You are currently viewing सिंधुदुर्ग जिल्हा वीज ग्राहक संघटनेच्या प्रभारी अध्यक्षपदी संजय लाड यांची एकमताने निवड

सिंधुदुर्ग जिल्हा वीज ग्राहक संघटनेच्या प्रभारी अध्यक्षपदी संजय लाड यांची एकमताने निवड

*व्यवसायवृद्धीमुळे श्रीराम शिरसाट यांचा राजीनामा*

 

सिंधुदुर्ग जिल्हा वीज ग्राहक संघटनेची महत्त्वाची सभा दिनांक ०४ डिसेंबर २०२४ रोजी सावंतवाडी येथील श्रीराम वाचन मंदिर मध्ये पार पडली. यावेळी जिल्हा सचिव दीपक पटेकर यांनी प्रस्तावना करून सभेच्या कामकाजाला सुरुवात केली आणि जिल्हा वीज ग्राहक संघटनेच्या आजपर्यंतच्या कामकाजाचा आढावा घेतला. आजची सभा ही मुख्यत्वे जिल्हा वीज ग्राहक संघटनेचे जिल्हाध्यक्ष श्रीराम शिरसाट यांनी त्यांच्या व्यवसाय वृद्धीमुळे राजीनामा दिल्याने संघटनेचे नवे अध्यक्ष निवडीसाठी आयोजित करण्यात आली होती. श्रीराम शिरसाट यांनीच सुचविल्या प्रमाणे जिल्हा वीज ग्राहक संघटनेच्या प्रभारी अध्यक्षपदी सावंतवाडी तालुक्याचे अध्यक्ष म्हणून कार्यरत असलेल्या संजय लाड यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. मावळते अध्यक्ष श्रीराम शिरसाट यांनी पुष्पगुच्छ देऊन संजय लाड यांचे अभिनंदन केले. यावेळी जिल्हा समन्वयक ॲड.नंदन वेंगुर्लेकर, जिल्हा उपाध्यक्ष बाळासाहेब बोर्डेकर, सावंतवाडी तालुका सचिव अस्लम खतिब आदी उपस्थित होते.

सिंधुदुर्ग जिल्हा वीज ग्राहक संघटनेने मावळते अध्यक्ष श्रीराम शिरसाट यांच्या अध्यक्षतेखाली गेले दीड वर्ष जिल्ह्यातील महावितरणची वीज व्यवस्था सुधारण्यासाठी अथक प्रयत्न केले. जिल्ह्यातील वीज ग्राहकांना आपल्या हक्काची अखंडित वीज पुरवठा होण्यासाठी २६ जानेवारी २०२४ रोजी अधीक्षक अभियंता यांच्या कार्यालयासमोर उपोषण केले. जवळपास तीन चारवेळा जिल्ह्यातील प्रमुख पदाधिकाऱ्यांना सोबत घेत त्यांनी रत्नागिरी, कोल्हापूर तसेच मुंबई येथील महावितरणच्या प्रतापगड कार्यालयावर धडक देत निवेदने देऊन वरिष्ठ अधिकाऱ्यांचे जील्हातील वीज समस्यांकडे लक्ष वेधले. परिणामी जिल्हातील कामचुकार अधिकाऱ्याच्या बदल्या झाल्या आणि जिल्हाची वीज यंत्रणा नव्या जोमाने कामाला लागली. कुडाळ तालुक्यातील आंब्रड येथील सबस्टेशनचे काम, तळवडे येथील सब स्टेशन आदी जिल्ह्यातील रखडलेली कामे सुरू होण्यासाठी प्रयत्न केले, पैकी आंब्रड येथील काम मंजूर होऊन प्रगतीपथावर असून तळवडे येथील काम जागेच्या अभावी थांबले आहे.

सिंधुदुर्ग जिल्हा वीज ग्राहक संघटनेच्या गेल्या दोन वर्षांच्या यशस्वी वाटचाली नंतर जिल्हाध्यक्ष श्रीराम शिरसाट यांनी आपल्या व्यवसायाच्या वृद्धिमुळे आणि वाढलेल्या कार्यबाहुल्यांमुळे संघटनेच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला. राजीनामा दिल्यानंतर आपल्या मनोगतात त्यांनी संघटनेने आणि ग्राहकांनी केलेल्या सहकार्याबद्दल सर्वांचे आभार मानले आणि राजीनामा दिला तरी फक्त पदावरून दूर झालो आहे, सदस्य म्हणून कार्यकारिणी मध्ये यापुढेही कार्यरत राहणार असून तन मन धन अर्पून वेळोवेळी संघटनेच्या कामात मदत करणार असल्याची ग्वाही दिली. श्रीराम शिरसाट यांनीच सावंतवाडी तालुक्यातून अध्यक्ष म्हणून गेली दोन वर्षे जोमाने काम करत असलेले संजय लाड यांचे जिल्ह्याचे प्रभारी अध्यक्ष म्हणून नाव सुचविले त्याला जिल्हा समन्वयक ॲड नंदन वेंगुर्लेकर यांनी अनुमोदन दिले आणि सर्वानुमते जिल्हा वीज ग्राहक संघटनेच्या प्रभारी अध्यक्ष पदी संजय लाड यांची निवड जाहीर झाली. जिल्हा वीज ग्राहक संघटनेच्या सहसचिव पदी समीर शिंदे यांची निवड झाली.

या सभेसाठी वीज ग्राहक संघटना कणकवली तालुकाध्यक्ष गुरुनाथ कुलकर्णी, वेंगुर्ला सचिव जयराम वायंगणकर, सावंतवाडी सहसचिव समीर शिंदे, सदस्य मनोज घाटकर, संदीप टोपले, सुभाष पुराणिक, सुभाष गोवेकर, परशुराम चव्हाण, दत्ताराम सडेकर, अमोल केसरकर, विजय ओटवणेकर, शैलेश कुडतरकर, चेतन वाळके सौ नेहा जोशी आदी पदाधिकारी सदस्य तसेच वीज ग्राहक उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा