You are currently viewing कणकवलीत ९ जानेवारीपासून पर्यटन महोत्‍सवाचे आयोजन – समीर नलावडे

कणकवलीत ९ जानेवारीपासून पर्यटन महोत्‍सवाचे आयोजन – समीर नलावडे

कणकवलीत ९ जानेवारीपासून पर्यटन महोत्‍सवाचे आयोजन – समीर नलावडे

फुड फेस्टिव्हलसह सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल…

कणकवली

शहरातील उपजिल्‍हा रूग्‍णालयासमोरील पटांगणात ९ ते १२ जानेवारी या कालावधीत भव्य पर्यटन महोत्‍सव होणार आहे. यात इंडियन आयडॉल विजेता ऋषी सिंग, सायली कांबळे, नितीनकुमार या नामवंत गायकांचा सहभाग असलेली संगीत रजनी, भाऊ कदम, कुशल बद्रिके यांची कॉमेडी, कणकवलीतील अडीचशेहून अधिक कलाकारांचा सांस्कृतिक कार्यक्रम, फुड फेस्टिव्हल, भव्य शोभायात्रा आदी कार्यक्रमांची मांदियाळी असणार आहे अशी माहिती कणकवलीचे माजी नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी दिली.

श्री.नलावडे म्‍हणाले, दरवर्षी आम्‍ही कणकवली नगरपंचायतीच्यावतीने पर्यटन महोत्‍सव आयोजित करतो. गेली दोन वर्षे नगरपंचायतीवर प्रशासकीय राजवट असली तरी आम्‍ही कॅबिनेट मंत्री नितेश राणे यांच्या माध्यमातून पर्यटन महोत्‍सवाचा उपक्रम सुरू ठेवला आहे. यंदाही तेवढ्याच जल्‍लोषात कणकवली पर्यटन महोत्‍सव होणार आहे.

महोत्‍सवाचा शुभारंभ ९ जानेवारीला होईल. यात सायंकाळी चार वाजता शहरातील सर्व सतरा प्रभागांतून कणकवली बाजारपेठ मार्गे महोत्‍सव स्थळापर्यंत भव्य शोभा यात्रा निघणार आहे. त्‍यानंतर सायंकाळी साडे सहा वाजता फुड फेस्टिव्हलचे उद्घाटन होईल. तर रात्री नऊ वाजता कॅबिनेट मंत्री नितेश राणे यांच्या हस्ते महोत्‍सवाचा शुभारंभ होणार आहे. महोत्‍सव कार्यक्रमानंतर अभिनेते भाऊ कदम, कुशल बद्रिके यांच्यासह अन्य कलाकारांचा सहभाग असलेला ‘जल्‍लोष’ हा कॉमेडी शो आणि ऑर्केस्ट्रा असा कार्यक्रम होणार आहे.

१० जानेवारीला कणकवली शहर आणि परिसरातील अडीचशेहून अधिक कलावंतांचा सहभाग असलेला ‘आम्‍ही कणकवलीकरांचा’ सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहे. रंगकर्मी हरिभाऊ भिसे, संजय मालंडकर, आणि सुहास वरूणकर दिग्दर्शित असलेला हा तीन तासाचा कार्यक्रम रात्री सात वाजता सुरू होणार आहे.

११ जानेवारीला रात्री आठ वाजता ‘बेधूंद’ म्‍युझिकल नाईट हा कार्यक्रम होणार आहे. १२ जानेवारीला माजी मुख्यमंत्री आणि खासदार नारायण राणे यांच्यासह अन्य मान्यवरांच्या उपस्थितीत पर्यटन महोत्‍सवाचा समारोप होणार आहे. यावेळी कॅबिनेट मंत्री नितेश राणे, आमदार निलेश राणे यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित राहणार आहेत. समारोप कार्यक्रमानंतर नामवंत गायक, कलाकार यांचा सहभाग असलेला भव्य संगीत रजनीचा कार्यक्रम होणार आहे. याखेरीज रिल्‍स स्पर्धाही होणार आहे. तसेच अन्य सांस्कृतिक कार्यक्रमांची रूपरेषा पुढील कालावधीत जाहीर केली जाणार असल्‍याची माहिती श्री.नलावडे यांनी दिली. त्‍यांच्यासोबत उपनगराध्यक्ष बंडू हर्णे, शहराध्यक्ष अण्णा कोदे, राजा पाटकर उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा