मोरगाव बागवाडी येथे विहिरीत पडून बिबट्याचा मृत्यू
दोडामार्ग : प्रतिनिधी
मोरगाव – बागवाडी येथील अर्जुन मोरजकर यांच्या शेत विहिरीत मृत बिबट्या आढळून आला. पिण्याच्या पाण्यासाठी त्याने विहिरीत उडी मारली असावी असा अंदाज वनविभागाने व्यक्त केला विहिरीला भरपूर पाणी असल्याने बिबट्या पाण्यात बुडून गुदमरून त्याचा मृत्यू झाला वनविभागाने घटनास्थळी दाखल होत पंचनामा केला पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी शिवविच्छेदन केल्यानंतर मृतदेह दहन करण्यात आला
याबाबत अधिक माहिती अशी की, मोरगाव – बागवाडी येथे अर्जुन मोरजकर यांची घरापासून सुमारे ४०० मीटर अंतरावर शेत विहीर आहे. शुक्रवारी सकाळी विहिरीतून दुर्गंधी येत असल्याने त्यांनी पाहणी केली असता बिबट्या मृतावस्थेत निदर्शनास आला. त्यांनी याबाबतची माहिती वनविभागाला दिली. वनविभागाचे अधिकारी व कर्मचारी यांनी स्थानिकांच्या मदतीने बिबट्याला विहिरीतून बाहेर काढले. घटनास्थळाचा पंचनामा करून पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी मृत बिबट्याचे शवविच्छेदन केले. त्यानंतर सदर मृत बिबट्याला दहन करण्यात आले.
सदर कार्यवाही जिल्हा उपवनसंरक्षक नवकिशोर रेड्डी यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक वनसंरक्षक वैभव बोराटे, नेहा वानरे, दोडामार्ग वनक्षेत्रपाल वैशाली मंडल, खडपडे वनपाल किशोर जंगले, मणेरी वनपाल संग्राम जीतकर, वनरक्षक सुबोध नाईक, उमेश राणे, विश्राम कुबल, प्रकाश गवस, बाळकृष्ण सावंत, संतोष शेटकर यांच्या पथकाने केली. पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. अस्वले, डॉ. तिकरे, डॉ. कऱ्हाळे, डॉ. ढवळे, डॉ. सावंत यांनी शवविच्छेदन केले. विहिरीत पडल्याने पाण्यात गुदमरून बिबट्याचा मृत्यू झाला असावा असा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात आला.