You are currently viewing बोले नंदी बळीराजा

बोले नंदी बळीराजा

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्मा सदस्य प्रा सत्यवान घाडी लिखित अप्रतिम अष्टाक्षरी काव्यरचना*

 

🐂 *बोले नंदी बळीराजा*🐄

****************

 

बोले नंदी बळीराजा

नको करू मला दूर

नंदीविना रे येईल

साऱ्या संकटांचा पूर।।१।।

 

पोळा, दिवाळी हा सण

मज लागे ना रे गोड

तुझ्या गोठ्यातून गेला

आज नंदी बैल जोड।।२।।

 

शेत नांगरताना मी

होतो शिवाराची शान

डौलदार माझी चाल

करी आनंदी ते रान।।३।।

 

शेण गोमुत्राने तुझी

येई शेती तरारून

धन धान्याच्या राशीने

जाई घर ते भरून।।४।।

 

माझ्याविना तुझे कष्ट

वाटे झाले सारे दूर

परी ध्यानी तुची घेरे

तुझे भाग्य झाले चूर।।५।।

 

गाई बैलाविना नाही

तुझ्या घराला रे शोभा

बळी पडू नको तू रे

क्षणीकच माया,लोभा।।६।।

 

तुझा वाडा होता एक

तुझ्या आरोग्याचे धाम

नाही खेळे आज तेथे

गाई गोपाळांचा श्याम।।७।।

 

🐂🐄🐂🐄🐂🐄🐂🐄🐂🐄🐂

*रचनाकार:-* प्रा. सत्यवान शांताराम घाडी.

*गाव:-* किंजवडे, घाडीवाडी, देवगड, सिंधुदुर्ग.

*दिवा:-* ठाणे

 

🌾🌾🌾🌾🌾🌾🌾🌾🌾🌾🌾

प्रतिक्रिया व्यक्त करा