आमदार निलेश राणे, आमदार नितेश राणे यांच्या प्रयत्नातून 300 वीज कंत्राटी कामगारांवरील बेरोजगारीची कुऱ्हाड टळली
सेवेतून कमी केलेले कामगार पुन्हा सेवेत ; कामगार नेते अशोक सावंत यांच्या पाठपुराव्याला यश
आमदार निलेश राणे, आमदार नितेश राणे यांचे कंत्राटी कामगारांनी मानले आभार
मालवण
आमदार निलेश राणे, आमदार नितेश राणे यांच्या प्रयत्नातून 300 वीज कंत्राटी कामगारांवरील बेरोजगारीची कुऱ्हाड टळली आहे. आयटीआय इलेक्ट्रिकल, वायरमन डिग्री नसलेल्या कंत्राटी कामगारांना सेवेतून काढून टाकण्याचा निर्णय महावितरण कंपनीकडून घेण्यात आला होता. त्यानुसार कणकवली विभागातील ५१ कामगारांना सेवेतून कमी करण्यात आले. या निर्णयामुळे जिल्ह्यातील ३०० कामगारांवर बेकारीची कुऱ्हाड कोसळण्याची भीती निर्माण झाली होती. कंत्राटी कामगार संघटनेचे नेते अशोक सावंत यांनी याकडे आमदार नितेश राणे आणि आमदार निलेश राणे यांचे लक्ष वेधल्यानंतर राणे बंधुंच्या तत्परतेने सेवेतून कमी केलेल्या कामगारांना पुन्हा सेवेत घेण्यात आले आहे. कामगारांनी आमदार निलेश राणे, आमदार नितेश राणे आणि कंत्राटी कामगार संघटनेचे नेते अशोक सावंत यांचे आभार मानले आहेत.
सिंधुदुर्ग जिल्ह्यात महावितरणकडे सुमारे ५५० कंत्राटी वीज कर्मचारी असून ते चांगली सेवा देत आहेत. अलीकडे महावितरणने या कंत्राटी कर्मचाऱ्यांना आयटीआय इलेक्ट्रिकल, वायरमनची डिग्री सक्तीची केली आहे. त्यामुळे महावितरणकडे कार्यरत असलेल्या सुमारे ३०० कामगारांना सेवेतून कमी करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यामुळे या कर्मचारी वर्गात एकच खळबळ उडाली होती. कंत्राटी कामगार संघटनेचे नेते अशोक सावंत यांनी आमदार निलेश राणे आणि आमदार नितेश राणे यांचे याकडे लक्ष वेधले होते. त्यानुसार आ. निलेश राणे यांच्या भूमिकेमुळे कुडाळ विभागातील एकाही कर्मचाऱ्याला कमी करण्यात आलेले नाही. तर कणकवली विभागातील ५१ कर्मचाऱ्यांना कामावरून कमी केल्याचे समजताच आमदार नितेश राणे यानी ठेकेदार आणि महावितरणच्या अधीक्षक अभियंत्यांशी चर्चा केल्यानंतर या कामगारांना तात्काळ कामावर पुन्हा हजर करून घेण्यात आले आहे. त्यामुळे सुमारे ३०० कंत्राटी कर्मचाऱ्यांवरील बेकारीची कुऱ्हाड टळली आहे.
सिंधुदुर्ग जिल्ह्यात खासदार नारायण राणे यांच्या नेतृत्वाखाली कंत्राटी वीज कर्मचाऱ्यांची संघटना गेली १४ वर्षे कार्यरत आहे. या संघटनेच्या माध्यमातून कामगारांना न्याय देण्याचा प्रयत्न करत असून यांनतरच्या काळात देखील खा. नारायण राणे, आमदार निलेश राणे, आमदार नितेश राणे यांच्या माध्यमातून कामगारांना न्याय मिळवून देण्याची ग्वाही अशोक सावंत यांनी दिली आहे. या कामगारांनी कुडाळ एमआयडीसी विश्रामगृहात एकत्र येऊन आमदार निलेश राणे, आमदार नितेश राणे यांच्यासह कंत्राटी वीज कर्मचारी संघटनेचे आभार मानले. यावेळी वीज कंत्राटी कामगार संघ जिल्हाध्यक्ष संदीप बांदेकर, समाधान चव्हाण, योगराज यादव, ऋषिकेश पवार, गणेश देसाई, जितेंद्र परब, प्रकाश धुरी, संदेश गावडे, धनंजय देसाई, मंदार गोसावी, रघुनाथ जाधव, गुरुनाथ कुडव यांच्यासह अन्य कर्मचारी उपस्थित होते.