अशी पाखरे येती आणि स्मृती ठेवुनी जाती. एका कवीने येथे फार यथार्थ लिहिले आहे. काही माणसे आपल्या जीवनामध्ये येतात. त्यांच्या आत्म्यियता पूर्ण जिव्हाळा पूर्ण वागणुकीमुळे ती आपल्या हृदयात कायमची जाऊन बसतात. त्यांचा हसरा चेहरा चेहऱ्यावरचा प्रसन्न भाव आणि परोपकाराची प्रगल्भता ही आपल्या हृदयावर कायमची कोरली जातात.. अशी माणसे जास्ती नसतात. मोजके असतात.श्री रवींद्र जाधव यांना मी त्यामध्ये समाविष्ट करतो. एवढ्या मोठ्या पदावर राहूनही या माणसाला कधी अहंकार शिरला नाही .कधी मोठेपणा वाटला नाही. आज-काल अर्ध्या हळकुंडाने पिवळे होणारे खूप लोक आहेत. लहान लहान पदावर काम करणारे माणसे देखील मोठा दिमाख दाखवितात. पण देशातील सर्वोच्च पदावर असलेल्या महामहीम राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांचे विशेष कार्यकारी अधिकारी म्हणून काम करणाऱ्या जाधव साहेबांना कधीच गर्वाचा अहंकाराचा स्पर्श देखील झाला नाही .
त्यांचा माझा परिचय खूप वर्षापासूनच्या. माझे व्याही श्री प्रदीप वानखडे व श्री रवींद्र जाधव हे एका शाळेमध्ये शिकले. त्या शाळेचे नाव शासकीय विद्यानिकेतन. ही शाळा तेव्हा चिखलदरा येथे होती. अतिशय आदर्श होती. जाधवसाहेब मला सांगायचे या शाळेमध्ये शिकत असताना आम्हाला शिस्त लागली. बरीचशी कामे विद्यार्थ्यांना करावी लागत होती. स्वयंपाकासाठी जंगलातून लाकडे आणणे. फरशा साफ करणे आणि आळीपाळीने मुलांना जेवण वाढणे. चिखलदरा हे एक हिल स्टेशन म्हणून चांगले आहे. परंतु राहण्याच्या दृष्टीने सोयीचे नाही. जाधवसाहेब जेव्हा या शाळेमध्ये शिकत होते तेव्हा तर चिखलदरा विकसित झाला नव्हता. येथे पाऊस खूप असतो. त्यामुळे कपडे वाळत नाहीत. घराबाहेर पडता येत नाही आणि कपड्यांमध्ये ओलसरपणा राहिल्यामुळे विविध प्रकारचे आजार होण्याची शक्यता असते. पण जाधव साहेबांनी हे सर्व सहन केले व आपले शिक्षण पूर्ण केले. त्या विपरीत परिस्थितीवर मात करून त्यांनी आपले पाय पक्के केले .
ते राष्ट्रपतींचे विशेष कार्यकारी अधिकारी असताना माझी सौभाग्यवती सौ विद्या काठोळे अमरावतीच्या तपोवन येथील महामना मालवीय विद्यालयाची ट्रीप घेऊन राष्ट्रपती भवनात राष्ट्रपती भवन पहावयास गेली. श्री रवींद्र जाधव साहेबांचा परिचय असल्यामुळे मी त्यांना तशी कल्पना दिली. तपोवन हे कुष्ठधाम. ज्या आई-वडिलांना कुष्ठरोग आहे त्यांची मुले या शाळेमध्ये शिकतात. तिथे शिक्षक देखील मिळत नाहीत अशी तेव्हा परिस्थिती होती. पण विद्याचे वडील स्वातंत्र्यसंग्राम सैनिक आजोबा स्वातंत्र्य संग्राम सैनिक त्यामुळे ती तपोवनमध्ये टिकली आणि रमली. राष्ट्रपती भवनामध्ये जाधवसाहेबांनी सर्व मुलांचे मनापासून स्वागत केले आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे त्यांनी तपोवनतील त्या अनाथ आई-वडील कुष्ठरोगी असलेले आहे अशा मुलांना सुग्रास जेवण दिले. हा किती मोठा आनंदाचा क्षण. योगायोगाने माझे कर्नल जावई सारंग वानखडे आणि माझी डॉक्टर कन्या प्राचीपण या मुलांना दिल्ली दाखविण्यासाठी राष्ट्रपती भवनात आले होते. जेवण झाल्यानंतर सर्व मुलांचा राष्ट्रपतींबरोबर फोटो काढण्यात आला. या सर्व कामात जाधव साहेब आम्हाला परिवारातील सदस्यासारखे वाटले असे विद्या मला सांगत होती.
एकदा आम्ही मित्रमंडळी जम्मू-काश्मीरला निघालो होतो. दिल्लीत एक दिवस मुक्काम होता. माझ्याबरोबर रिलायन्स उद्योग समूहाचे श्री देवेंद्र खडसे होते . ते म्हणाले आपल्याला राष्ट्रपती भवन पाहायचे आहे. सर तुमचे जाधवसाहेब तर मित्र आहेत. त्यांना फोन करा आणि राष्ट्रपती भवन पाहण्याची परवानगी मिळवा. खरं म्हणजे राष्ट्रपती भवन पाहायचं म्हणजे रिससर परवानगी घ्यावी लागते आणि ती आधी घ्यावी लागते. मला ते नियमबाह्य काम करावेसे वाटले नाही. पण मित्रांचा खूपच आग्रह वाढला. त्यामुळे मी नाईलाजाने थोड्याशा संकोचाने जाधवसाहेबांना फोन केला. आणि आम्हाला राष्ट्रपती भवन पाहायचे आहे असे सांगितले. त्यांनी लगेच येण्यास सांगितले. राष्ट्रपती भवनाच्या पहिल्या दारापासून शेवटच्या दारापर्यंत आम्ही येत असल्याच्या सूचना जाधवसाहेबांनी तेथील पोलीस अधिकाऱ्यांना दिलेल्या होत्या. त्यामुळे आमचे प्रत्येक पोलीस अधिकाऱ्याने स्वागतच केले. आम्ही राष्ट्रपती भवनात पोहोचलो. राष्ट्रपती भनवनात जाधव साहेबांनी मनापासून स्वागत केले. मी पूर्व सूचना न देता आलो त्याबद्दल दिलगिरी व्यक्त केली. जाधवसाहेब म्हणाले चांगले लोकांचे राष्ट्रपती भवनात नेहमीच स्वागत असते. आणि तुम्ही तर माझे जवळचे मित्र आहात. त्यांनी आम्हाला राष्ट्रपती भवन दाखविण्याची व्यवस्था केली आणि राष्ट्रपती भवन पाहणे झाल्यानंतर त्यांनी आम्हाला भरपेट अल्पोपहार दिला. खरं म्हणजे त्यांच्याकडे येणारे जाणारे खूप लोक होते. पण असे असतानाही जाधव साहेबांनी आम्हाला खूप वेळ दिला. आमचे मित्र प्रसन्न झाले. अगदी वेळेवर राष्ट्रपती भवन पाहायला मिळाल्याबद्दल त्यांनी आनंद व्यक्त केला व जाधव साहेबांचे आभार मानले.
आम्ही श्री संत गाडगेबाबा यांच्या जीवनावर क्रांतीयोगी हे नाटक बसविले होते. अमरावतीला सर्व कलाकारांना एकत्र करणे त्यांच्याकडून रंगीत तालीम करून घेणे व नाटकाचा प्रयोग श्री संत ज्ञानेश्वर सांस्कृतिक भवनमध्ये सादर करणे ही तारेवरची कसरत. शिवाय नाटक म्हणजे खर्चाची बाब. पण श्री रवींद्र जाधवसाहेब हे त्यावेळी अमरावतीला जिल्हाधिकारी म्हणून कार्यरत होते .आम्ही त्यांना भेटलो. ते म्हणाले काही काळजी करू नका. मी पूर्ण मदत करतो .त्यांच्या मदतीमुळे क्रांतीयोगी गाडगेबाबा हे नाटक रंगमंचावर अवतरले. जाधव साहेब केवळ अमरावतीचाच प्रयोग करून थांबले नाहीत. तर त्यांनी त्यांच्या सन्मित्र श्री अरुण कुमार डोंगरे यांना दारव्हा येथे देखील या नाटकाचा प्रयोग लावायला सांगितले.
दरवर्षी जानेवारी महिन्यामध्ये शासकीय विद्यानिकेतनच्या माजी विद्यार्थ्यांचा मेळावा आयोजित करण्यात येतो. मी शासकीय विद्यानिकेतनचा विद्यार्थी नाही .तरीपण साहेब अमरावतीला जिल्हाधिकारी असताना ते आवर्जून मला त्या कार्यक्रमाला बोलवायचे .ते म्हणायचे तुमच्यासारखा लेखक माणूस आमच्याबरोबर असला पाहिजे. त्यांच्या पुढाकाराने आम्ही चिखलदरावरून अमरावतीला स्थलांतर झालेल्या शासकीय विद्यानिकेतनमध्ये वेगवेगळे उपक्रम सातत्याने मिशन आयएएस अंतर्गत राबवले.
जाधव साहेबांची अमरावती वरून बदली झाली आणि त्यांच्या जागेवर नवीन जिल्हाधिकारी म्हणून डॉ पुरुषोत्तम भापकर हे रुजू होणार होते. मी जाधव साहेबांना भेटावयास गेलो. नेमके त्याच वेळेस पुरुषोत्तम भापकर हे जिल्हाधिकारीपदाचा चार्ज घेण्यासाठी आले होते. जाधव साहेबांनी माझ्यासमोरच पुरुषोत्तम भापकर यांना जिल्हाधिकारी पदाचा चार्ज दिला. त्यांच्या केबिनमध्ये जाधव साहेब मी व पुरुषोत्तम भापकर हे आम्ही तिघेजण होतो. जाधव साहेबांनी भापकर साहेबांचा माझा परिचय करून दिला. परिचय करून देताना ते म्हणाले भापकरसाहेब काठोळे हे लष्कराच्या भाकरी भाजणारे व्यक्तिमत्त्व आहे. घरावर तुळशीपत्र ठेवून हे काम करतात. या दोन शब्दांमध्ये त्यांनी माझ्या व्यक्तिमत्त्वाला शब्दबद्ध केले होते आणि ते यथार्थ होते. खऱ्या अर्थाने सामाजिक काम करण्यासाठी आम्ही खरोखरच घरावर तुळशीपत्र ठेवले आहे. आणि ते जाधव साहेबांसारखे अधिकारी बरोबर टिपतात.