मालवणकडे येणाऱ्या खासगी बसला मध्यरात्री आग ; बस जळून खाक
सुदैवाने ३४ प्रवासी बचावले, मात्र सामान जळाले ; मुंबई गोवा महामार्गावर कोलाड येथे दुर्घटना
मालवण
मुंबईतून मालवणकडे येणाऱ्या मालवण येथील खापरोबा ट्रॅव्हल्सच्या खासगी एसी स्लीपर बस ला मुंबई गोवा महामार्गावर कोलाड इथे अचानक लागलेल्या आगीत ही बस जळून खाक झाली. रात्री १२ वाजण्याच्या सुमारास ही दुर्घटना घडली. या बसमध्ये ३४ प्रवासी होते. सुदैवाने यात कुठलीही जीवीतहानी झाली नाही. मात्र बससह प्रवाशांचे सर्व सामान जळून खाक झाले
मालवण येथील खापरोबा ट्रॅव्हल्सची एसी स्लीपर कोच बस मुंबईतील जोगेश्वरी येथून मालवणकडे निघाली होती. कोलाड रेल्वे पुलाजवळ बस आली असता बसच्या मागील बाजूस मोठा आवाज झाला. तेव्हां चालकाने गाडी थांबवून पाहिले असता बसने मागील बाजूस पेट घेतल्याचे दिसले. तातडीने बसमधील सर्व प्रवाशांना खाली उतरवण्यात आले. त्यानंतर आगीचा भडका उडाला. धाटाव एमआयडीसी, दीपक नायट्रेट कंपनी यांचे अग्नीशमन दल, कोलाड रेस्क्यू टीम आणि पोलीस यांनी बचावकार्य केले व आगीवर नियंत्रण आणले. बसमध्ये चालक आणि क्लिनरसह ३४ प्रवासी होते. यात कोणालाही दुखापत झाली नाही.