स्वाधार योजनेअंतर्गत अर्ज करण्यास 31 डिसेंबरपर्यंत मुदतवाढ
सिंधुदुर्गनगरी
सन 2024-25 या शैक्षणिक वर्षाकरिता अनुसूचित जाती व नवबौध्द प्रवर्गातील विद्यार्थ्यांना भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेचा लाभ घेण्यासाठी ऑनलाईन अर्ज करण्यास दि. 31 डिसेंबर 2024 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. पात्र विद्यार्थ्यांनी https://hmas.mahait.org या पोर्टलवरती अर्ज भरावेत, असे आवाहन समाज कल्याण कार्यालयाचे सहाय्यक आयुक्त संतोष चिकणे यांनी केले आहे.
जिल्ह्यामधील महाविद्यालयात इ.11 वी व 12 वी तसेच इयत्ता 12 वी, व 12 वी नंतरच्या व्यावसायिक, बिगर व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी अनुसूचित जाती व नवबौध्द प्रवर्गातील विद्यार्थ्यांकडून सन 2024-25 या शैक्षणिक वर्षासाठी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेचा लाभ घेणेविषयीचे अर्ज ऑनलाईन पध्दतीने भरण्यासाठी दिनांक 16 डिसेंबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आलेली होती. तथापी, या योजनेबाबत जास्त प्रमाणात अनु.जाती प्रवर्गातील विद्यार्थ्यांनी अर्ज नोंदणी न केल्याने अशा विद्यार्थ्यासाठी 31 डिसेंबरपर्यत मुदतवाढ देण्यात आलेली आहे.
स्वाधार योजनेचा लाभ घेण्यासाठी अटी व शर्ती या प्रमाणे आहे. विद्यार्थी हा महाराष्ट्र राज्याचा रहिवाशी असावा. विद्यार्थी हा अनुसूचित जाती व नवबौध्द प्रवर्गातील असावा, महाविद्यालयातील इ.11 वी, 12 वी तसेच 11 वी व 12 वी नंतरच्या व्यावसायिक, बिगर व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी प्रवेशित असावा. विद्यार्थ्यास मागील अभ्यासक्रमास 50 टक्यापेक्षा जास्त गुण असावेत. दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी ही मर्यादा 40 टक्के इतकी राहील.
तरी गरजू विद्यार्थ्यांनी भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेचे अर्ज ऑनलाईन पध्दतीने भरुन सदर अर्जाची PDF व शैक्षणिक आवश्यक कागदपत्रांसह 31 डिसेंबर2024 पर्यंत नजीकच्या मुलांचे, मुलींचे शासकीय वसतिगृह, महाविदयालय व सहायक आयुक्त, समाज कल्याण, सिंधुदुर्ग कार्यालय, येथे समक्ष, टपालव्दारे परिपूर्ण अर्ज सादर करावेत.
संबंधित महाविदयालयांनी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेबाबत पात्र विदयार्थ्यांना योजनेचा लाभ घेण्याबाबत कळविण्यात यावे. अधिक माहितीसाठी सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण कार्यालय, सिंधुदुर्ग (०२३६२-२२८८८२) यांच्या कार्यालयाशी संपर्क साधावा.