कोलगाव ग्रामपंचायत मतदानाच्या अगोदर तांदूळ आणि लिंबूची भानामती…?

कोलगाव ग्रामपंचायत मतदानाच्या अगोदर तांदूळ आणि लिंबूची भानामती…?

निवडणूक आली की माणसातील कार्यकर्ता जागा होतो, मित्र म्हणून मिरवणारे असो वा एकाच घरात एकाच चुलीवर जेवण करणारी आपली घरची माणसे सत्तेसाठी एकमेकांच्या विरोधात उभी टाकतात. निवडणूक एकदोन दिवसांची असते आणि नातेसंबंध हे कायमचेच. परंतु जनतेच्या भल्यासाठी नव्हे तर स्वतःच्या स्वार्थासाठी किव्हा एखाद्या पक्षाच्या सत्तेसाठी आपल्याच माणसांना दुखावतात. परंतु गेल्या काही वर्षांमध्ये मतदारांना आपल्या कर्तृत्वाने, कामाने आकर्षून घेण्यापेक्षा पैशांचे आमिष दाखवून आपल्याला मतदान करण्यासाठी प्रवृत्त करतात. पैशांचे खेळ सुद्धा जिथे थिटे पडतात तिथे तर आणखी एक *भानामतीचा खेळ* खेळला जातो. असाच काहीसा प्रकार घडल्याची चर्चा आहे ती सावंतवाडी शहराला लागूनच असलेल्या आणि पक्षीय श्रेयवादासाठी कुरघोडी सुरू असलेल्या कोलगाव मध्ये.
*कोलगाव मध्ये जि प सदस्य मायकल डिसोझा आणि भाजपाचे नेते महेश सारंग यांच्यात सत्तेसाठी काटे की टक्कर सुरू आहे.* आपलाच उमेदवार जिंकावा या आशेपोटी आणि अंधश्रद्धेला खतपाणी घालणारा पिवळ्या तांदळाच्या राशी आणि लिंबू रस्त्यावर ठेऊन भानामती करण्याचे प्रकार प्रभाग चार आणि पाच मध्ये घडल्याची जोरदार चर्चा कोलगाव मध्ये सुरू आहे. देश प्रगतीपथावर जातोय, चंद्रावरही शोध मोहिमा होताहेत, इंटरनेट, 5G सुविधा येतात, देशात अच्छे दिन येण्याची ग्वाही देशाचे पंतप्रधान देतात आणि अजूनही ग्रामीण पातळीवर लोक अंधश्रद्धेला खतपाणी घालतात हे प्रकार नक्कीच निंदनीय आहेत.
चार वर्षांपूर्वी सावंतवाडीत नगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सुद्धा घातमाथ्यावरून माणसे आणून काही वॉर्ड मध्ये तिठ्यांवर जळालेल्या अवस्थेत अख्खे नारळ ठेऊन, रक्त सांडून भानामतीचा प्रकार केल्याचेही ऐकिवात आले होते. नागरिकांना मतदानाचा हक्क निर्धोक, स्वखुशीने बजावण्यासाठी सरकार हरप्रकारे प्रयत्न करत असताना लोकानी आपल्यालाच मतदान करण्यासाठी त्यांना भीती दाखवून त्यांचा मतदानाचा हक्क हिरावून घेण्यासाठी हे निंदनीय प्रकार नक्की करतंय कोण?
जनतेने जागरूक राहून असे प्रकार करणार्यांना त्यांची जागा दाखवून देऊन अंधश्रद्धेला समाजातून दूर करण्यासाठी एक व्हायला हवे, आणि असे प्रकार करणाऱ्यांना कायमचीच अद्दल घडविली पाहिजे तरच मतदान शांततेत आणि खऱ्या हक्काच्या व्यक्तीला करण्यास मदत होईल. आपल्या मनातील उमेदवाराला मतदान करण्यासाठी कोणीही रोखू शकत नाही मग तो पैसा असो वा भानामती हे दाखवून द्यायचे असेल तर ते जनताच करू शकेल.

प्रतिक्रिया व्यक्त करा