You are currently viewing वेंगुर्ले तालुक्यातील तीन आमदार विधानसभेत

वेंगुर्ले तालुक्यातील तीन आमदार विधानसभेत

मातोंड गावात जल्लोष; आमदार महेश सावंत यांच्या भव्य नागरी सत्काराचे आयोजन

 

वेंगुर्ले :

वेंगुर्ले तालुक्यातील तीन सुपुत्र विधानसभेवर आमदार म्हणून निवडून आले आहेत. मूळ भोगवे- नेवाळी आणि आता वेंगुर्ले – भटवाडी येथील रहिवासी असलेले उदय सामंत, किरण सामंत व मातोंड येथील महेश सावंत हे आमदार म्हणून निवडून आले असून वेंगुर्ले तालुक्यातून आनंद व्यक्त होत आहे. वेंगुर्ले तालुक्याला विधानसभेवर प्रतिनिधित्व मिळवत तिघे आमदार झाल्याने वेंगुर्लेच्या विकासास चालना मिळणार असल्याचा सूर व्यक्त होत आहे. उदय सामंत यांना मंत्रिपद मिळाल्यास वेंगुर्लेचा औद्योगिक व इतर विकास होण्यास मदत होणार आहे. माजी पालकमंत्री उदय सामंत यांनी केलेले कार्य पाहता त्यांना निश्चितच मंत्रिपद मिळून वेंगुर्ले तालुक्याच्या विकासात योगदान देण्याची संधी मिळावी,अशी भावना कार्यकर्त्यातून, समस्त वेंगुर्लेवासीयातून व्यक्त होत आहे.

वेंगुर्ले तालुक्यातील मातोंड -सावंतवाडा गावचे सुपुत्र महेश सावंत हे माहीम विधानसभा मतदारसंघातून उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षातर्फे निवडून येत आमदार झाले. त्यामुळे वेंगुर्ले तालुक्यातील मातोंड गावात आनंद व्यक्त होत आहे. वेंगुर्ले तालुक्यातील मातोड खालचा सावंतवाडा येथील रहिवासी असलेले व सध्या प्रभादेवी येथील रहिवासी असलेले ठाकरे शिवसेनेचे उमेदवार महेश सावंत यांनी आपल्या मतदारसंघात शिंदे सेनेच्या सदा सरवणकर व राज ठाकरे यांचे सुपुत्र मनसेच्या अमित ठाकरे यांचा पराभव करून ते आमदार म्हणून निवडून आले आहेत. महेश सावंत यांना 50213 मते मिळाली. शिंदे सेनेच्या सदा सरवणकर यांना 48897 मते मिळाली. तर मनसेच्या अमित ठाकरे यांना 33062 एवढी मते मिळाली. महेश सावंत हे 1316 मतांनी विजयी झाले. मातब्बर उमेदवारांना त्यांनी पराभूत करून विजय मिळविला. मातोंड सावंतवाडा येथील एका शेतकरी गरीब कुटुंबातील असलेले महेश सावंत यांचे वडील मिल कामगार म्हणून होते. गावातील सर्व धार्मिक, सांस्कृतिक, क्रीडा कार्यक्रमात त्यांचा सहभाग असतो. त्यांच्या प्रचारासाठी मातोंड गावातून 50 कार्यकर्ते मुंबई येथे गेले होते. महेश सावंत यांच्या विजयासाठी मातोंड ग्रामदैवता देवी सातेरीकडे ग्रामस्थांकडून साकडे घालण्यात आले होते. सावंत विजयी होताच गावात फटाक्यांची आतिषबाजी करण्यात आली. 6 डिसेंबरला देव घोडेमुख जत्रोत्सवासाठी आमदार सावंत येथे येणार आहेत. शनिवारी 7 डिसेंबर रोजी सकाळी 10 वाजता सावंतवाडी ते सातेरी मंदिर येथे बाईक रॅली काढण्यात येणार आहे. त्यानंतर सातेरी मंदिर येथे मातोंड गावच्या वतीने त्यांच्या नागरिक सत्कार करण्यात येणार असल्याची माहिती गावकर मंडळी व ग्रामस्थांनी सांगितली आहे. मातोंड गावाला विधानसभेवर प्रतिनिधित्व मिळाले याचे मनोमन समाधान वाटते, अशी प्रतिक्रिया येथील ग्रामस्थांतून व्यक्त होत आहे.

दरम्यान वेंगुर्ले तालुक्याचे सुपुत्र विधानसभेत प्रतिनिधित्व मिळाल्याने तालुक्यातूनही आनंद व्यक्त होत आहे. महायुतीचे उमेदवार उदय रवींद्र सामंत (1,11,335 मते) यांनी उद्धव ठाकरे शिवसेनेच्या बाळा माने (69745 मते) यांचा पराभव करून आमदार म्हणून ते पाचव्यांदा निवडून आले आहेत. तसेच त्यांचे बंधू किरण रवींद्र सामंत हे राजापूर मतदार संघातून पहिल्यांदा आमदार म्हणून निवडून आले आहेत. त्यांनी उद्धव ठाकरे शिवसेनेच्या राजन साळवी यांचा पराभव केला आहे. उदय सामंत यांनी सिंधुदुर्गचे पालकमंत्री, उद्योगमंत्री, नगरविकास मंत्री आदी पदे भूषवलेली आहेत. त्यांनी वेंगुर्लेच्या विकासासाठी मोठे योगदान दिले आहे. यादरम्यान त्यांनी नाटककार मधुसूदन कालेलकर सभागृह, बॅरिस्टर नाथ पै सभागृह, झुलता पूल आदींसाठी तसेच नगरपालिका कार्यक्षेत्रातील विविध विकास कामांसाठी निधी उपलब्ध करून दिला आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा