You are currently viewing चौके येथे मंगळवारी रात्री घराला लागलेल्या आगीत होरपळून एकाचा मृत्यू

चौके येथे मंगळवारी रात्री घराला लागलेल्या आगीत होरपळून एकाचा मृत्यू

चौके येथे मंगळवारी रात्री घराला लागलेल्या आगीत होरपळून एकाचा मृत्यू

मालवण

चौके स्थळकरवाडीतील एका घरातील पडवीला मंगळवारी रात्री 10 वाजण्याच्या सुमारास आग लागल्याने घरात वास्तव्यास असलेले दीपक सखाराम परब (बावकर) वय 55 यांचा आगीत होरपळून दुर्दैवी मृत्यू झाला.

चौके स्थळकरवाडीत राहणारे दीपक सखाराम परब (बावकर) हे गावात मोलमजुरी करून आपला उदरनिर्वाह करत होते. गेली बरीच वर्षे पत्नी आणि मुलांपासून बाजूला राहून घराच्या मागील पडवीत अलिप्त राहत होते. मंगळवारी रात्री नेहमीप्रमाणे आपल्या घरी असताना अचानक घराच्या मागील पडवीत आग लागून घराने पेट घेतला.


यावेळी आजूबाजूच्या घरातील लोकांनी पडवीचा दरवाजा उघडण्याचा प्रयत्न केला. मात्र, दरवाज्याला आतमधून कडी असल्यामुळे आणि आगीने मोठा पेट घेतल्याने दरवाजा उघडता आला नाही. पडवीतून आगीचे लोळ बाहेर येत होते. याबाबत चौके पोलीस पाटलांना कल्पना देण्यात आली.

पोलीस पाटलांनी घटनास्थळी येऊन मालवण पोलीस ठाण्याशी संपर्क साधत घटनेची माहिती दिली. आग आटोक्यात येत नसल्याने अखेर मालवण नगरपालिका अग्निशामक दलाला पाचारण करण्यात आले. सुमारे तासभर पाण्याचा मारा करून आग विझवण्यात आली. यानंतर पडवीत पूर्णपणे जळलेल्या अवस्थेतील दीपक यांचा मृतदेह स्थानिकांच्या मदतीने बाहेर काढण्यात आला. पुढील कार्यवाहीसाठी रुग्णवाहिकेद्वारे मृतदेह मालवण ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आला.

या वेळी घटनास्थळी मालवण पोलीस निरीक्षक प्रवीण कोल्हे, पोलीस कॉन्स्टेबल जानकर, प्रतीक जाधव, महादेव घागरे, हेमंत पेडणेकर, चौके पोलीस पाटील रोहन चौकेकर उपस्थित होते. आग नेमकी कशी लागली, हे समजू शकले नाही. पुढील तपास मालवण पोलीस करत आहेत.

या वेळी प्रीतम गावडे, मंदार गावडे, बंड्या गावडे, प्रतीक गावडे, मोहन गावडे, भाई गावडे, प्रवीण गावडे यांच्यासह अनेक युवकांनी व ग्रामस्थांनी आग विझवण्यासाठी धाव घेतली. जळालेल्या दीपक (बावकर) यांचा मृतदेह बाहेर काढण्यासाठीही सहकार्य केले. दीपक परब यांच्या पच्छात पत्नी, दोन मुलगे, बहिणी असा परिवार आहे. त्यांच्या निधनाची बातमी समजताच सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

 


प्रतिक्रिया व्यक्त करा