*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्मा सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री राधिका भांडारकर लिखित अप्रतिम लेख*
*सौंदर्य म्हणजे काय?*
जे नेत्रांना सुख देतं, मनाला प्रसन्न करतं, जे पाहिल्यानंतर सकारात्मक लहरी जाणवतात, आनंददायी वाटतं ते सुंदर. अशी एक सर्वसाधारण व्याख्या आपण सौंदर्यविषयी मांडू शकतो पण तरीही या व्याख्येच्या पलिकडे जाऊन विचार केला तर ही व्याख्या सुद्धा ढोबळ आणि व्यक्तीसापेक्ष आहे. जे एकाला सुंदर वाटेल ते दुसऱ्याच्या दृष्टीने सुंदर असेलच असे नाही. म्हणजे सौंदर्य आणि दृष्टी या एकमेकांशी खूपच संबंधित आहेत. जो जे ज्या दृष्टीने पाहील त्याप्रमाणेच सुंदर की असुंदर ही विशेषणे व्यक्ती, प्राणी, स्थळ, कल्पना कलाकृतीला मिळतात.
एक गंमत सांगते तुम्हाला… परवाच आमच्या नात्यातल्या एका मुलाने स्वतःचे लग्न स्वतःच जमवले. आनंद त्याचं नाव. नावाप्रमाणेच आनंदी, दिलखुलास वृत्तीचा. तितकाच हुशार आणि देखणा. नामांकित आयटी कंपनीत उत्तम पगाराची नोकरी, उज्ज्वल भविष्य वगैरे वगैरे सर्व काही. त्यामानाने त्याने निवड केलेली त्याची सहचारिणी तशी किरकोळ व्यक्तिमत्त्वाची. सुंदर म्हणावं असं तिच्यात वरकरणी तरी काहीच दिसत नव्हतं. त्यामुळे आनंदने लग्न जमवलं या घटनेवर सर्वांची एकच टीका- टिपणी झाली. “काय पाहिलं आनंदने हिच्यात? आनंद सारख्या मुलाला हिच्यापेक्षा कितीतरी सुंदर मुली नसत्या का मिळाल्या? “ थोडक्यात लग्नाळू मुलीचे सौंदर्य या चौकटीतले असावे अशी एक पारंपरिक, सामाजिक कल्पना. रंग गोरा, नाकीडोळी रेखीव, नीटस, सडसडीत, उंच, दाट केसांची वगैरे वगैरे. बाकी काही नाही पण मी समस्त टीकाकारांना विचारू इच्छिते,” आनंदला जर तीच मुलगी सुंदर आणि योग्य वाटत असेल तर तुमचा प्रॉब्लेम काय आहे ?”
आनंद तिला एक दिवस माझ्या घरी घेऊनही आला होता आणि खरोखरच, “ती पाहताच बाला कलीजा खलास झाला” हे मटेरियल जरी तिच्या व्यक्तिमत्त्वात नसलं तरी तिच्यात *असलेला एक *स्पार्क* मला जाणवला*. तिचा आत्मविश्वास, तिचे विचार, तिचा ठामपणा, तिच्या शांत आणि नम्रतेतही जाणवणारा आश्वासकपणा पाहून मीही प्रभावित झाले. तिच्यातलं नेमकं सौंदर्य *आनंदने* टिपलं होतं हे मला त्या क्षणीच जाणवलं.
एक आठवण सांगते.
३०-४० वर्षांपूर्वी आम्ही काश्मीरला गेलो होतो. तेव्हाचं काश्मीर आणि तिथलं निसर्गसौंदर्य केवळ शब्दातीत होतं. रस्त्यांच्या दुतर्फा असलेले ते सूचीपर्णी वृक्ष, जागोजागी उमललेले विविधरंगी टवटवीत गुलाब, बर्फाच्छादित गिरीशिखरे, रंगांची उधळण करणारी असंख्य रानफुले, खळाळत्या फेसाळत्या नद्या, सफरचंदांसारखी गोड गुलाबी माणसं, स्त्रिया, त्यांच्या चेहऱ्यावरचं हास्य आणि ओठावरचं भाष्य सारंच काही सुंदर! उगीच काश्मीरला नंदनवन नाही म्हणत हे त्यावेळी प्रकर्षाने जाणवलं.
ठायी ठायी दिसणारं ते नैसर्गिक सौंदर्य आमच्या डोळ्यातही मावत नसताना आमच्या ग्रुप मधली एक व्यक्ती चटकन म्हणाली,” रोज रोज काय हेच बघायचं? तेच डोंगर, तीच फुलं, तीच माणसं, त्याच नद्या.. आता हे वातावरण मला फारच कंटाळवाणं वाटू लागलं आहे. घरी कधी जातोय असं झालंय.”
घराची ओढ लागणं अस्वाभाविक नाही पण सौंदर्याचा कंटाळा येणं ही मानसिकताच किती रुक्ष आहे? सौंदर्याचा स्पर्श जाणवणं आणि सौंदर्य भोगता येणं हे व्यक्तीस्थित सौंदर्याचे लक्षण आहे असं नाही का तुम्हाला वाटत?
माझ्या घरात एक पेंटिंग आहे. संपूर्ण पिवळ्या रंगाच्या पार्श्वभूमीवर दोन आदिवासी महिलांचे चेहरे त्यात रेखाटलेले आहेत. दोघींच्या डोक्यावर विरळ विस्कटलेले केस, प्रमाणाबाहेर मोठे डोळे, त्रिकोणी हनुवट्या. सुंदरतेपासून कोसो दूर असणारे हे भेसूर चेहरे आणि त्या पिवळ्या पार्श्वभूमीवर चितारलेला एक तळपता सूर्य. माझी नात प्रथम अमेरिकेहून जेव्हा भारतात आली तेव्हा ती लहान होती. माझ्या घरातलं ते चित्र पाहून ती घाबरली. “आजी मला भीती वाटते या बायका बघून. तू हे चित्र काढून टाक.”
मग मी तिला हळूहळू चित्राचा अर्थ सांगितला. त्यांचं हे भयानक दिसणं म्हणजे त्यांच्या जीवनाचं भीषण प्रतीकात्मक रूप आहे आणि हा सूर्य आहे ना त्याच्या तेजापर्यंत पोहोचण्याचं त्यांचं स्वप्न आहे. चित्रकाराच्या या सकारात्मक सुंदर कल्पनेचं या चित्रातून दर्शन होतं म्हणून मला हे चित्र खूप सुंदर वाटतं. यात भयावह काहीच नाही. यात एक सुंदर स्वप्न रेखाटलेलं आहे.”
त्यावेळी तिला हे फारसं कळलं नसेल पण मागच्याच महिन्यात ती भारतात आली होती. आता छान मोठी झाली आहे. स्वतः सुंदर चित्रं काढू लागली आहे. या वेळेस ती मला म्हणाली, “आजी तुझ्या घरातलं हे सर्वात सुंदर पेंटिंग आहे!”
म्हणून सौंदर्य म्हणजे काय असं पटकन सांगता नाही येणार. सौंदर्य जाणावं लागतं, सौंदर्य टिपावं लागतं, त्यासाठी दृष्टीची, मनाची, वयाची, अनुभवांची, विचारांची परिपक्वता महत्वाची असते.
एखाद्या कलामंचावर गाणारी गायिका सुंदर नसते पण ती गायला लागली की सूरांचे रंग तिच्यावर नकळत पांघरू लागतात,अशी एखादी फिरकी तान ती घेते की श्रोते बेभान होऊन “वा!” अशी दाद देतात. ती दाद त्या भावपूर्ण, रसमय गाण्याच्या सौंदर्याला असते.
एखादं घर सुंदर का दिसतं? तिथे असलेल्या उंची वस्तुंमुळे का? नाही हो!
घराच्या रचनेतल्या कलात्मकतेमुळे, स्वच्छता, टापटीप राखल्यामुळे, तिथे राहणार्यांच्या आनंदी चेहर्यांमुळे,दारापुढे घातलेल्या रांगोळीमुळे, दारावरच्या तोरणामुळे..मग भले तो महाल नसेल.झोपडीच असेल पण ती सुंदर भासते.तिथे देवत्व, पावित्र्य, मांगल्याचा अनुभव येतो.
*पिपात मेले ओल्या उंदीर*
*माना पडल्या मुरगळल्याविण*
बा .सी. मर्ढेकरांच्या प्रसिद्ध कवितेतील ही शब्दरचना वाचताना सुंदर वाटते का? पण दुसऱ्या महायुद्धात ज्या *निर्घृणपणे* *ज्यूं* चे हत्याकांड झाले त्यांच्या आत्म्याची ही ललकारी आहे हे कळल्यावर मन थक्क आणि सुन्न होते. कवीच्या कवितेतल्या भीषण शब्दांचा अर्थ लागल्यावर मर्ढेकरांची ही संपूर्ण कविता सुंदर वाटू लागते. म्हणजेच शब्दांपेक्षा अर्थातलं सौंदर्य महत्त्वाचं ठरतं. थोडक्यात चांगलं -वाईट, भीषण, भयानक, सुगंधी -दुर्गंधी काहीही असू दे पण त्या पलिकडे जाऊन काहीतरी निराळं पाहणं आणि ते उलगडून दाखवता येणं म्हणजे सौंदर्य. मनाचं, विचारांचं,कल्पनेचं, सृजनशीलतेचं..
*राधिका भांडारकर*