*पत्रकार, लेखक, कवी सागर बाणदार लिखित अप्रतिम लेख*
*पञकारिता परमो धर्म:*
समाज विघातक घटना
छळते माझिया मना ,
अन्याय ,अत्याचाराला वाचा फोडण्या
जागी होते लेखणीतून संवेदना !
ही काव्यपंक्ती संवेदनशिलतेतून समाजपरिवर्तनासाठी मनाला निर्भिड व सडेतोड लेखणीचे सामर्थ्य देते. खरंतर प्रसारमाध्यम हे समाजपरिवर्तनाचे सशक्त माध्यम आहे.समाजातील अपप्रवृत्तींचा नायनाट करण्याच्या उद्देशाने प्रबोधन करतानाच समाज एकसंध राहून निर्भय आणि निकोप समाज निर्मिती व्हावी यासाठी वृत्तपञांची निर्भिड व निःपक्ष भूमिका नेहमीच महत्वपूर्ण राहिली आहे.स्वातंञ्यपूर्व काळापासून समाज परिवर्तनासाठी सुरू राहिलेले वर्तमानपञांचे हे कार्य आजही व्रतस्थपणे सुरूच आहे.
खींचो न कमान को
ना तलवार निकालो
जब तोफ मुकाबिल है
तो अखबार निकालो
वर्तमानपञाचा परिणाम तोफा -बंदुकाहूनही अधिक प्रभावी ठरू शकतो.नेपोलियन बोनापार्ट म्हणतो , एक हजार तलवारीपेक्षा आपल्याविरूध्द लिहिणारे एक वर्तमानपञ भयंकर आहे.यातून वर्तमानपञाची प्रचंड ताकद दिसून येते. याशिवाय मराठी वृत्तपञसृष्टीचे जनक आद्य पञकार बाळशास्ञी जांभेकर ,लोकमान्य टिळक, कृष्णराव खाडीलकर , प्र.के.अञे ,ग.गो.जाधव , डॉ.नानासाहेब परुळेकर ,जवाहर दर्डा , बाळासाहेब ठाकरे ,अरुण साधू , कुमार केतकर यांच्यासारख्या अनेकांनी वस्तुनिष्ठ निर्भिड लेखणीतून अन्याय अत्याचाराला वाचून फोडून समाजाला न्याय देण्याचे कार्य करून पञकारिता परमो: धर्म हा विचार सार्थ करून दाखविला आहे.देशाला स्वातंञ्य मिळवून देण्यात वर्तमानपञांनी बजावलेली महत्वपूर्ण भूमिका कुणालाच विसरता येणार नाही. त्यामुळेच आज देखील वर्तमानपञांकडून समाजाच्या मोठ्या अपेक्षा आहेत.समाजहिताच्या दृष्टीने राज्यकर्ते धोरणे राबविण्यात सक्षम आहेत की नाही यावर लक्ष ठेवतानाच सत्तेचा दुरूपयोग करणा-यांना कर्तव्याची जाणिव करून देण्याचे काम वर्तमानपत्राच्या माध्यमातून
पञकार करत आहेत.याशिवाय विघातक गोष्टींचा पर्दाफाश करतानाच अन्यायग्रस्तांना न्याय मिळवून देण्याची त्यांची भूमिका समाजपरिवर्तनाच्या कार्यात मोठे योगदान
देणारी आहे.असे असले तरी यामध्ये काही प्रमाणात व्यावसायिकता देखील आली आहे , हेही मान्य करावेच लागेल.वस्तुनिष्ठ बातम्या , समाजविघातक घटनांचा पर्दाफाश , विधायक उपक्रमांना पाठबळ , शासनाच्या चांगल्या धोरणांचा प्रचार आणि सामाजिक बांधिलकीचे भान कधीही सुटू न देणे या सर्व बाजू सांभाळताच व्यावसायिकता जपणे हे वर्तमानपञांच्या व्यवस्थापनाला सांभाळावे लागते.हे करत असताना वाचकांची वर्तमानपञांवरील विश्वासाहर्ता टिकून नव्हेतर ती अधिक वृद्धिंगत कशी होईल ,हे देखील तितकेच महत्वाचे ठरते.याहीपेक्षा वाचकांची अभिरुची जपताना नवे वाचक तयार करणे हे आजघडीला वर्तमानपञांसमोर मोठे आव्हान आहे.वास्तविक ,वर्तमानपञ चालवताना येणारा मोठा खर्च आणि आर्थिक सोर्स निर्माण करण्यासाठी जपावी लागणारी व्यावसायिकता आता अपरिहार्य झाली आहे.पण म्हणून काही वर्तमानपञांनी आपली समाजहिताची भूमिका सोडलेली नाही.त्यामुळेच तर आजच्या इलेक्टॉनिक व सोशल मिडियाच्या जमान्यात वर्तमानपञांचे महत्व पूर्वीइतकेच टिकून आहे.विविध क्षेत्रातील तज्ञांचे लेख , अवतीभवतीच्या घडामोडींचे सदर ,वाचकांची मते ,जागरुक नागरिकांना लिहते करणे आणि वर्तमानपञाची मुख्य भूमिका याचे मिश्रण म्हणजेच ख-या अर्थाने समाज प्रबोधनाबरोबरच समाज विकासात योगदान देण्याची ती भक्कम बाजू असते.
वाचकांना वैचारिक सकस खाद्य पुरवतानाच त्यांच्यामध्ये राष्ट्रीय व नैतिक कर्तव्याचे भान आणून देण्याचे कार्य वर्तमानपञांकडून होत असून अशा कार्याला समाजानेही पाठबळ देण्याची खरी गरज आहे.तरच आपल्या सर्वांना भविष्यातील महासत्ता भारताचे स्वप्न सत्यात उतरवता येणार आहे. याचे भान
सदैव जपता येणे आजच्या स्पर्धात्मक काळात फार कठीण असले तरी ते देशहिताच्या व्यापक दूरदृष्टीने अशक्य मुळीच नाही.पण ,याची दुसरी बाजू देश किंवा समाजहिताची बाजू घेणा-या वर्तमानपञांसह पञकारांना राजकीय नेत्यांचा ,गुंडांचा ञास होऊ यासाठी त्यांच्या पाठिशी सरकारने देखील खंबीर राहून पञकार संरक्षण कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करणे म्हणजे ख-या अर्थाने लोकशाही मजबूत करण्याचा तो चांगला व अनुकरणीय प्रयत्न असेल.जो आजच्या अस्थिर काळात लोकप्रबोधनाच्या कार्याला अधिक मजबूत करणारा व निकोप समाज निर्मितीसाठी अधिक महत्त्वाचे ठरणार आहे.
– सागर बाणदार ,
– इचलकरंजी