाडी म्हणजे सुंदरवाडी..परमेश्वराला पडलेलं स्वप्न!
“वाडी अडकून पाडी”… असं म्हणत सावंतवाडी शहराने आपल्या अलौकिक सौंदर्याने अनेकांना सावंतवाडीत अडकून पाडलं. केवळ नोकरी निमित्त येणारे घाट माथ्यावरील लोकच नव्हेत तर जिल्ह्याच्या इतर शहर, गावांतील लोक सावंतवाडी शहराच्या प्रेमाखातर सावंतवाडीत स्थायिक होण्यासाठी येतात ही वस्तुस्थिती..! एवढं सावंतवाडी शहराचं वलय आहे परंतु का कोण जाणे..गेल्या काही वर्षात शहराच्या सौंदर्याला कुणाची तरी नजर लागली आणि शहराचे विद्रुपीकरण झाले. प्रसिद्ध मोती तलावाचे पाणी अशुद्ध, दुर्गंधीयुक्त, हिरवेगार झाले, पाण्यात शहरातील गटारांचे ड्रेनेज सोडलं गेलं, शहरातील अंतर्गत रस्ते खड्डेमय झाले किंबहुना खड्ड्यात रस्ते शोधावे लागले. पावसाळ्यात बाजारपेठ पाण्याखाली जाऊ लागली, शहर उन्हाळ्यात पाण्यासाठी तहानलेले राहू लागले… एवढी दुरावस्था झाली की लोकांनी नगरपालिकेसमोर उपोषणास बसण्याची चेतावणी दिली. त्यामुळे नक्कीच असा प्रश्न उपस्थित होतो की, “शहराच्या या दुरावस्थेला जबाबदार कोण..? पालिका प्रशासन..? नगरपलिका मुख्याधिकारी..? स्थानिक आमदार..? की स्वतः सावंतवाडीकर जनता..?”
संस्थानकाळापासून शहरातील ओढ्यांचे पाणी तलावाच्या बाहेरून नाल्याद्वारे माडखोल येथील नदीस मिळत होते. केवळ पावसाळ्यात डोंगरावरून येणारं पावसाचं पाणी आणि झर्यांचे पाझरणारे पाणी तलावात येत असायचं. घरांचे पाणी कुंपणातच जिरवले जायचे. परंतु शहराचे काँक्रेटीकरण झालं आणि टोलेजंग इमारती उभ्या राहिल्या. विकासकांना शत प्रतिशत, दुप्पट एफएसआय मिळाला. शहराचा विकास..(?) झाला आणि हा विकासच शहर भकास करण्यास कारणीभूत ठरला. कारण कमी जागेत जास्त कुटुंब वास्तव्याला आली…पण, त्यांनी वापरलेले पाणी तुटपुंज्या जागेत मुरणार कुठे..? हा प्रश्न उभा राहिला. सावंतवाडी शहराची पाण्याची पातळी जवळपास सात ते दहा फुटांवर आहे. त्यामुळे शोष खड्डे सहा फुटांचे मारले तरी वर्ष दोन वर्षात ते भरतात आणि पाणी मुरण्याची प्रक्रिया बंद होते. परिणामी इमारतींचे पाणी चोर वाटेने पाईप द्वारे गटारात, गटारातून नाल्यात आणि नाल्यातून तलावात वाहून येते. त्यामुळे तलावातील पाणी दूषित होते. त्याच पाण्यातून बंदी(??) असणाऱ्या प्लास्टिक पिशव्या, पाण्याच्या, दारूच्या बाटल्या सुद्धा वाहून येतात आणि शहरातील प्रतिष्ठित म्हणणाऱ्या लोकांची प्रतिष्ठा मोती तलावाच्या पाण्यावर तरंगताना दाखवतात.
पण….,
सावंतवाडी नगरपालिका प्रशासन काय करते..? प्रशासनाचे प्रमुख म्हणजे नगरपालिका मुख्याधिकारी केवळ खुर्ची गरम करण्याचा पगार घेतात का..?
हा प्रश्न विचारण्याचे कारण एवढेच की, “बापाचा दुर्लक्ष होतो तेव्हाच घरचा मुलगा वाह्यात निपजतो”.
मग मुलाच्या वाह्यातपणाला बाप जबाबदार तर शहराच्या दुरावस्थेला पालिकेचे मुख्याधिकारी जबाबदार म्हटले तर अयोग्य ठरू नये.
प्रशासनाचे प्रमुख म्हणून मुख्याधिकाऱ्यानी आपल्या अधिकारी वर्गाला शहरातील प्रत्येक इमारतीचा सर्व्हे करून ज्यांचे पाणी गटारात सोडले आहे त्या इमारतीच्या विकासकावर, सोसायटीवर कडक कारवाई केल्यास तलावाचे पाणी दूषित होण्याचे प्रमाण नक्कीच नगण्य होईल. परंतु इमारत बांधकाम परवानगी पासून पूर्ण झाल्याचे प्रमाणपत्र देईपर्यंत हात ओले करणाऱ्या अधिकाऱ्यांना कुठल्याही विकासकावर कारवाई करण्याची हिम्मत होत नाही. त्यामुळेच शहर विकासाच्या नावावर भकास होत असल्याचे चित्र उभे राहिले आहे.
मोती तलावात नव्याने एरिएटर बसविल्याचे आपण पाहिले आहे. कोळंबी प्रकल्पात आपण एरिएटर पाहतो, इथे हा प्रयोग पहिल्यांदाच केला आहे. गेली कित्येक वर्षे तलावाचे पाणी स्वच्छ होते त्यामुळे त्यात माशांची पैदास देखील चांगली होत होती. परंतु गेल्या काही वर्षात तलावात शेवाळाचा दाट थर पहायला मिळतो आहे, पाण्याला दुर्गंधी येते. त्याचे कारण म्हणजे पाण्यातील ऑक्सिजन पातळी कमी होते आणि तलावाचे पाणी स्थिर असल्याने त्यात शेवाळ होतो, असा तर्क काढून तलावाच्या पाण्याला हालतं ठेवण्यासाठी आणि ऑक्सिजन पातळी वाढविण्यासाठी एरियेटर बसविले आहेत. पण एवढी वर्षे त्या यरिएटरची आवश्यकता का भासली नाही..?
कारण…,
तलावात बाहेरील दूषित पाणी, संडास बाथरुमचे ड्रेनेज वाहून येत नव्हतं. नगरपालिका प्रशासनाने रोग का झाला..? त्याचे मूळ कारण शोधून त्यावर उपाययोजना न करता… रोगावर उपचार सुरू केले. होमिओपॅथी, आयुर्वेदात सुद्धा रोगाचे मूळ शोधले जाते आणि उपचार होतात पण इथे ॲलोपॅथी सारखे उपचार सुरू केले आहेत. “ताप आला द्या डोलो”.. तो का आला..? हे विचारायचं नाही. म्हणजे उपचार बंद केल्यावर काही दिवसात पुन्हा रोग डोकं वर काढणार हे निश्चित..!
नगरपालिका प्रशासनाने दूषित पाण्यावर उपचार केलेच पाहिजेत पण ते दूषित का झाले..? म्हणजे रोग कसा झाला..? त्याला जबाबदार घटक कोण..? त्या रोगाच्या मुळावर घाव घालणे आवश्यक होते.
पण.., आता तर बदकांच्या आकाराच्या पॅडलबोटी आणल्या बोटींग सफर करण्यासाठी.. पण हिरव्या दूषित पाण्यात वास घेत कोण फिरणार अर्धा तास..?
सावंतवाडीच्या गेल्या दोन तीन दशकांत बाजारपेठेतील रस्ता खड्डेमय झाला असे कुणी पाहिले नसेल.(अपवाद असेल एखादं दुसरा) पण मे २०२४ मध्ये केलेला रस्ता जुलै २०२४ मध्ये खड्डयात गेलेला पहिल्यांदाच पाहिला.
याला जबाबदार ठेकेदार असेलच..पण त्याचबरोबर १००% जबाबदार पालिका प्रशासन आणि प्रशासनाचे प्रमुख म्हणून मुख्याधिकारी स्वतः.
रस्त्यांचा दर्जा राखणे ही नगरपालिका प्रशासनाची जबाबदारी आहे. पण.., “तेरी भी चूप मेरी भी चूप ” म्हणत सर्वच अलिबाबाच्या गुहेत गेले तर दोषी जनताच ठरते कारण ती उघड्या डोळ्यांनी त्यांची कर्म पाहते पण बोलत नाही, जनतेच्या पैशांचा अपव्यय झाला म्हणून कुणालाही जाब विचारत नाही की, आंदोलन करत नाही.
“सावंतवाडी शहरातील रस्त्यांचे काम अयोग्य होते आहे, नवीन रस्त्यांवर पाणी तुंबते आहे”
अशी पेपर मध्ये बातमी आली की, त्यावर नगरपालिका कर्मचारी सांगतात..
“बातमीचा काहीही उपयोग होणार नाही..”
म्हणजे “लहरी राजा प्रजा आंधळी अधांतरी दरबार” असाच प्रकार आहे का..?
बातमीचा इम्पॅक्ट प्रशासनावर पर्यायाने मुख्याधिकाऱ्यांवर होणार नाही म्हणजे नक्की भानगड काय..? असा प्रश्न शहरातील परिस्थिती पाहिल्यावर उपस्थित होतो.
पाऊस संपल्यावर आता खराब झालेल्या रस्त्याला पुन्हा नव्याने डांबर फासण्यात आले..आणि त्यावर ग्रीट मारण्या ऐवजी धूळ मिश्रित ग्रिट मारली गेली आणि संपूर्ण बाजारपेठेत धूळधाण उडवली. अन्नपदार्थ विकणाऱ्या बेकरी मध्ये सुद्धा धुळीचे साम्राज्य पसरले. सर्वसामान्य माणूस, पादचारी, दुकानदार धुळीने माखले.
पण ही धूळ का मारली..?
हे कोडं मात्र सुटलं नाही. पहिल्या वेळी केलेले काम उच्च दर्जाचे होते तरीही वाहून गेले म्हणून पुन्हा केलेल्या कामाचा दर्जा झाकण्यासाठी डांबरवर धूळ फेकली..? की सावंतवाडीच्या जनतेच्या डोळ्यातच धूळ फेक केली..? काहीही समजायला मार्ग नाही.
सावंतवाडीत चांगलं काम झालं, केलं की त्याचे कौतुक करणारे, शहर विकासासाठी मोठा निधी आणणारे…
सावंतवाडीचे कर्तेधर्ते, जनतेचे लाडके नेते आमदार दीपक केसरकर सावंतवाडी शहराची होत असलेली दुर्दशा कधी पर्यंत शांत राहून पाहणार आहेत..? नाकर्ते अधिकारी सावंतवाडीत ठेऊन अजून किती तमाशा पाहणार आहेत..?
असे प्रश्न जनतेच्या मनात उत्पन्न होतात त्यामुळे जनतेच्या मनातील दस्तुरखुद्द केसरकरांची प्रतिमा मलिन होत चालली आहे…आणि लोक म्हणू लागलेत..
“भाई आता तरी बोला…पावले उचला”…
कोणी काही करो न करो…
जनतेने, लोकप्रतिनिधिंनी, समाज कार्यकर्ते म्हणणाऱ्या तथाकथित समाजसेवकांनी मूग गिळून गप्प न बसता हात ओले आणि खुर्च्या गरम करणाऱ्या अधिकाऱ्यांना जाब विचारला पाहिजे.. आणि दिवसाढवळ्या जनतेच्या डोळ्यात धूळ फेकणाऱ्या ठेकेदाराला रस्त्यावर आणलं पाहिजे..तरच भविष्यात मुजोर ठेकेदार आणि निर्ढावलेले अधिकारी वठणीवर येतील अन्यथा आपण निसर्गरम्य *”सावंतवाडी शहरात एक मोती तलाव होता…ज्यात कधी काळी मोती सापडले होते”* असं म्हणत पाण्याची दुर्गंधी घेत “निळे निळे पाणी” न म्हणता “हिरवे हिरवे पाणी” अशी शिकवण लहान मुलांना देत तळ्याचा काठ गरम करू…आणि रस्त्यावरच्या *”तथाकथित डांबरावर”* मारलेली धूळ खात डोळे चोळत घरी जाऊ आणि विचार करू …
*”हेच का ते परमेश्वराला पडलेलं सुंदर स्वप्न… सुंदरवाडी..?”*