You are currently viewing वाचनावर व लेखनावर प्रेम करणारा अधिकारी : शेखर गायकवाड

वाचनावर व लेखनावर प्रेम करणारा अधिकारी : शेखर गायकवाड

 

शासकीय मराठी अधिकाऱ्यांचे पहिले राज्यस्तरीय मराठी साहित्य संमेलन पुणे महानगरपालिकेच्या सहकार्याने येत्या 20 21 व 22 डिसेंबर रोजी पुणे येथील बालगंधर्व रंगमंदिर येथे होत आहे. या शासकीय मराठी अधिकाऱ्यांच्या मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष सुप्रसिद्ध सनदी अधिकारी श्री शेखर गायकवाड आय ए एस यांचा रसिक वाचकांना परिचय करून देत आहोत.

 

पुणे:

पुणे येथे येत्या 20 21 22 डिसेंबर 2024 रोजी पहिले राज्यस्तरीय शासकीय मराठी अधिकारी मराठी साहित्य संमेलन संपन्न होत आहे. या कामी पुणे महानगर पालिकेचे आयुक्त माननीय श्री राजेंद्र भोसले यांनी पुढाकार घेतला आहे. एका महानगरपालिकेने पुढाकार घेऊन आपले रसिकत्व सिद्ध केले आहे.या संमेलनाच्या अध्यक्षपदी सुप्रसिद्ध सनदी अधिकारी व पुणे येथे असलेल्या यशदा या शिखर संस्थेच्या अतिरिक्त महासंचालकपदी विराजमान असलेले मा.श्री शेखर गायकवाड यांची निवड झाली आहे. या ना त्यानिमित्ताने श्री शेखर गायकवाड यांची माझी बरेच वेळा भेट झाली. चर्चा झाली. त्यातून मी त्यांचे व्यक्तिमत्व शब्दबद्ध करण्यासाठी हा शब्द प्रपंच केलेला आहे. मुख्यमंत्र्यांचा उप सचिव राहिलेला हा माणूस. साखर आयुक्त. सांगलीचे जिल्हाधिकारी अशा विविध पदावर काम करून आज ते यशदा या पुणे येथील शिखर संस्थेच्या अतिरिक्त महासंचालक पदी विराजमान झालेले आहेत. श्री शेखर गायकवाड हे जेव्हा मा. मुख्यमंत्र्यांचे उप सचिव होते तेव्हा मी त्यांना भेटावयास मंत्रालयात गेलो होतो. माझ्या शेतकऱ्यांची मुले झालीत कलेक्टर या पुस्तकामध्ये त्यांच्यावर मी लेख लिहिला होता.ती पुस्तके मी त्यांना सप्रेम भेट देण्यासाठी गेलो होतो.मा.मुख्यमंत्र्यांचा उपसचिव किती व्यस्त असतो. असे असतानाही श्री शेखर गायकवाड यांनी मला भरपूर वेळ दिला.आम्ही चालवत असलेल्या मिशन आयएएस या चळवळीवर चर्चा झाली आणि मी त्यांना अमरावतीला येण्याचे आश्वासन दिले. पुढे नागपूर येथील महाराष्ट्र शासनाचे हिवाळी अधिवेशन आले. याच दरम्यान 14 ते 20 डिसेंबर या कालावधीत आमची श्री संत गाडगेबाबा व्याख्यानमाला अमरावतीला श्री संत गाडगेबाबा मंदिराच्या परिसरात असते. मी श्री शेखर गायकवाड यांना फोन केला आणि त्यांना अमरावतीला व्याख्यानमालेमध्ये एक पुष्प गुंफण्याची विनंती केली.त्यांनी ती मान्य केली आणि ते त्याप्रमाणे अमरावतीला त्यांच्या राजपत्रित मित्रांसह आले.

आम्ही त्यांच्या जेवणाचे नियोजन आतिथ्य ह्या मराठमोळ्या विदर्भाची चव असलेल्या उपहारगृहात केले होते. आमचे विनायकराव तायडे नावाचे नातेवाईक आहेत. त्यांचे हे हॉटेल. या हॉटेलमध्ये चुलीवर स्वयंपाक केला जातो. आणि सर्व वैदर्भीय पदार्थ येथे भेटतात. तेथील जेवण घेतल्यानंतर गायकवाड सर मला म्हणाले नरेशजी मी खूप मोठ्या मोठ्या हॉटेलमध्ये जेवण केले आहे .पण या हॉटेलमध्ये जेवण करताना जो आनंद आला .तो यापूर्वी कधीच आला नाही.

सर साखर आयुक्त असताना मी पुण्याला त्यांना भेटायला गेलो. माझ्याबरोबर माझे मित्र प्रा. प्रवीण विधळे हे होते.मी सरांना जेव्हा भेटलो तेव्हा तेव्हा त्यांनी मला त्यांची पुस्तके आमच्या मिशन आयएएसच्या अकादमीच्या ग्रंथालयासाठी सप्रेम भेट दिलेली आहेत. पुण्याला साखर आयुक्त असताना शिवाजीनगर येथील कार्यालयात आम्ही गेलो की आमच्या साहित्यिक व सामाजिक विषयावर चर्चा होत होत्या. मागे दोन वर्षांपूर्वी श्री शेखर गायकवाड हे पुणे येथील यशदा या शिखर संस्थेच्या अतिरिक्त महासंचालक पदी रुजू झाल्याचे त्यांचे जिवलग मित्र व आमचे देखील जिवलग मित्र श्री रंगनाथ नाईकडे यांनी मला सांगितले.मी श्री रंगनाथ नाईकडे यांना फोन केला .तेव्हा ते आणि गायकवाडसाहेब सोबतच होते.नाईकडे सरांनी मला यशदामध्ये भेटावयास बोलाविले. त्याप्रमाणे आम्ही सरांना भेटावयास गेलो.त्यांनी आमचे खूप चांगले स्वागत केले आणि संपर्कात राहण्यासाठी सांगितले. खरं म्हणजे एवढ्या मोठ्या पदावर असणारा हा माणूस .साधासुधा लोक माणसांमध्ये मिसळणारा .तसेच लोकांना समजून त्यांच्या अनुकूल त्यांना समजणारे लेखन करणारा अधिकारी म्हणून मी त्यांचा उल्लेख करेल. त्यांनी जी पुस्तके लिहिलेली आहेत ती पुस्तके सर्वसामान्य माणसाला दिलासा देणारी आहेत. त्यांच्या ज्ञानात भर टाकणारी आहेत.त्याच्या मनातील अज्ञान दूर करणारी आहेत. अगदी सोप्या सुलभ भाषेमध्ये त्यांनी जे लेखन केले आहे ते लेखन आपल्याला बरीच काही माहिती तर देतेच पण त्याचबरोबर त्या पुस्तकांमध्ये असलेला लेखकाचा भाव देखील आपल्या हृदयपलटावर कोरून जातो. खरं म्हणजे मुख्यमंत्र्यांचे उपसचिव साखर आयुक्त सांगलीचे जिल्हाधिकारी आणि आता यशदाचे अतिरिक्त महासंचालक या महत्वपूर्ण पदावर असताना त्यांनी आवर्जून लेखनासाठी वेळ काढलेला आहे. या व्यस्त अधिकार पदाच्या कार्यातून वेळ काढणारा हा अधिकारी असामान्य आहे आणि म्हणूनच संयोजन समितीने एका अभ्यासू सामाजिक बांधिलकीची जाण असणाऱ्या व खऱ्या अर्थाने लेखन करणाऱ्या एका चांगल्या अधिकाऱ्याची अध्यक्षपदी निवड करून त्यांना न्याय दिलेला आहे. या तीन दिवसीय साहित्य संमेलनामध्ये महाराष्ट्रातीलच नव्हे तर महाराष्ट्र बाहेरील सनदी व राजपत्रित अधिकारी पुणे येथील बालगंधर्व रंगमंदिरामध्ये एकत्र येऊन आपले साहित्य रसिकांसमोर मांडणार आहेत.चर्चा विचार विनिमय होणार आहे.मराठी अधिकारी साहित्य संमेलनाच्या निमित्ताने एकत्र येण्याचा हा पहिलाच प्रसंग आहे. ही कल्पना ज्यांच्या हृदयात सर्वप्रथम अवतरली त्यांचे अभिनंदनच करावे लागेल. श्री शेखर गायकवाड या संवेदनशील अधिकारी व लेखकाची या संमेलनाच्या अध्यक्षपदी निवड करून मराठी अधिकारी साहित्य संमेलनाने आपला मनाचा मोठेपणा दर्शविला तर आहेच. पण त्याचबरोबर एका चांगल्या अधिकाऱ्याचे साहित्यिक म्हणून मूल्यांकन देखील केलेले आहे.कोण्यातरी लेखकाने म्हटले आहे की कोणत्याही देश तिथल्या राजकारणी लोकांमुळे ओळखल्या जात नाही तर तो ओळखला जातो त्या त्या देशातील साहित्यिकांमुळे. आणि हे खरेच आहे .आपण रशियाला ओळखतो ते मॅक्सिम गॉर्कीमुळे. अमेरिकेला ओळखतो ते शेक्सपियरमुळे. आणि भारताची ओळख आहे ती श्री रवींद्रनाथ टागोर त्यामुळे .ह्या आमच्या मराठी अधिकाऱ्यांनी घेतलेला मराठी अधिकारी साहित्य संमेलन हा उपक्रम निश्चितच अभिनंदनास पात्र आहे.मराठी अधिकारी मंडळींनी साहित्याच्या निमित्ताने एकत्र येणे व साहित्यावर चर्चा करणे हा दुग्धशर्करा योग आणून एक सुवर्णमध्य साधला आहे.या संमेलनाला व या संमेलनाचे अध्यक्ष असलेल्या श्री शेखर गायकवाड यांना हार्दिक शुभेच्छा. त्यांच्या मनातून सनदी अधिकारी असल्याचा अहंकार केव्हाच गळून पडलेला आहे. खरंच असे सनदी अधिकारी फार कमी असतात. अशा ह्या सामाजिक बांधिलकीच्या सनदी अधिकाऱ्याला व लेखकाला आमचा हा मानाचा मुजरा.

======================

*प्रा. डॉ. नरेशचंद्र काठोळे*

संचालक मिशन आयएएस

अमरावती कॅम्प

9890967003

प्रतिक्रिया व्यक्त करा