You are currently viewing २७ डिसेंबर पासून अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे भव्य कोकण प्रांत अधिवेशन सावंतवाडी सिंधुदुर्ग येथे.

२७ डिसेंबर पासून अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे भव्य कोकण प्रांत अधिवेशन सावंतवाडी सिंधुदुर्ग येथे.

२७ डिसेंबर पासून अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे भव्य कोकण प्रांत अधिवेशन सावंतवाडी सिंधुदुर्ग येथे.

१००० प्रतिनिधी येणार – प्रदेशमंत्री संकल्प फळदेसाई.

अधिवेशनाची तयारी पूर्ण, सिंधुदुर्ग जिल्ह्यात होणाऱ्या अधिवेशन अविस्मरणीय ठरणार – स्वागत समिती सचिव अतुल काळसेकर

सावंतवाडी

अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे कोकण प्रांत अधिवेशन दि २७ ते २९ डिसेंबर २०२४ या कालावधीत अहिल्याबाई होळकर नगर, भोसले नॉलेज सीटी सावंतवाडी येथे संपन्न होत आहेत. या अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर अ.भा.वि.प. चे कोंकण प्रांत मंत्री श्री संकल्प फळदेसाई व स्वागत समिती सचिव अतुल काळसेकर यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेउन या अधिवेशनाची रूपरेषा स्पष्ट केली.
यावेळी बोलताना स्वागत समिती सचिव, अतुल काळसेकर म्हणाले की, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कार्यकर्ते मागील 2 महिन्यापासून अधिवेशनाच्या तयारीसाठी झटत आहेत. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अनेक मान्यवर अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या कार्यकर्त्यांच्या पाठीमागे खंबीरपणे उभे आहेत. हे अधिवेशन सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अविस्मरणीय अधिवेशन ठरेल.
कार्यक्रमाची माहिती देताना कोंकण प्रदेश मंत्री संकल्प फळदेसाई म्हणाले की, दि. २६ डिसेंबर रोजी सायंकाळी ६.०० वाजता आचार्य बाळशास्त्री जांभेकर प्रदर्शनीचे उद्घाटन ठाणे जनता सहकारी बॅंकेचे अध्यक्ष आणि संमेलनाच्या स्वागत समितीचे उपाध्यक्ष शरद गांगल यांचे हस्ते करण्यात येणार आहे. विद्यार्थी परिषदेच्या ७५ वर्षांच्या कारकीर्दीचा मागोवा या प्रदर्शनीमध्ये मांडण्यात येणार आहे. तसेच सिंधुदुर्गातील पर्यटन स्थळे, कला, लोकजीवन आणि विविध वस्तु यांचा सुद्धा या प्रदर्शनी मध्ये समावेश असेल.
या अधिवेशनाचे उद्घाटन पुण्यश्लोक बापुसाहेब महाराज सभागृहामध्ये दि. २७ डिसेंबर रोजी सकाळी ११.१५ वाजता करण्यात येणार आहे. अधिवेशनाचे उद्घाटन विद्यापीठ अनुदान आयोगाचे सचिव प्रा. मनिष जोशी यांचे हस्ते होणार आहे. यावेळी कार्यक्रमाला प्रमुख अतिथी मत्स्यव्यवसाय व बंदरे विकास मंत्री नितेश राणे असणार आहेत.
या अधिवेशनामध्ये अभाविप : परिवर्तनकारी छात्र आंदोलन, आनंदमय सार्थक छात्र जीवन, विकसित कोकण आणि समृदध कोकण ही भाषण सत्रे होणार आहेत. तसेच विविध प्रस्तावांवर चर्चा करून प्रस्ताव संमत केले जातील.
या अधिवेशनाच्या निमित्ताने दि. २८ डिसेंबर रोजी सांयंकाळी ४ वाजता राजवाड्यापासून भव्य शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. ही शोभायात्रा शहरामध्ये प्रमुख रस्त्यांवरून जात गांधी चौक येथे पोचल्यावर तेथे सायंकाळी जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले आहे. या जाहीर सभेमध्ये प्रमुख वक्ता अभाविपच्या राष्ट्रीय मंत्री कु. शिवांगी खरवाल, दिल्ली ह्या मार्गदर्शन करणार आहेत.
या अधिवशेनामध्ये तीन परिसंवाद होणार असून त्यामध्ये दि. २७ डिसेंबर रोजी विद्यापीठ अनुदान आयोगाचे सचिव प्रा.मनिष जोशी यांच्या उपस्थितीत “नवीन शैक्षणिक धोरण” या विषयावर होणार आहे. यामध्ये कोकण प्रांतातील महाविद्यालयाचे प्राचार्य आणि प्राध्यापक उपस्थित राहणार आहेत.
दि. २८ डिसेंबर रोजी कोकण सागरी सीमा सुरक्षा या परिसंवादामध्ये अनिकेत कोंडाजी, रविकिरण तोरसकर, ह्यांच्या सह या विषयात अभ्यास असणारे तज्ञ उपस्थित रहाणार आहेत. तसेच “ समृद्ध कोकण – विकसित कोकण” या विषयावर दुसरा परिसंवाद होईल. यामध्ये प्रा. मंदार भानुशे, गुरु राणे, श्रीकृष्ण परब, सुनिल उकीडवे, मनिष दळवी असे तज्ञ व्यक्ती या परिसंवादात सहभागी होणार आहेत. या परिसंवादात व्यापार उद्योग आवश्यक सुविधा, शेती, बांबु / फळ प्रक्रिया, बँकिंग व नविन तंत्रज्ञान या विषयांवर चर्चा करण्यात येणार आहे.
तसेच या अधिवेशनामध्ये दि. २९ रोजी अभाविप पूर्व कार्यकर्त्यांचे संमेलन होणार आहे. या संमेलनाला माजी मंत्री विनोदजी तावडे, माहिती तंत्रज्ञान व सांस्कृतिक कार्य मंत्री आशिष शेलार, अभाविप चे राष्ट्रीय सह संघटनमंत्री देवदत्त जोशी हे उपस्थित राहणार आहेत.

या पत्रकार परिषदेला संकल्प फळदेसाई, स्वागत समिती सचिव अतुल काळसेकर आणि व्यवस्था प्रमुख चिन्मयी खानोलकर हे उपस्थित होते

प्रतिक्रिया व्यक्त करा