*ग्राहकाला मदत हीच खरी ईश्वर सेवा – प्रा.एस.एन. पाटील*
वैभववाडी
ग्राहक म्हणून आपण सजग असायला पाहिजे. परंतु तसे दिसत नाही. समाजातील आडल्या- नडलेल्या ग्राहकाला मदत हीच खरी ईश्वर सेवा आहे असे प्रतिपादन प्रा. एस. एन. पाटील यांनी जिल्हास्तरीय राष्ट्रीय ग्राहक दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात ग्राहक जागृती व प्रबोधनांमध्ये ग्राहक पंचायतची भूमिका या विषयावर बोलताना व्यक्त केले.
जिल्हा पुरवठा कार्यालय आणि तहसीलदार कार्यालय सावंतवाडी यांच्या संयुक्त विद्यमाने २४ डिसेंबर रोजी ३८ वा जिल्हास्तरीय राष्ट्रीय ग्राहक दिन कार्यक्रम
जिल्हाधिकारी श्री. अनिल पाटील यांच्या अध्यक्षतेखाली लतीफ बेग गार्डन हॉल कोलगांव, सावंतवाडी येथे उत्साहात संपन्न झाला. “शिवभावे जीवसेवा” या स्वामी विवेकानंदांच्या विचारधारेवर आणि ग्राहकतीर्थ बिंदुमाधव जोशी यांच्या तत्वज्ञानावर ग्राहक पंचायत महाराष्ट्र संस्थेचे कार्य चालते. प्रत्येक व्यक्ती ही ग्राहक असून आपण वस्तू किंवा सेवा खरेदी करताना ग्राहक म्हणून कायम सजग असले पाहिजे. शासकीय यंत्रणेबरोबरच ग्राहक पंचायत महाराष्ट्र सारख्या संस्था ग्राहक जागृती व प्रबोधनाचे महत्त्वाचे कार्य करीत आहेत. संस्थेच्या माध्यमातून जिल्ह्यात ग्राहक संघटन, प्रबोधन आणि मार्गदर्शन केले जाते. तसेच शाळा, महाविद्यालयात सजग विद्यार्थी ग्राहक प्रबोधन कार्यक्रम, निबंध स्पर्धा, पोस्टर स्पर्धा, ग्राहक जागृती फेरी, आँनलाईन माहितीपूर्ण व्याख्याने इत्यादी कार्यक्रम राबविले जातात. ग्राहक चळवळ ही लोकचळवळ झाली पाहिजे असे प्रा. एस. एन. पाटील यांनी सांगितले.
यावेळी व्यासपीठावर
उपवनसंरक्षक श्री. नवलकिशोर रेड्डी, प्रभारी जिल्हा पुरवठा अधिकारी श्रीम.आरती देसाई, उपविभागीय अधिकारी श्री.हेमंत निकम, सावंतवाडी तहसीलदार श्री.श्रीधर पाटील, जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोग सदस्य श्री.योगेश खाडिलकर, अन्न व औषध प्रशासनाचे विजय पाचपुते, पीएसआय माधुरी मुळीक, भारतीय मानक ब्युरोचे हेमंत चव्हाण आदी मान्यवर उपस्थित होते.
सुरुवातीला ग्राहक चळवळीचे अधिष्ठान स्वामी विवेकानंद व भारतीय ग्राहक चळवळीचे संस्थापक आणि ग्राहक संरक्षण कायद्याचे जनक ग्राहकतीर्थ बिंदुमाधव जोशी यांच्या प्रतिमांचे पूजन व दिपप्रज्वलन करून कार्यक्रमाला सुरुवात झाली.
ग्राहक हा बाजारपेठेचा राजा आहे. ग्राहकांना वस्तू निवडणे, त्याची गुणवत्ता आणि दर्जा यांचे प्रमाण जाणून घेण्याचा, माहिती मिळविण्याचा अधिकार आहे. अनेकदा खरेदी करताना ग्राहक बऱ्याच गोष्टींकडे दुर्लक्ष करतात आणि याचाच गैरफायदा विक्रेते घेतात. त्यामुळे ग्राहकाने नेहमी जागरूक राहण्याचे आवाहन जिल्हाधिकारी अनिल पाटील यांनी अध्यक्षीय भाषणात केले. डॉ. नवांगुळ यांनी वैद्यकीय क्षेत्रात होणारी फसवणूक टाळण्यासाठी ग्राहकांनी काय दक्षता घ्यावी याविषयी मार्गदर्शन केले. अन्न व औषध प्रशासनाचे विजय पाचपुते यांनी अन्न सुरक्षा व मानक कायद्याविषयी सविस्तर माहिती दिली. पोलिस प्रशासनातर्फे माधुरी मुळीक यांनी सायबर सुरक्षेविषयी विस्तृत माहिती तसेच डिजिटल अरेस्ट म्हणजे काय आणि त्याविरोधात नागरिकांनी काय करावे याविषयी मार्गदर्शन केले. जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोगाचे सदस्य योगेश खाडिलकर यांनी जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोगाची रचना व कार्यपद्धती याबाबत माहिती दिली. भारतीय मानक ब्युरोचे हेमंत चव्हाण यांनी बीएसआय व हॉलमार्क याबाबत माहिती दिली. प अशासकीय सदस्य प्रा.सुभाष गोवेकर यांनी ग्राहकांचे विविध प्रश्न सोडवण्यासाठी असणारी यंत्रणा याबाबत माहिती दिली.
राष्ट्रीय ग्राहक दिनानिमित्त ग्राहक पंचायत महाराष्ट्र जिल्हा शाखा सिंधुदुर्ग, बँक ऑफ महाराष्ट्र शाखा वैभववाडी आणि पोलीस ठाणे वैभववाडी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या जिल्हास्तरीय निबंध स्पर्धेतील विजेत्यांना रोख रक्कम,सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले.
तसेच संस्थेच्यावतीने जिल्हाधिकारी श्री. अनिल पाटील यांचा शाल, श्रीफळ व ग्रंथ भेट देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी विविध शासकीय, निमशासकीय कार्यालयाचे प्रमुख, अधिकारी, कर्मचारी, व्यापारी, विद्यार्थी व ग्राहक पंचायत महाराष्ट्र संस्थेचे जिल्हा उपाध्यक्ष सीताराम कुडतरकर, सल्लागार ॲड.समीर वंजारी, सहसंघटिका रिमा भोसले, सहसचिव सुगंधा देवरुखकर उपस्थित होते
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्र.जिल्हा पुरवठा अधिकारी श्रीम. आरती देसाई तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सावंतवाडी तहसीलदार श्रीधर पाटील यांनी केले.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी जिल्हा पुरवठा कार्यालय व तहसीलदार कार्यालय सावंतवाडी यांनी विशेष परिश्रम घेतले.