जिल्हा कोषागार कार्यालयात पेन्शनर्स डे संपन्न
सिंधुदुर्गनगरी
पेन्शनर्स डे साजरा करण्याच्या निमित्ताने निवृत्तीवेतनधारकांशी संवाद साधता आला. पेन्शनर्सना सर्व निवृत्तीवेतन विषयक लाभ यापुढेही नियमित देण्यासाठी जिल्हा कोषागार कार्यालय प्रयत्तशील राहील असे प्रतिपादन अप्पर कोषागार अधिकारी (निवृत्तीवेतन) संजय घोगळे यांनी केले. जिल्हा कोषागार कार्यालयात आलेल्या पेन्शनर्स डेच्या कार्यक्रमात प्रमुख वक्ते म्हणून ते बोलत होते. कोषागार आणि निवृत्तीवेतनधारक ऋणानुबंध या विषयाच्या माध्यमातून त्यांनी निवृत्तीवेतनधारकांशी संवाद साधला.
पेन्शनर्स डे च्या निमित्ताने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. काव्यरंग या कार्यक्रमात राजेंद्र कदम, मनोहर सरमळकर, नंदकिशोर गंगावणे, प्रभाकर तेली या निवृत्तीवेतनधारकांनी कविता सादर केल्या. तर निवृत्तीवेतनधारकांचे मनोगत या सत्रात अनेक निवृत्तीवेतनधारकांनी जिल्हा कोषागार कार्यालयाच्या कामाविषयी समाधान व्यक्त केले. तसेच या निमित्ताने निवृत्तीवेतनधारकांचा मेळावाही आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्यात निवृत्तीवेतनधारकांच्या समस्यांचे निराकरण करण्यात आले. मागील मेळाव्याच्या इतिवृत्ताचे वाचन उपलेखापाल ज्ञानेश्वरी जाधव यांनी केले. एचडीएफसी पेन्शन सोल्युशन विभागीय प्रमुख गौकरण गुप्ता यांनी “निवृत्तीनंतरची गुंतवणूक” या विषयावर मार्गदर्शन केले.
यावेळी अप्पर कोषागार अधिकारी वैशाली राणे, अप्पर कोषागार अधिकारी सुषमा खराडे, निवृत्तीवेतनधारक संघटनेचे जिल्हाध्यक्ष मनोहर आंबेकर आणि स्टेट बैंक ऑफ इंडिया, सिंधुदुर्गनगरीचे शाखा व्यवस्थापक रोहित सोनकवडे, एचडीएफसी पेन्शन सोल्युशनचे पदाधिकारी त्रिभुवन गुप्ता, प्रमोद पाटील, स्वप्नील महाडिक तसेच जिल्ह्यातील निवृत्तीवेतनधारक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
उपस्थितीत निवृत्तीवेतनधारकांचे स्वागत श्रीमती मंजिरी शेडगे व अमितकुमार सनये यांनी केले तर सुत्रसंचालन श्रीमती सायली खांडेकर यांनी केले, आभार प्रदर्शन राजेश चव्हाण यांनी केले.