You are currently viewing गॅस पाईपलाईन टाकण्याचे काम निकृष्ट पद्धतीने

गॅस पाईपलाईन टाकण्याचे काम निकृष्ट पद्धतीने

कुडाळचे नगरसेवक गणेश भोगटे यांचा आक्षेप

कुडाळ

कुडाळ शहरात एमएनजीएल कंपनीकडून गॅस पाईपलाईन टाकण्याचे काम निकृष्ट पद्धतीने सुरू आहे. यामध्ये नगरपंचायत प्रशासन व सत्ताधारयांनी वरातीमागून घोडे नाचविण्याचा दिखावूपणा केला आहे, असा आरोप शिवसेना नगरसेवक गणेश भोगटे यांनी केला आहे. या कामाचे योग्य नियोजन संबंधित ठेकेदाराने केले नसल्याने नागरिकांना त्याचा त्रास सहन करावा लागत आहे, याकडेही त्यांनी लक्ष वेधले आहे.
कुडाळ न. पं. हद्दीमध्ये एमएनजीएल कंपनीमार्फत गॅस पाईपलाईन टाकण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. नागरिक व प्रवासी यांच्याकडे दुर्लक्ष करून केलेले काम अतिशय निकृष्ट पद्धतीने केले जात आहे. भैरव मंदिराकडून या कामाची सुरुवात होऊन रस्त्याच्या बाजूला गटार खोदाई होऊन करण्यात आलेल्या निकृष्ट कामाबाबत शिवसेनेने आवाज उठविला होता.

नळयोजनेची पाईपलाईन फोडली गेली

हे काम करीत असताना कुडाळ न. पं. च्या नळयोजनेची पाईपलाईन फोडली गेली. त्यामुळे नागरिकांना पाणी टंचाईला सामोरे जावे लागेल, अशी परिस्थिती निर्माण होऊ नये, याचीसुद्धा न. पं. ने खबरदारी घेतली पाहिजे. भैरव मंदिर व शिवाजीनगर येथे काम सुरू होऊन एवढे दिवस झाल्यानंतर सत्ताधारी व न. पं. प्रशासनाला सहा जानेवारीला गॅस पाईप टाकण्याची कामाची पद्धत या संदर्भात शंकानिरसनासाठी बैठकीचे खास नियोजन करावे लागले. या बैठकीला संबंधित ठेकेदाराला बोलावण्यात आले होते.
बैठक घेण्याची गरज काय?
मुळात कामच निकृष्ट पद्धतीने होत असताना याबाबत एका महिन्यानंतर बैठक घेण्याची गरज काय?, असा सवाल भोगटे यांनी केला आहे. गॅस पाईपलाईन टाकताना सर्वांना विश्वासात घेऊन काम करणे गरजेचे होते. पंधरा ते वीस दिवस निकृष्ट काम सुरू असताना कोणत्याही प्रकारची काळजी घेण्यात आली नाही. रस्त्यातील धूळ तसेच ठिकठिकाणी पसरविण्यात आलेल्या खडीमुळे प्रवासी व नागरिकांना सातत्याने त्रासाला सामोरे जावे लागले. कोटयवधीचा पैसा याठिकाणी खर्च करण्यात आला. पण येथे तंत्रज्ञ नाही. पोटठेकेदार कार्यरत आहे. त्याचा मनमानी कारभार सुरू आहे, असा आरोप भोगटे यांनी केला आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा