You are currently viewing कधीही न भरून येणारी पोकळी

कधीही न भरून येणारी पोकळी

 

अतिशय प्रतिकुल परिस्थितीत संघर्ष करून ज्यानी उद्योग विश्व निर्माण केलं असे माझे जवळचे दोन मिञ अकाली काळाच्या पडद्याआड गेले. गेल्यावर्षी स्व. राजन आंगणे यांनी जगाचा निरोप घेतला आणि दोन दिवसांपूर्वीच माझे अतिशय जवळचे आणि कौटुंबिक स्नेह असलेले एक यशस्वी उद्योजक, बिल्डर शशिकांत पेडणेकर यांचे दु:खद निधन झाले.

एका गरीब कुटुंबातील एक मुलगा मुंबई माया नगरीहून सावंतवाडीत येतो आणि सावंतवाडी रेल्वे स्टेशनच्या जवळ सुमारे पंधरा वर्षांपूर्वी तब्बल १३४ सदनिका असलेला दर्जेदार सर्व सोयीनी युक्त असा सिल्व्हर एकर्स हा आकर्षक प्रकल्प पूर्ण करतो… आणि मग एक यशस्वी बांधकाम व्यावसायिक म्हणून नावारूपाला येतो.

मला आठवत बारा वर्षापूर्वी त्यांनी याच प्रकल्पावर लहान मुलांसाठी स्वखर्चाने तीन दिवसाच्या गंमत- जंमत शिबिराचे आयोजन केले होते. त्याच्या उदघाटन माझ्या हस्ते झाले होते. कुणीतरी माझं नाव सुचवल म्हणून मला त्यांनी बोलावल. ती पेडणेकर कुंटुबियांशी माझी पहिली भेट. सामाजिक क्षेत्रात काम करण्याची आवड असल्याने आमचे संबंध आणखीन द्रुढ होत गेले. सुमारे पाच हजार स्वेकर फुटाची स्वखर्चाने बांधलेली इमारत त्यांनी वृध्दाश्रमासाठी मोफत दिली. ही संकल्पना राबवण्यासाठी त्यांच्याबरोबर काही क्षण व्यतीत केले. आपल्या कमाई मधील काही भाग हा सामाजिक कामासाठी खर्च केला पाहिजे ही त्यांची व्यापक भावना होती. अडलेल्या पडलेल्या असंख्य लोकांना त्यानी भरभरून मदत केली. त्यांच्या या सामाजिक भान ठेवून केलेल्या कामासाठी अटल प्रतिष्ठानच्या वतीने मा. सुरेशजी प्रभू केंद्रीय मंत्री असताना त्यांच्या शुभहस्ते त्यांचा सत्कारही केला होता.

एखाद्या गावात असा प्रकल्प उभा करायचा तर अनेकदा काही उपद्रवी मुल्यांचा ञास सहन करावा लागतो. त्यांना याचा खूप ञास झाला. अनेकदा खंबीरपणे मी त्यांच्या पाठीशी उभा राहिलो. माणसं न ओळखता भावनिक होऊन विश्वास ठेवल्यामुळे अनेकांनी त्यांचा गैरफायदा घेतला.

आमच्या अटल प्रतिष्ठानच्या बांधकामासाठी पण त्यानी विटा व वाळू देऊन सहकार्य केलं होत. माझ्या प्रत्येक घरगुती व सामाजिक कार्यक्रमात त्यांचा सक्रिय सहभाग असायचा. अनेकदा एकञ प्रवास केला. या दोन वर्षात नाही पण पूर्वी मी मुंबईला गेल्यावर त्यांच्याच दादर येथील निवासस्थानी रहायला असायचो. राञी दोन दोन वाजेपर्यंत आमची विविध विषयांवर चर्चा असायची. सातत्यपूर्ण माझ्या धडपडीचं त्यांना फार कौतुक. घरी आले की चेष्टामस्करी चालायची.

प्रचंड कष्ट करायचे. कोलगावं येथे पण त्यांना त्यांच्या स्वप्नातील मोठा गृहप्रकल्प साकारायचा होता. काही प्रमाणात बांधकामही झालं होत… पण पुन्हा काही स्थानिक लोकांनी अडचणी निर्माण केल्याने तो प्रकल्प थांबला. ज्याच्या प्रशासकीय इमारतीचे उद्घघाटन माजी आमदार वैभव नाईक व माझ्याहस्ते झालं होत. त्यानंतर त्यांनी हल्लीच मळगांव येथे रेनबो हा प्रकल्प पूर्णत्वास नेला. खरं तर हे त्यांच जाण्याचं वय नव्हत… पण नियती कुणाचही ऐकत नाही.

माझ्या कोलगावं येथील नवीन ब़ंगल्याच डिझाइन व मार्गदर्शन त्यांनी केल होत. जुन्या माजगावं येथील घरात असो नाहितर कोलगावं येथील नवीन घरात पेडणेकर दांपत्याचं येणजाण असायचं. छोट्या मुलीच्या स्वागत सोहळ्यासाठी सपत्नीक आले होते त्यानंतर आम्हा सर्वांना त्यांनी आपल्या शिरोडा येथील निवासस्थानी खास मेजवानी दिली होती. शिरोडा येथील त्यांचा बंगला, आतील सजावट, गार्डन त्यांनी अतिशय कल्पकतेने तयार केलेली आहे.

पेडणेकर गेले, यावर माझा विश्वासचं बसत नाही. परवाच त्यांची विवाहित मुलगी निसर्गीनीचा फोन आला.. बराच वेळ बोलण झालं.. खरचं सगळच अघटित आणि अविश्वसनीय.. दादरच्या त्यांच्या कार्यालयात काम करत असतानाच ह्रदयविकाराचा तीव्र झटका येऊन ते गेले… अगदी अचानक.. काहीही न सांगता..

पेडणेकर वहिनी, मुलगा अमोघ आणि मुलगी आणि जावई यांची कधीही भरून न येणारी पोकळी निर्माण झालेली आहेच. हे दु:ख पचवणे फार अवघड आहे. वैयक्तिक माझ्या जीवनातही पेडणेकर यांच्या अकाली जाण्याने फार मोठी पोकळी निर्माण झालेली आहे जी कधीही भरून येणार नाही.. त्यांची उणीव मला पावलोपावली जाणवेल.

ईश्वर त्यांना चिरशांती देवो. त्यांच्या कुटुंबियांना हे डोंगरा एवढे दुःख पचवण्याची ताकद देवो हीच प्रार्थना.

…ओम शांती..

शोकाकुल

ॲड. नकुल पार्सेकर व स्नेहप्रिया परिवार…

प्रतिक्रिया व्यक्त करा