You are currently viewing आंगणेवाडीच्या भराडी मातेचे रवींद्र चव्हाण यांनी घेतले दर्शन..

आंगणेवाडीच्या भराडी मातेचे रवींद्र चव्हाण यांनी घेतले दर्शन..

मालवण :

विधानसभा निवडणुकीत महायुतीने विजय मिळविल्यानंतर आणि डोंबिवली मतदार संघातून पुन्हा आमदार म्हणून निवडून आल्यानंतर जिल्ह्याचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी आज आंगणेवाडी येथे श्री भराडी देवीचे दर्शन घेतले. विधानसभा निवडणुकीच्या अगोदर आपण भराडी देवीचे दर्शन घेऊन राज्यात महायुतीची सत्ता येवो असे साकडे घातले होते, भराडी देवीच्या आशिर्वादामुळेच राज्यात महायुतीला घवघवीत यश मिळाले असून पुन्हा एकदा महायुतीचे सरकार स्थापन होत आहे. जनतेची पुन्हा सेवा करण्याची संधी मिळाली आहे, असे यावेळी रवींद्र चव्हाण यांनी सांगितले.

पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी आज दुपारी अडीज वाजण्याच्या सुमारास आंगणेवाडी येथे भेट देऊन श्री भराडी देवीचे दर्शन घेतले. यावेळी आंगणे कुटुंबियांच्या वतीने तसेच जिल्ह्यातील भाजप महायुतीच्या पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्याकडून रवींद्र चव्हाण यांचे स्वागत करण्यात आले. यावेळी भाजपचे जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, माजी आमदार प्रमोद जठार, रणजित देसाई, जिल्हा उपाध्यक्ष विजय केनवडेकर, जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी, भाजप मालवण शहराध्यक्ष बाबा मोंडकर, माजी नगराध्यक्ष सुदेश आचरेकर, गणेश कुशे, श्वेता कोरगावकर, दीपलक्ष्मी पडते, पूजा करलकर, राजू परुळेकर, महेश मांजरेकर, बबलू राऊत, संदीप परब, प्रमोद करलकर, ललित चव्हाण, शिवसेनेचे जिल्हा संघटक महेश कांदळगावकर, किसन मांजरेकर आदी व इतर उपस्थित होते.

यावेळी रवींद्र चव्हाण म्हणाले, भराडी मातेवर माझी निस्सीम श्रद्धा आहे. आजपर्यंत माझ्या प्रत्येक क्षेत्रात भराडी मातेने यश दिले आहे. विधानसभा निवडणुकीत माझ्यावर प्रचार प्रमुख म्हणून राज्यभरातील जबाबदारी देण्यात आली होती. निवडणुकीपूर्वी भराडी मातेच्या चरणी राज्यात महायुतीची सत्ता येवो असे सकडे घातले होते. ते आज पूर्ण झाले आहे. भराडी मातेच्या आशिर्वादाने, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अजित पवार यांच्या मार्गदर्शनाखाली लढविलेल्या निवडणुकीत राज्यात महायुतीचे पूर्ण बहुमताने सरकार आले आहे. महाराष्ट्राची अर्थव्यवस्था बळकट करणे हे पंतप्रधान नरेंद्र मोदींचे स्वप्न असून ते पूर्ण करण्यासाठी भराडी मातेच्या आशीर्वादाने आम्ही प्रयत्न करत आहोत असेही चव्हाण म्हणाले.

कोकण हा महायुतीचा बालेकिल्ला आहे हे याठिकाणी मिळविलेल्या भरघोस यशाने पुन्हा सिद्ध झाले आहे. कोकणातील ३९ पैकी ३५ जागांवर महायुतीचे उमेदवार विजयी झाले. कोकण हे उजव्या विचारसरणीच्या बाजुने आहे हे सिद्ध झाले आहे. महायुतीकडून राज्यात विकासाला प्राधान्य दिले गेले, सामान्य जनतेला केंद्रबिंदू ठेवून काम केले. लाडकी बहीण व इतर योजना राबविल्या गेल्या, यामुळे जनतेत सकारात्मकता असल्याने पुन्हा महायुतीची सत्ता आली आहे, असेही रवींद्र चव्हाण म्हणाले.

राज्याचा मुख्यमंत्री कोण होईल याबाबत वरिष्ठ निर्णय घेतील. तसेच सिंधुदुर्गच्या पालकमंत्री पदाबाबतही वरिष्ठ पातळीवर निर्णय घेण्यात येईल. आमदार म्हणून आपण पुन्हा विधानसभेत जात आहोत, जनतेची सेवा करण्याची पुन्हा संधी मिळत आहे हे आपल्यासाठी महत्वाचे आहे, असेही रवींद्र चव्हाण म्हणाले.

प्रतिक्रिया व्यक्त करा