You are currently viewing ‘राष्ट्रीय ग्राहक दिन’ उत्साहात संपन्न

‘राष्ट्रीय ग्राहक दिन’ उत्साहात संपन्न

‘राष्ट्रीय ग्राहक दिन’ उत्साहात संपन्न

ग्राहकाने जागरुक असावे –  जिल्हाधिकारी अनिल पाटील

  •  ऑनलाईन खरेदी करातना सावधानता बाळगा
  • फसवणूक झाल्यास ग्राहक मंचाकडे तक्रार करा

सिंधुदुर्गनगरी 

 ग्राहक हा बाजारपेठेचा राजा आहे. ग्राहकांना वस्तू निवडणे, त्याची गुणवत्ता आणि दर्जा यांचे प्रमाण जाणून घेण्याचा, माहिती मिळविण्याचा अधिकार आहे. अनेकदा खरेदी करतांना किंवा सर्विसेसचा वापर करतांना ग्राहक बऱ्याच गोष्टींकडे दुर्लक्ष करतात आणि याचाच गैरफायदा विक्रेते घेतात त्यामुळे ग्राहकाने नेहमी जागरुक राहण्याचे आवाहन जिल्हाधिकारी अनिल पाटील यांनी केले.

राष्ट्रीय ग्राहक दिनाच्या निमित्ताने जिल्हा पुरवठा कार्यालय आणि तहसिलदार कार्यालय सावंतवाडी यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हास्तरीय कार्यक्रम सावंतवाडी येथे आयोजित करण्यात आला होता त्यावेळी ते बोलत होते. यावेळी उपवनसंरक्षक नवलकिशोर रेड्डी, प्रभारी जिल्हा पुरवठा अधिकारी श्रीमती आरती देसाई, उपविभागीय अधिकारी हेमंत निकम, तहसिलदार श्रीधर पाटील, एस.एम. पाटील, श्री गोवेकर, श्री खाडीलकर, डॉ. नवांगुळ, आदी उपस्थित होते.

कार्यक्रमांच्या वेळी स्वामी विवेकानंदांच्या प्रतिमेबरोबरच भारतीय ग्राहक चळवळीचे प्रणेते व ग्राहक संरक्षण कायद्याचे जनक ग्राहकतीर्थ बिंदुमाधव जोशी यांच्याही प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यावेळी तज्ज्ञांनी ग्राहकांनी खरेदी करताना काय काय काळजी घ्यावी याविषयी मार्गदर्शन केले.

श्री पाटील म्हणाले, कोणतीही वस्तु खरेदी करताना ग्राहकाने चौकस असावे.  ग्राहकाने कोणतीही वस्तु खरेदी करण्यापूर्वी त्या वस्तुची उत्पादन तारीख, बॅच क्रमांक आणि एक्सापायरी कधीची आहे हे तपासणे आवश्यक  आहे. विशेषत: खाद्यपदार्थ खरेदी करताना अधिक सजग आणि जागरुक राहणे आवश्यक आहे. अनेकदा एक वस्तू खरेदी करा आणि दुसरी मोफत मिळवा, एखाद्या वस्तुवर ५० टक्के सवलत अशा जाहिराती दाखवून ग्राहकांची फसवणूक केली जाते. त्यामुळे ग्राहकांनो वस्तू खरेदी करताना कुठल्याही अमिषाला बळी न पडता खरेदी करावी. खरेदी करताना त्या वस्तुची गुणवत्ता आवर्जुन तपासा. खरेदी केल्यावर बिल आवश्यक घ्या जेणेकरुन फसवणूक झाल्यास तक्रार करण्यासाठी बिल सादर करावे लागेल असेही ते म्हणाले.

प्रास्ताविक श्रीमती देसाई म्हणाल्या राष्ट्रीय ग्राहक दिन हा दरवर्षी २४ डिसेंबर रोजी भारतात साजरा केला जातो. इ.स. १९८६ साली २४ डिसेंबर या दिवशी ग्राहक हक्क कायद्याला भारताच्या राष्ट्रपतींनी मंजूरी दिली होती. तेव्हापासून २४ डिसेंबर हा दिवस राष्ट्रीय ग्राहक दिन म्हणून साजरा केला जातो. हा कायदा अस्तित्वात यावा यासाठी अनेक संस्था आणि कार्यकर्त्यांनी परीश्रम घेतले.  ग्राहक संरक्षण कायद्यानुसार प्रत्येक भारतीय ग्राहकाला  हक्क मिळाले. सध्या ऑनलाईन खरेदीचे युग आहे. त्यामुळे ऑनलाईन वस्तु खरेदी करताना आपली फसवणूक होऊ नये म्हणून आपण जागरुक राहावे. ग्राहकांची फसवणूक रोखण्यासाठी जिल्हा ग्राहक मंच, ग्राहक न्यायालय आणि जिल्हा तक्रार निवारण ही प्रणाली कार्यरत आहे या प्रणालीचा लाभ घ्यावा असेही त्या म्हणाल्या.

            तहसिलदार श्री पाटील यांनी या दिवसाचे महत्व सांगितले. प्रत्येक व्यक्ती हा ग्राहक असतो. त्यामुळे प्रत्येक ग्राहकाला माहिती जाणुन घेण्याचा अधिकार आहे. ऑनलाईन वस्तूंची खरेदी करताना ग्राहकांनी सावधानता बाळगायला हवी. फसवणूक झाल्यास ग्राहकांनी ग्राहक न्यायालय किंवा जिल्हा ग्राहक मंचाकडे तक्रार करावी. सर्वसामान्य नागरिकांशी अर्थात ग्राहकांशी संबंधित विविध क्षेत्रातील तज्ज्ञांना आज आमंत्रित करून हा दिवस साजरा करण्यात येतो जेणेकरुन ग्राहक संरक्षण कायद्याचा खरा उद्देश सफल होण्यास मदत होते असेही ते म्हणाले. डॉ नवांगुळ यांनी वैद्यकीय क्षेत्रात होणारी फसवणूक टाळण्यासाठी ग्राहकांनी काय दक्षता घ्यावी याविषयी मार्गदर्शन केले.

            श्री विजय पाचपुते यांनी अन्न सुरक्षा व मानक  कायद्याविषयी सविस्तर माहिती दिली. तसेच दैनंदिन जीवनात वावरताना दूध, मावा, पेढा, मिठाईमधील भेसळ कशी ओळखावी याविषयी माहिती दिली. विष प्रादुर्भाव आणि विषबाधा यामधील फरक देखील त्यांनी सोप्या भाषेत समजावून सांगितला.

            यावेळी पोलिस प्रशासनातर्फे सायबर सुरक्षेविषयी विस्तृत माहिती दिली. ऑनलाईन खरेदी करताना घ्यावयाची काळजी, डिजिटल ॲरेस्ट म्हणजे काय आणि त्याविरोधात नागरिकांनी काय करावे याविषयी मार्गदर्शन केले.

प्रतिक्रिया व्यक्त करा