*महाराष्ट्रातील साडेतेरा कोटी जनतेचा प्रवास सुखाचा होवो*….
*अॅड.नकुल पार्सेकर*, एक प्रवासी
आज माया नगरीत एका भव्यदिव्य सोहळ्यात महाराष्ट्रातील साडेतेरा कोटी जनतेचा पुढच्या पाच वर्षांत सुखकर प्रवास होण्यासाठी देशाच्या मा. पंतप्रधानांच्या शुभहस्ते सुरूवातीला तीन डबे असलेल्या विशेष रेल्वेचा शुभारंभ होणार आहे. गेल्या अडीच वर्षात गुजरातच्या कार्यशाळेत विशेष अभियंतेच्या निरीक्षणाखाली आणि त्यांच्याच संकल्पनेतून या नवीन रेल्वेची पुढच्या पाच वर्षासाठी निर्मिती करण्यात आली असून रेल्वेचे इंजिन हे पूर्णपणे गुजराती बनावटीचचं आहे.
या रेल्वे इंजिनला सुरूवातीला फक्त तीनचं डबे जोडण्यात आलेलं असून ही रेल्वे राजधानी दिल्लीहून रिमोटवर चालणारी आहे.
पहिल्या डब्याला एका बाजूला लाडकी बहीण हे नाव देण्यात आलेलं असून दुसऱ्या बाजूला “एक है तो सेफ है”| ही स्लोगन लिहिण्यात आलेली आहे. इंजिन गुजरातच असल तरी डबे महाराष्ट्राच्या तीन भागातून मागविण्यात आले आहेत. एक डबा विदर्भातील, दुसरा डबा ठाण्याचा आणि तिसरा डबा बारामतीचा. दुसऱ्या डब्याला समृद्धी हे नाव देण्यात आलेल आहे तर तिसऱ्या डब्याला जलसिंचन हे नाव दिलेले आहे.
सदर इंजिनाला जोडणाऱ्या डब्यांची संख्या मर्यादित म्हणजे फक्त ञेचाळीस असून प्रवाशांची संख्या जास्त आहे. आपापल्या भागातील डबा रेल्वेला जोडण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारे प्रयत्न सुरु आहेत. कुणी होमहवन करत आहे तर कुणी साईबाबांची आराधना करत आहे.
गुजरातच्या इंजिनीअरने ही भरधाव रेल्वे अशी काही बनवली की आघाडीची रेल्वे पाच वर्षासाठी भंगारात पाठवली.. आता येत्या पाच वर्षात ही रेल्वे रेल्वेमार्गावर येथे की भंगारातच रहाते हे येणारा काळ ठरवील. मात्र या रेल्वेच्या एका डब्यातील भोंगा मात्र अजूनही सुरूच आहे.
आज ज्या रेल्वेचा दिमाखदार सोहळ्यात शुभारंभ होणार ती भरधाव व सुरक्षितपणे धावणार की पुन्हा एकदा मार्ग बदलून डोंगार व झाडी बघायला जाणार हे सांगता येत नाही.
आमच्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातून या रेल्वेला वीस तारीखला झालेल्या बुकींगच्या वेळी तिकीट दर जास्त ठेवूनही प्रचंड प्रतिसाद दिला त्यामुळे जे दोन डबे हाऊसफुल्ल झाले त्यात कणकवलीचा वातानुकूलित डबा जोडतात की सावंतवाडीचा पंधरा वर्षाचा जुना डबा जोडून प्रवाशांचा डुगडुग प्रवास करायला भाग पाडतात हे पहाणे महत्त्वाचे आहे. तसेच सिंधुदुर्गातून एकच डबा जोडतात की नवा करकरीत व जुना हे दोन्ही मनोमिलन झालेले डबे जोडतात?
असो, आपण या शुभदिनी अपेक्षा करूया की माझ्यासह महाराष्ट्रातील साडेतेरा कोटी जनतेचा रेल्वे प्रवास सुखकारक होवो.