*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्मा सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री राधिका भांडारकर लिखित अप्रतिम लेख*
*पराभव*
पांडवांचा द्यूतात पराभव झाला. भर सभागृहात द्रौपदीचे वस्त्रहरण झाले. पांडवांना १२ वर्षे वनवास आणि एक वर्ष अज्ञातवास भोगावा लागला.
एका धोब्याने जानकीच्या शुध्दतेवर शंका घेतली त्यावेळी रामाला त्याच्या राजेपणाचा, लोकनायकत्वाचा पराभव वाटला असेल का? परिणामी रामाने सीतेचा त्याग केला.
मराठ्यांचा पानिपतच्या तिसऱ्या लढाईत पराभव झाला. सदाशिवरावभाऊंसारखा पराक्रमी नीतिमान योद्धा कामी आला. अहमद शहा अब्दालीनं मराठी साम्राज्याचा मोठा पराभव करून साम्राज्याची एकसंधताच नष्ट केली.
भारताला स्वातंत्र्य मिळाले पण भारत- पाकिस्तान असे देशाचे दोन तुकडे झाले. स्वातंत्र्यप्राप्तीच्या सुवर्ण क्षणाला या घटनेने कायमचा एक प्रकारे पराभवाचाच कलंक लागला. हिंदू-मुस्लीम मधली तेढ अधिकच रुंद झाली आणि त्याचे दुष्परिणाम आजही अनुभवतोय. जम्मू-काश्मीरचा प्रश्न आजही सुटलेला नाही उलट अधिकच गुंतागुंतीचा होत आहे.
हुकूमशहा हिटलरचा अखेर पराभव झाला पण विजयोन्मादात आणि सत्ता लालसेमुळे कित्येकांची हत्या झाली. ज्यूंच्या मनातील धसका आणि घृणा हा इतिहास कधीतरी पुसू शकेल का?
नेपोलियननेही वाॅटर्लुची लढाई अखेर हरली. तो बंदिवान झाला आणि कधीतरी त्याचा कैदेतच मृत्यू झाला पण दरम्यान झालेल्या हिंसाचाराची, अनेकांच्या मानसिक पडझडीची भरपाई होऊ शकेल का?
व्हिएतनामचे युद्ध वीस वर्षे चालले. अखेर अमेरिकेस माघार घ्यावी लागली. याच युद्धरुपी इतिहासाची पुनरावृत्ती आज युक्रेन-रशिया, इस्रायल आणि गाझामध्ये होत असलेली आपण अनुभवत आहोत. *बळी तो कान पिळी* याचाच प्रत्यय या युद्धातून येत असतात. युद्धात विजय कोणाचा झाला अथवा पराभव कोणाचा झाला यापेक्षाही महत्त्वाचं ठरतं ते दोन्हीकडे होत असलेलं मानवी संहाराचं, हत्याकांडाचं गणित. मनुष्यहिंसेतून नष्ट झालेल्या माणुसकीचे दमन, हनन अखेर समस्त मानव जातीला कुठे घेऊन जाणार हा विचार व्यथित करतो. एकाच वेळी विजयाचा आनंद साजरा होत असताना पराभवाच्या होळीत जळणाऱ्यांचा विचार दुर्लक्षित करता येत नाही. त्या जखमा, ते व्रण मिटत नाहीत. असे अनेक ऐतिहासिक पराभव म्हणजे कधीही न बुजणारे मानवी मनातले खड्डे आहेत. काळाने त्याच्या आठवणी पुसल्या जात असतील पण घाव मात्र तसेच राहतात.
एकंदरच मानवी जीवनात दोनच गोष्टी महत्त्वाच्या आहेत का असा प्रश्न पडतो. विजय आणि पराभव, यश आणि अपयश याच परस्परविरोधी घटकांवर जणू काही सर्व आयुष्य, आयुष्यातलं सुख, आनंद अवलंबून असल्यासारखं वाटतं.
जीवन म्हणजेच एक मोठी स्पर्धा आहे. मूळातच स्पर्धा म्हटली की दोन भिन्न विभाग आले. अलीकडचा आणि पलिकडचा अशी एक रेष आखली गेली. प्रतिस्पर्धी हा शब्द निर्माण झाला आणि त्याच शब्दाभोवती आवेशाची, चिरडण्याची, नेस्तनाबूत करण्याची, जिंकण्याची, टक्कर देण्याची, कधी तीक्ष्णपणे तर कधी सौम्यपणे.. पण एक प्रकारच्या हिंसक भावनेचा उगम झाला आणि त्यातूनच विजय आणि पराभवाची उत्पत्ती झाली.
एका लेखकांनी म्हटले आहे, “पॅव्हेलीनमध्येच आऊट व्हायचे नसते.” म्हणजे आपल्यापेक्षा आपला प्रतिस्पर्धी बलवान आहे, आपण स्पर्धा जिंकू शकत नाही या भीतीपायीच एखादा खेळाडू मैदानात जाताना आधीच आत्मविश्वास हरवलेला असतो आणि म्हणूनच तो पराभूत होतो. तो पॅव्हलीनमध्येच पराभूत झालेला असतो.
आयुष्यातलं एक सत्य नाकारता येत नाही की “स्पर्धेत उतरलेच पाहिजे” पण जोपर्यंत ही स्पर्धा खिलाडू वृत्तीने खेळली जाते तोपर्यंत यातून मिळणारे विजय आणि पराभव काहीतरी शिकवण देणारे असतात. विजयाने उन्मत्त न होता त्याच क्षणी विजय विसरून दुसऱ्या स्पर्धेची तयारी करावी आणि पराभवाने कोलमडून न जाता आपल्यातल्या त्रुटी, उणीवा भरून काढण्याचा प्रयत्न करून पुन्हा नव्याने नव्या स्पर्धेत उतरावे असा संदेश मिळतो. अशा स्पर्धा, असे विजय असे पराभव नक्कीच चांगले असतात. त्यांची मानवी मनाची सकारात्मक जडणघडण करण्यासाठी गरज असते. कुठलाही विजय अंतिम नसतो आणि कुठलाही पराभव अंतिम नसतो असा धडा यातून मिळतो पण जेव्हा राजकीय राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय, सामाजिक, कौटुंबिक स्पर्धांचा लेखाजोखा मांडला जातो आणि त्यातून जेव्हा हार जीत याची शहानिशा होते तेव्हा या स्पर्धांचे उद्दिष्ट हे केवळ एकाच अहंकारी, उन्मादता, सत्तालोलुपता, स्वार्थी वृत्ती भोवती एकवटलेले आहेत हेच जाणवतं. यात विजयी झालेले आणि पराभूत झालेले दोन्ही गट फारसा आनंद किंवा करुणा निर्माण करू शकत नाहीत. असं का हा प्रश्न तुमच्या मनात येतो का? यायला हवा कारण खूप वेळा अशा प्रकारचे विजय म्हणजे मानवी मूल्यांचा झालेला मोठा पराभवच असतो आणि तो कोणत्या तत्त्वाने भरून काढायचा हा एक अभ्यासाचा विषय ठरतो.
आई-वडिलांनी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत, अत्यंत कष्टाने, खस्ता काढून, वेळप्रसंगी स्वतःच्या पोटाला चिमटा घेऊन आपल्या मुलाला वाढविलेले असते, त्याचे संगोपन केलेले असते, त्याच्या स्वप्नपूर्तीचा पाया रचलेला असतो, त्याच्यावर संस्कार केले असतात आणि नंतर जीवनात सर्वतोपरी यश मिळवलेलं हे लाडकं अपत्य जेव्हा आई-वडिलांनाच प्रश्न करतं,” तुम्ही असं काय निराळं केलंत हो माझ्यासाठी? त्यावेळी त्या मातापित्यांना होणाऱ्या पराभवाची जाणीव किती विदारक, भयानक असेल? अशा तऱ्हेचा पराभव पचवण्याची त्यांची मानसिक समर्थता तरी असेल का? हा केवळ त्यांचाच पराभव नव्हे थर समस्त पालकत्वाचा, वात्सल्य भावनेचा, सुसंस्कारांचा, नैतिकतेचा, वैचारिक मूल्यांचा हा पराभव आहे असं नाही का वाटत तुम्हाला?
मानवाने प्रचंड विकास केलाय. बेसुमार तांत्रिक प्रगती झाली आहे, सारी जीवन पद्धती बदलली आहे, एक प्रकारचा चकचकाट, लखलखाट सर्वत्र दिसतोय पण या प्रकाशात कुठे माणूस दिसतोय का? तो हरवलाय. नाती हरवली, संवाद हरवले, एकमेकांची साथ सुटली,कुटुंब व्यवस्था कोलमडली, स्री-पुरुषाच्या नात्यात दरी निर्माण झाली. विकासाच्या विजयी महापुरात बघा कसा हा *माणूस* एकटाच भेलकांडत आहे कारण संपूर्ण निसर्ग तत्त्वाच्या, ईश्वरीय अंशाच्या श्रेष्ठत्वाशी केलेल्या लढाईत तो पार हरला आहे, पराभूत झालेला आहे. माणूसपणाच्या व्याख्येचाच हा अत्यंत दारुण पराभव आहे. विजयाचा आभासी मुलामा जेव्हा अचानक गळून पडेल ना तेव्हा त्यामागच्या रक्तरंजित पराभवाचे दर्शन किती ओंगळ असेल!
तोच विजय अलौकिक असतो जो जीवनातल्या असुरी शक्तींचा पराभव करतो.
तेव्हा वेळ आली आहे सांगायची,
“हे मानवा आता तरी जागा हो! तुझ्या पराभवांचं आणि विजयांचंही आत्मचिंतन कर.”
*राधिका भांडारकर पुणे*

