You are currently viewing जिल्ह्यात क्षयरोग शोध मोहिम ७ डिसेंबरपासून   

जिल्ह्यात क्षयरोग शोध मोहिम ७ डिसेंबरपासून  

जिल्ह्यात क्षयरोग शोध मोहिम ७ डिसेंबरपासून

सिंधुदुर्गनगरी

राष्ट्रीय क्षयरोग दूरीकरण कार्यक्रमांतर्गत जिल्हयात ७ डिसेंबर २०२४ पासून १०० दिवसीय क्षयरुग्ण शोध मोहीम राबविण्यात येणार आहे. ही मोहिम २४ मार्च २०२५ रोजी “जागतिक क्षयरोग दिन” रोजी संपणार असल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सई धुरी यांनी दिली आहे.

      या मोहिमेचा उद्देश हा जास्तीत जास्त क्षयरुग्ण शोधून त्यांना उपचारावर आणणे, क्षय रुग्णांचा मृत्युदर कमी करुणे, नवीन क्षयरुग्णांचे प्रमाण कमी करणे, वंचित व अतिजोखमीच्या घटकापर्यंत पोहो पोहोचून आरोग्य सेवा पुरवणे, क्षयरोगाविषयी जनजागृती करणे, समाजातील क्षयरोग विषयी असलेले गैरसमज दूर करणे व सामाजिक कलंक कमी करणे, जिल्हयातील क्षय रुग्णांना “पंतप्रधान क्षयमुक्त भारत” अभियानांतर्गत निक्षयमित्र यांच्याकडून पोषण आहार किटचे वाटप करणे असा आहे.

       देशभरातील ३४७ जिल्हयांमध्ये १०० दिवसीय क्षयरोग मोहीम राबविण्यात येत असून यामध्ये सिंधुदुर्ग जिल्हयाचा समावेश करण्यात येत आहे. या मोहिमेत जोखीमग्रस्त भाग निवडून त्यांचे सर्वेक्षण करणे, निक्षय शिबीर घेण्यात येणार आहे. अनाथाश्रम, वृध्दाश्रम, उद्योग संस्था, निवासी शाळा, कारागृह येथे क्षयरोग तपासणी शिबीर तसेच स्थलांतरित, ऊसतोडणी कामगार, उच्च जोखीमग्रस्त भाग व वंचित घटक यांचे सर्वेक्षण करण्यात येणार आहे. त्यातील संशयित व्यक्तीची धुंकी तपासणी व क्ष-किरण तपासणी जिल्हा रुग्णालय सिंधुदर्ग तसेच तालुका स्तरावर करण्याचे नियोजन करणेत आले आहे. याचा लाभ जनतेने घ्यावा असे आवाहन जिल्हा शल्य चिकित्सक (जिल्हा सामान्य रुग्णालय सिंधुदुर्ग) यांनी केले आहे.

क्षयरोगाची लक्षणे

 दोन आठवडयापेक्षा जास्त कालावधीचा खोकला,  दोन आठवडयापेक्षा जास्त कालावधीचा ताप, रात्री घाम, धुंकीतून रक्त पडणे, छातीत दुखणे, श्वसनास त्रास होणे, वजनात घट, भुक मंदावणे, थकवा / अशक्तपणा जाणवणे, मानेवर किंवा शरीरावर इतर ठिकाणी गाठी येणे. या लक्षणे आढळल्यास नजिकच्या शासकिय आरोग्य केंद्रात मोफत तपासणी करुन घ्यावी, असे आवाहन जिल्हा आरोग्य अधिकारी व जिल्हा क्षयरोग अधिकारी सिंधदुर्ग यांनी केले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा