You are currently viewing सातेगावचे वैभव – प्रा. एस पी कासट 

सातेगावचे वैभव – प्रा. एस पी कासट 

अमरावती शहरात एक काळ असा होता की त्या काळात त्या त्या विषयाचा प्राध्यापक संपूर्ण शहरात ओळखल्या जात होता. त्यांच्या नावावर कॉलेजेस चालायचे. जसे भारतीय महाविद्यालय म्हटले की प्राध्यापक बी जी कडू. अमरावतीचे केशरबाई लाहोटी महाविद्यालय म्हणजे तेव्हाचे राज महाविद्यालय म्हणजे प्राध्यापक एस पी कासट. श्री शिवाजी कला वाणिज्य महाविद्यालय म्हटले की प्रा.वा.सी. काळे असे समीकरण ठरून गेले होते. ही प्राध्यापक मंडळी आपापल्या महाविद्यालयामध्ये प्रामाणिकपणे शिकवित होती. विद्यार्थ्यांना खऱ्या अर्थाने घडवित होते. यांचे नियमित पिरेड केले तर शिकवणी वर्ग लावण्याची गरज नव्हती. याच प्राध्यापकांच्या श्रृंखलेमध्ये एक नाव आहे ते प्राध्यापक एस पी कासट यांचे. कासट अमरावती जिल्ह्यातील अंजनगाव सुर्जी तालुक्यातील सातेगाव या गावचे. कासट परिवारामुळे माझ्या आयुष्याचे सोने झाले. प्राध्यापक कासट यांचा जसा शिकवविण्यावर हातखंडा होता तेवढ्याच त्यांचा वाचनाचा छंद सामाजिक कार्याचा छंद आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे प्रत्येकाला वाढदिवसाच्या दिवशी फोन करण्याचा छंद तेव्हाही होता. आजही आहे आणि उद्याही राहिलच. माझ्या वाढदिवसाला एक जुलैला कदाचित माझ्या नातेवाईकाचा फोन नाही येणार. पण कासट सरांचा फोन आला नाही. असे आजपर्यंत तरी झाले नाही आणि होणारही नाही. ते वाणिज्य शाखेला शिकवीत होते आणि मी कला शाखेचा विद्यार्थी. पण आमचे समीकरण काही वेगळेच होते. माझे वडील सातेगावला कासट परिवारात घरगडी म्हणून काम करीत होते. पण तेव्हाचा काळ वेगळा होता. कासट सरांचे वडील परसरामजी कासट व कासट सरांची आई भागीरथी भाई कासट यांनी माझ्या वडिलांना पारिवारिक सदस्य करून टाकले होते. कासट सरांची आई भागीरथीबाई माझ्या वडिलांना राखी बांधायच्या. कासट परिवारामध्ये माझे वडील विठ्ठल मामा म्हणून परिचित होते. त्यांचे किती ऋणानुबंध असतील की जेव्हा परसरामजी कासट अमरावतीच्या सक्कर साथ येथील निवासस्थानी वारले तेव्हा शेवटचे पाणी माझ्या वडिलांनी त्यांना पाजले होते. वडील जाताना प्राध्यापक एस पी कासट यांना सांगून गेले होते. या विठ्ठलमामाला तुझ्या कॉलेजमध्ये नोकरी लावून घेशील. प्राध्यापक एस पी कासट सरानी तो शब्द पाळला. बाबांना श्रीमती केशरबाई महाविद्यालय मध्ये त्यांनी चपराशी म्हणून लावून घेतले. पगार २५ रुपये. तेव्हा शब्दाला किंमत होती. कासट सरांच्या शब्दावर बाबांना नोकरी मिळाली. राहिला राहण्याचा प्रश्न. अगोदर जिथे केशरबाई लाहोटी महाविद्यालय म्हणजे तेव्हाचे राज महाविद्यालय भरत होते. त्या अगोदर तिथे श्री गणेशदास राठी छात्रालय समितीचे वस्तीगृह होते. ते वस्तीगृह तेथून कलेक्टर ऑफिसच्या बाजूला गेले होते. त्या वस्तीगृहाची भोजन कक्षाची इमारत आमच्या ताब्यात आली.

प्राध्यापक एस. पी. कासट आणि आम्ही त्यांच्याबरोबर असल्यामुळे आम्ही त्यांच्याकडे जाणे आणि ते आमच्याकडे येणे हे समीकरण जुळून आले होते. पुढे आम्ही लक्ष्मी नगरला राहायला गेलो. तरी देखील तिथे येणे जाणे असायचे. प्रत्येक वेळेस ते माझी आवर्जून चौकशी करायचे. काय लिहित आहेस. काय वाचत आहेस. याची ते सतत चौकशी करीत राहायचे. मला प्रोत्साहन देत राहायचे.

खरं म्हणजे मारवाडी परिवार किंवा गुजराती परिवार किंवा शिंन्धी परिवार साधारणतः व्यवसाय करतात. पण प्राध्यापक एस पी कासट सरानी ज्ञानदानाचा चांगला मार्ग निवडला आणि तो आपल्या नावलौकिकाने व शैक्षणिक कौशल्याने नावारूपासही आणला. यांचे कितीतरी विद्यार्थी आज प्राध्यापक झाले आहेत. व्यावसायिक झालेले आहेत. तेव्हा प्राध्यापक जीव तोडून शिकवित होते. विद्यार्थीही त्याच जोमाने शिकत होते. आता हे चित्र राहिलं नाही. त्याचे वाईट वाटते. कासट परिवारातील कासट सरांचे बंधू नवलकिशोरजी हरिनारायण बाबुशेठ शांताराम संतोष आणि भगिनी सरला हा आमचा असा परिवार आहे. कासट सरांनी आमच्यावर जी माया केली आहे त्यामुळे मी आणि माझी बहीण शोभा रोकडे आम्ही तर चांगलेच झालो. पण आमचे इतर बंधू आमच्या इतर भगिनी देखील चांगल्या स्थिरसावर झाल्या आहेत. त्यांनी केलेल्या शैक्षणिक कार्यामुळे श्रीमती केशरबाई लाहोटी महाविद्यालय आज कितीतरी मोठ्या स्वरूपात नावारूपास आले आहे. आज सर ८७ वर्षाचे झालेले आहेत. तरीही त्यांच्या कार्याची गती तीच आहे. वडील श्री परसरामजी कासट वारल्यानंतर श्री नवल किशोरजी आणि प्राध्यापक कासट यांनी आपल्या सर्व बंधूंना स्थिरस्थावर केले. आज संतोष मेडिकल व्यवसायात आहे तर हरिनारायणजी व शांतारामजी आपआपल्या व्यवसायात प्रगती करीत आहेत. मुले आणि नातू देखील त्यांच्या त्यांच्या क्षेत्रामध्ये अग्रेसर आहेत. प्राध्यापक एस पी कॅसेट यांनी केलेल्या ज्ञानदानामुळे आज कितीतरी लोक विद्यार्थी स्थिरस्थावर झालेले आहेत. मोठमोठ्या पदावर कार्यरत आहेत. कास सरांचे हे योगदान शैक्षणिक क्षेत्रावर आणि त्यांनी शिकविलेल्या विद्यार्थ्यावर केलेले एक उपकारतुल्य काम आहे. त्याबद्दल ते आभारास व धन्यवादास पात्र आहेत. कासट परिवाराने आपल्या या परिवारातील ज्येष्ठ सदस्याचा या रविवारला सन्मान करायचे ठरविले आहे. हे चांगलं असते. आपलं कौतुक आपल्याच लोकांनी करायचं असते. तो सुवर्णमध्य संतोष कासट नवल किशोर कासट बाबुशेठ कासट हरीश कासट शांताराम कासट त्यांनी साधला आहे. त्याबद्दल त्यांचे अभिनंदन व ज्ञानदानाचे पवित्र कार्य करणाऱ्या प्राध्यापक एस पी कासट यांना उर्वरित आयुष्यासाठी शुभेच्छा…!

प्रा. डॉ.नरेशचंद्र काठोळे

संचालक मिशन आयएएस

अमरावती कॅम्प

9890967003

प्रतिक्रिया व्यक्त करा