सिंधुदुर्ग भाजप मच्छिमार सेलचे जिल्हा संयोजक रविकिरण तोरसकर
कुडाळ :
महाराष्ट्र राज्य विधानसभेच्या नुकत्याच पार पडलेल्या निवडणुका मध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्यातील महायुतीच्या नेत्रदीपक विजयात सिंधुदुर्गातील मच्छिमार व किनारपट्टी समुदायाने महत्वाचा वाटा उचलला आहे. महायुतीचे उमेदवार आमदार दीपक केसरकर, आम.निलेश राणे, आम. नितेश राणे यांना किनारपट्टी भागात तब्बल ९ हजार ७९४ एवढे मताधिक्य आणि १०८ पैकी ९१ बुथवर आघाडी मिळवून देणाऱ्या किनारपट्टीवरील मतदारांचे आभार सिंधुदुर्ग भाजप मच्छिमार सेलचे जिल्हा संयोजक रविकिरण तोरसकर यांनी मानले आहेत.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील १२१ किमीच्या किनारपट्टीवर देवगड (नगरपंचायत), मालवण, वेंगुर्ला अश्या दोन नगरपालिका असून ३२ ग्रामपंचायती आहेत. जिल्ह्यातील किनारपट्टीवर १०८ मतदान केंद्रे (बूथ) असून यापैकी ९१ मतदान केंद्रावर महायुती आघाडीवर आहेत. एकंदर मतदान ५६ हजार २०१ एवढे झाले असून महायुतीला २९ हजार ३९४ तर महविकास व अपक्ष यांना २६८०७ मते पडली म्हणजेच किनारपट्टी भागात तब्बल ९ हजार ७९४ (५२.३०%) एवढे मताधिक्य मिळाले आहे. महायुतीच्या या महविजयात सिंधुदुर्ग किनारपट्टीवर वसलेला मच्छीमार तसेच किनारपट्टीवरील इतर समुदाय याचा मोठा वाटा आहे. त्याबद्दल सर्व किनारपट्टीवरील मतदारांचे भाजपा मच्छीमार सेल तर्फे त्यांनी आभार मानले आहेत.
किनारपट्टी भागाला वेगवेगळ्या समस्यांना तोंड द्यावे लागते. तिन्ही अनुभवी आणि सक्षम आमदार विधानसभेत निवडून गेल्यामुळे किनारपट्टी भागातील समस्या सोडवण्यात मदत होणार आहे. तसेच केंद्र व राज्यात महायुतीचे डबल इंजिन सरकार असल्यामुळे मत्स्यव्यवसाय, पर्यटन व इतर पूरक व्यवसायासाठी केंद्र व राज्य सरकारच्या विविध योजना राबविण्यास बळकटी मिळेल अशी आशा श्री. तोरसकर यांनी व्यक्त केली.