You are currently viewing आनंददायी शनिवार उपक्रमांतर्गत वराडकर हायस्कूल कट्टा येथे गावठी बाजाराला उस्फूर्त प्रतिसाद

आनंददायी शनिवार उपक्रमांतर्गत वराडकर हायस्कूल कट्टा येथे गावठी बाजाराला उस्फूर्त प्रतिसाद

मालवण :

आनंददायी शनिवार उपक्रमांतर्ग वराडकर हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय येथे आठवडा गावठी बाजाराचे आयोजन करण्यात आले होते. या बाजारात इयत्ता पाचवी ते आठवीच्या विद्यार्थ्यांनी आपल्या घरात, परिसरात मिळणाऱ्या विविध गावठी वस्तू विक्रीसाठी ठेवल्या होत्या. गावठी तांदूळ, नाचणी, कुळीथ पिठी, कोकम, चिंच, सुरण, गावठी पोहे ,आगळ ,खोबरेल तेल ,वालीचे गर, गावठी अंडी, भुईमुगाच्या शेंगा, काजूगर, नारळ, आपल्या परिसरात मिळणाऱ्या पालेभाज्या, दुग्धजन्य पदार्थ अशा विविध वस्तूंनी हा गावठी बाजार फुलला. या बाजारास भेट दिलेल्या ग्रामस्थ, पालकांनी व शिक्षकांनी मोठ्या प्रमाणावर विद्यार्थ्यांनी आणलेल्या गावठी वस्तू खरेदी करून मुलांसमवेत आपणही आनंददायी शनिवार यादगार बनविला. त्याचबरोबर इयत्ता नववीच्या स्काऊट व गाईडच्या विद्यार्थ्यांनी खरी कमाई उपक्रमांतर्गत विविध खाद्यपदार्थांचे स्टॉल लावले होते. या स्टॉलवरही खवय्यांनी गर्दी केली. श्री आनंद वालावलकर शाखा व्यवस्थापक लोकमान्य मल्टीपर्पज बँक, श्री शेखर पेणकर सरपंच ग्रामपंचायत वरची गुरामवाडी कट्टा, श्री सोमनाथ गायकवाड, सौ अंजली माहुरे जिल्हा स्काऊट गाईड संघटक, श्री सुनील नाईक सचिव कट्टा पंचक्रोशी शिक्षण प्रसारण मंडळ कट्टा, श्री सुधीर वराडकर शालेय समिती अध्यक्ष, श्री प्रकाश कदम माजी शिक्षक, श्री अनिल पाटील उपाध्यक्ष पालक शिक्षक संघ, श्री अनिल फणसेकर माजी मुख्याध्यापक, सौ देवयानी गावडे मुख्याध्यापक वराडकर हायस्कूल कट्टा व शिक्षक वृंद, ग्रामस्थ ,पालक यांच्या प्रमुख उपस्थितीत हा गावठी बाजार संपन्न झाला.

आभाळमाया ग्रुपचे सदस्य श्री मनीष ढोलम यांनी विद्यार्थ्यांना प्रोत्साहन मिळावे यासाठी दोन हजार रुपयाचे साहित्य खरेदी केले. व विद्यार्थ्यांना शितपेयाचे वाटप केले. विद्यार्थ्यांना श्रमप्रतिष्ठेचे महत्त्व समजावे, प्रत्यक्ष आर्थिक व्यवहार कसे करावेत, आपल्या परिसरात मिळणाऱ्या विविध वस्तूंचे बाजारपेठेतले महत्त्व लक्षात यावे या दृष्टीने या गावठी बाजाराचे आयोजन महत्त्वाचे ठरले. उपस्थित मान्यवरांनी कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजन व विद्यार्थ्यांच्या उस्फूर्त सहभागाबद्दल सर्वांचे कौतुक केले. या उपक्रमासाठी सर्व शिक्षक शिक्षिका यांचे सहकार्य लाभले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कलाशिक्षक श्री समीर चांदरकर यांनी केले. कट्टा पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष श्री अजयराज वराडकर व सर्व संचालक मंडळ यांनी या कार्यक्रमास शुभेच्छा दिल्या.

प्रतिक्रिया व्यक्त करा