*फडणवीस यावेळी कसोटी सामना गाजवणार!*
मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) :
महाराष्ट्रात नव्या सरकारच्या शपथविधीनंतर महायुती सरकारची पहिली मंत्रिमंडळ बैठक पार पडली. या बैठकीनंतर पत्रकार परिषदेला संबोधित करताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, यावेळीचा डाव कसोटी सामन्यासारखा असेल. महाराष्ट्राला प्रत्येक क्षेत्रात पुढे नेऊ. यासोबतच राज्य सरकारने लाडकी बहीण योजनेच्या निधीतही वाढ केल्याची घोषणा करताना मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, लाडकी बहीण योजनेंतर्गत सध्या १५०० रुपये दिले जात आहेत, ते २१०० रुपये करण्यात येणार आहेत. मात्र, आम्ही आर्थिक स्रोत मजबूत करू, मग त्याचा विस्तार करू.
पत्रकार परिषदेत बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्य मंत्रिमंडळात फारसा फेरबदल होणार नसल्याचे स्पष्टपणे सांगितले. तर ७, ८ आणि ९ डिसेंबर रोजी महाराष्ट्र विधानसभेचे विशेष अधिवेशन होणार आहे. विधानसभा अध्यक्षांची निवडणूक ९ डिसेंबरला होणार असून मंत्रिमंडळ निश्चित झाले आहे. हिवाळी अधिवेशनापूर्वी सर्व मंत्र्यांच्या शपथविधीनंतर खात्यांचे वाटप होणार आहे. ते म्हणाले- सर्वांना बरोबर घेऊन जाणारे सरकार तुम्हाला दिसेल, अडचणी आल्या तर सर्व मिळून मार्ग काढू आणि महाराष्ट्राला पुढे नेऊ.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पुढे म्हणाले, गेल्या अडीच वर्षात आपण महाराष्ट्राच्या विकासासाठी काम केले आहे आणि येथूनही महाराष्ट्राच्या विकासासाठी काम करू आणि आता थांबणार नाही, दिशा आणि गती एकच आहे, फक्त भूमिका बदलली आहे. महाराष्ट्राच्या भल्यासाठी आम्ही निर्णय घेऊ. आम्हांला आमच्या जाहीरनाम्यात नमूद केलेली कामे पूर्ण करायची आहेत.
आपल्या पहिल्या निर्णयात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बोन मॅरो ट्रान्सप्लांटच्या प्रतीक्षेत असलेल्या रुग्णाला मदत मंजूर केली आहे. पदभार स्वीकारल्यानंतर आपल्या पहिल्या फाईलवर स्वाक्षरी करताना महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी बोन मॅरो ट्रान्सप्लांटच्या प्रतीक्षेत असलेल्या रुग्णाला पाच लाख रुपयांची आर्थिक मदत देण्याच्या प्रस्तावाला मंजुरी दिली. मिळालेल्या माहितीनुसार, पुण्यात राहणाऱ्या चंद्रकांत कुऱ्हाडे यांच्या पत्नीने आपल्या पतीच्या उपचारासाठी मुख्यमंत्री सहायता निधीकडे मदत मागितली होती. मंत्रिमंडळाच्या पहिल्या बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्र्यांनी फाइलवर स्वाक्षरी केली.