You are currently viewing उमेश साळगावकरांच्या निधनाने कुटुंबीयांसह मित्रपरिवार शोकाकुल..

उमेश साळगावकरांच्या निधनाने कुटुंबीयांसह मित्रपरिवार शोकाकुल..

*उमेश साळगावकरांच्या निधनाने कुटुंबीयांसह मित्रपरिवार शोकाकुल..*

सावंतवाडी:

सावंतवाडी शहरातील जयप्रकाश चौकातील श्री गुरू वॉच कंपनीचे मालक उमेश साळगावकर (वय ५२) यांचे अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले आणि त्यांच्या कुटुंबीयांसह मित्र परिवारावर जोरदार आघात झाला. वयाच्या दहा बाराव्या वर्षापासून सावंतवाडी शहरातील जयप्रकाश चौकातील श्री गुरु वॉच कंपनी या घड्याळाच्या दुकानात ते वडील आप्पा साळगावकर यांच्या सोबत व्यवसायात हातभार लावत होते. मिलाग्रीस हायस्कूल मधून इंग्रजी माध्यमातून त्यांचे दहावी पर्यंतचे शिक्षण झाले होते. राजकारण हा त्यांचा आवडीचा विषय, त्यामुळे राजकारणात देखील ते सक्रिय असायचे. सावंतवाडी शहरातील मुख्य चौकात घड्याळाचे दुकान असल्याने येणारा जाणारा प्रत्येकजण त्यांचा मित्र होता. लहान असो किंवा थोर त्यांच्या मैत्रीत वयाचे बंधन कधीच नव्हते. राजकारण्यांसह व्यावसायिक, वकील, पोलीस, महसूल खात्यातील अनेक अधिकारी, कर्मचारी यांच्याशी त्यांचे सलोख्याचे आणि मैत्रीपूर्ण संबंध होते. त्यामुळेच उमेश साळगावकर यांच्या निधनाची बातमी पसरताच अनेकांनी शोकाकुल होऊन त्यांच्या घरी धाव घेत अंत्यदर्शन घेतले.
उमेश साळगावकर जवळपास गेले अडिज महिने कोल्हापूर येथील खाजगी रुग्णालयात उपचार घेत होते. काही दिवस उपचार घेतल्यानंतर त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला होता. दरम्यान त्यांना पक्षाघाताचा झटका आल्याने पुन्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यानंतर मात्र अनेक दिवस उपचार सुरू असूनही त्यांनी उपचाराला प्रतिसाद दिला नाही आणि त्यांची प्रकृती खालावत गेली. अखेरीस २४ डिसेंबरच्या रात्री कोल्हापूर येथील रुग्णालयातच त्यांनी अखेरचा श्वास घेतला. जयप्रकाश चौकात प्रत्येकाला हक्काने हाक मारणारा, स्वतःचे दुकान बंद ठेवूनही कित्येकांच्या मदतीला धावून जाणारा, श्रीदत्तगुरुंचा निस्सीम भक्त, मैत्रीतला हिरा उमेश साळगावकर आज आपल्यात नाही ही कल्पनाच कित्येकांना करवत नाही. २५ डिसेंबर रोजी दुपारी १२ वाजता सावंतवाडीच्या उपरल स्मशानभूमीत अत्यंत शोकाकुल वातावरणात त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी समाजातील प्रत्येक स्तरातील मान्यवर, उमेश यांचा मित्र परिवार आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगी, आई, भाऊ असा परिवार आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा