*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच तथा लालित्य नक्षत्रवेल समूह सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री भारती महाजन रायबागकर लिखित अप्रतिम लेख*
*ए सावित्रीमाय*
“सावित्रीमाय…ए सावित्रीमाय…
पेपर वाचत असतेस की नाही तिथे स्वर्गात तू…बघ तरी तुझ्या लेकी कशा सगळ्या दुनियेत आपला डंका वाजवताहेत ते…अगं, कशाचा म्हणुन काय विचारतेस…! एकही क्षेत्र शिल्लक ठेवले नाही तुझ्या लेकींनी पादाक्रांत करण्याचे…आहेस कुठे…! साहित्य, कला, क्रीडा, विज्ञान, अंतराळ, कम्प्युटर…काय काय म्हणून सांगु…गाड्या, ट्रक, रेल्वे चालवणे ही तर आता झाली जुनी गोष्ट…आता त्या विमान चालवताहेत…विमान… माहितीय्…शोध लावताहेत नवीन नवीन…पुरुषांच्या खांद्याला खांदा लावुन प्रत्येक क्षेत्र काबीज करायला निघाल्यात तुझ्या लेकी…अभिमानाने उर भरून येईल गं तुझा सावित्रीमाय…
अगं…आता ती फक्त नाजूक नार नाही राहिली बरं…म्हणजे सुंदर दिसणे आवडते तिला अजुनही…तो तर तिचा स्थायीभावच आहे ना…पण ती खंबीर होतेय मनाने पुरूषासारखीच…काकणभर त्याच्यापेक्षा जास्तच…सांभाळते संसाराचा डोलारा एक हाती वेळ आल्यावर…संकटांनी खचून जात नाही कधी…अगदी तुझ्यासारखीच
सावित्रीमाय…!
स्वतःबरोबर स्वतःच्या मुलांच्या प्रगतीसाठी झटतात तुझ्या लेकी…प्रसंगी स्वतःकडे दुर्लक्ष करून…मुलींनाही वाढवतात मुलांप्रमाणेच...अगं, मुलं-मुली एकसमान हा नाराच आहे बरं या युगाचा…त्यामुळे किती अग्रेसर आहेत शिक्षणात मुली…आश्चर्यच वाटेल तुला…आणि आता स्वतःच्या मुलींनाही शिक्षण देण्यासाठी जिवाचं रान करतात गं तुझ्या लेकी…वाचतेस ना तू पेपरमध्ये या बातम्या रोज…अभिमान वाटत असेल ना तुला आता आपल्या लेकींचा…सावित्रीमाय…!
ती पानभर असलेली बायकांची उघडी-वाघडी चित्रं…? च्च्…दिसलीच का तुला ती…अगं…ते कपडे फाटलेले नाहीत… मुद्दाम फाडलेले आहेत…कपडे आहेत भरपूर त्यांना…एका लुगड्यावर राहण्याचा जमाना गेला तुझ्यावेळचा… आणि डोक्यावरचा पदर…? ई…काहीतरीच काय? आता कुठल्याच कपड्याला पदर नसतो…कुठे कुठे सणावाराला नेसणाऱ्या साडीपुरताच शिल्लक राहिलाय तो…आजकालच्या शिकलेल्या पोरींची फॅशन आहे म्हणे ती…जाऊ दे ना…जरा विषयांतर होतंय…काय म्हणतेस…त्यांच्यावर संस्कार करत नाहीत आई किंवा आजी…? अगं, तूच मुलींच्या शिक्षणासाठी, उद्धारासाठी रान केलंस ना…मग त्या शिक्षणाचा उपयोग नको का व्हायला…त्यासाठी नोकरी करायला हवी…गरज नसली तरी करीअरसाठी म्हणुन आणि गरज असलीच तर…पर्यायच नाही नं…ज्या मुलांच्या भविष्यासाठी ही सारी धावपळ त्याच मुलांना पाळणाघरात ठेवावं लागलं तरीही…पाळणाघरात का म्हणून काय विचारतेस…सावित्रीमाय…?
अगं, आजी-आजोबांसाठी जागा कुठेय घरात…आणि मनातही…ते राहतात एकटेच आपल्या गावी किंवा वृद्धाश्रमात…पण ते जाऊ दे…शीण होईल तुझ्या मनाला…पण पूर्वी चुल आणि मुल सांभाळणारी स्त्री आता घराबाहेर पुरूषांच्या खांद्याला खांदा लावुन काम करतेय…घरी आल्यावर स्वयंपाक पाणी, मुलांचा अभ्यास, पै पाहुणा, घरात असतील तर सासुसासऱ्यांचे पथ्यपाणी आणि बरंच काही काही…मग हे संस्कार संस्कार म्हणतात ते दोघांनीही आपल्या वर्तणुकीतुन द्यायला नकोत का गं सावित्रीमाय…!
त्या पलीकडे बातम्या कशाच्या आहेस म्हणुन विचारतेस होय…ऊं…त्या काही विशेष नाहीत…रोजच्याच बातम्या…हुंडाबळी, स्त्रियांवरील अत्याचार…घरगुती हिंसाचार… देवदासी…आताही स्त्रियांवर अत्याचार होतोय याचं नवल वाटतंय तुला…? अगं, मुली पुस्तकी ज्ञान भरपुर शिकल्या, पण बाहेरील समाजकंटकांशी दोन हात करण्यासाठी ज्युडो कराटे सारखी विद्या शिकायलाच हवी त्यांनी…नाहीतर अत्याचाराचा सामना कसा करतील त्या…आणि पुरूषी वर्चस्वाच्या मानसिकतेबद्दल तर बोलायलाच नको… सुशिक्षित, कमावत्या स्त्रीच्या सहनशीलतेचा सुध्दा अंत बघितल्या जातो गं कधी कधी सावित्रीमाय…!
ते पलिकडे माझा नातवाच्या हातात कुठल्या भाषेचे पुस्तक आहे म्हणुन विचारतेस…? अगं, ती इंग्रजी भाषा… वाघिणीचे दूध म्हणतात तिला…तिच्या शिवाय पान हालत नाही बरं आता आमचं…शिक्षणासाठी महागड्या इंग्रजी शाळाच लागतात आता आम्हाला…मराठी शाळा बंद पडण्याच्या मार्गावर आहेत आपल्याच महाराष्ट्रात…आणि मातृभाषेचं काय…? तिचं काय…करतो ना आम्ही वर्षातले दोन चार दिवस तिच्या नावाचा जागर…साहित्य संमेलन भरवतो…२७ फेब्रुवारीला दिन पाळतो…मातृभाषेत बोलायची मात्र लाज वाटते बरं आजकाल मुलांमाणसांना…अगदी चार मराठी माणसं जरी एकमेकांशी बोलत असली तरीही…वाचणं, लिहिणं तर दूरच…अर्थात यालाही अपवाद आहेतच म्हणा…
आणि त्या आतल्या पानावरील बातम्या…? अगं…त्या ग्रामीण भागातील, वाड्या वस्त्यांवरील अडाणी, अशिक्षित मुली…आश्चर्य काय त्यात…? जिथे हातातोंडाची गाठ पडण्याचीच मुश्किल असतांना मुलंच शिकत नाहीत तिथे मुलींना शिक्षण…? रामा, शिवा, गोविंदा…पण तू नको कष्टी होऊस…नाण्याला दोन बाजु असतातच ना सावित्रीमाय…!
म्हणुनच आम्हाला आशा आहे, नक्की जन्म घेईल पुन्हा एखादी सावित्रीमाय…नव्हे…आताही तू घेतलेल्या स्त्रीशिक्षणाच्या कार्याचा तुझ्या काही काही लेकी चालवताहेत वसा…काही काही झटताहेत पतित स्त्रियांच्या उद्धारासाठीही…सामाजिक जाणीवही असते कोणाकोणाच्या मनात...सगळ्या जणी नाही तरी काहीजणी तरी तू दाखवलेल्या वाटेवरून चालताहेत हेही नसे थोडके…असं म्हणुन समाधान मानशील का तू सावित्रीमाय…?
शेवटी काय…सगळी माणसं शिकुन साक्षर, सुशिक्षित, उच्च विद्याविभुषित होतील…*पण सुसंस्कृत…?* कोणास ठाऊक…खरं ना सावित्रीमाय…!
भारती महाजन-रायबागकर
चेन्नई
३-१-२५
9763204334