कुडाळ :
देशपातळीवरील अनेक कठीण परीक्षांपैकी चार्टर्ड अकाउंट (सीए) एक कठीण परीक्षा असते. या परीक्षेमध्ये यश संपादन करणे ही मोठी गोष्ट आहे. आंदुर्ले गावची सुकन्या व सध्या मुंबई येथे वास्तव्यास असलेली मिताली हरिश्चंद्र परब हिने सनदी लेखापाल (सीए) या परीक्षेत दैदिप्यमान यश मिळविले आहे. मिताली परब ही सामान्य कुटुंबातील असून या प्रकारची कोणतीही पार्श्वभूमी नसताना जिद्द, चिकाटी व मेहनतीने तिने हे यश मिळविले आहे. त्यामुळे या क्षेत्रात प्रयत्न करणाऱ्या सामान्य कुटुंबातील विद्यार्थ्यांसाठी ही प्रेरणादायी गोष्ट आहे. प्रत्येक शैक्षणिक स्तरावर यश मिळवित असताना अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालयातून तिने भरतनाट्यम विशारद ही पदवी प्राप्त केली आहे. आपल्या यशाबद्दल बोलताना मिताली परब म्हणाली, अभ्यासात सातत्य आणि प्रयत्न करत राहणे खूप महत्त्वाचे असते हे करण्याची तुमची तयारी असेल तर कोणत्याही क्षेत्रात यश मिळविणे कठीण नाही, असे तिने सांगितले.
यावर्षी देशपातळीवर घेतलेल्या सनदी लेखा (सीए) परीक्षेचा १३.४४ टक्के एवढ्या अल्प टक्केवारीत निकाल लागला आहे. संपूर्ण देशभरातून केवळ ११५०० विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. ज्यामध्ये मिताली हिचा समावेश आहे. तिच्या घरच्यासाठी ही अभिमानास्पद गोष्ट आहे. तिचे वडील हरिश्चंद्र परब मुबंई येथील बँक ऑफ इंडिया बँकेतून सेवानिवृत झाले आहेत. तर आई हर्षिता परब गृहिणी आहे. आंदुर्ले गावचे विधीज्ञ आनंद परब यांची ती पुतणी आहे. तिच्या यशाबद्दल समाजातील सर्व स्तरातून, परब परिवार व मित्रपरिवाराकडून तिचे अभिनंदन होत आहे.