मुंबई
सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्यावर बलात्कारासारखा गंभीर आरोप करण्यात आला आहे. त्यामुळे मुंडे यांना मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागणार का? असा प्रश्न आता विचारला जात आहे. त्यातच राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी मुंडेंवरील आरोप गंभीर आहे. पक्ष त्याबाबत विचार करुन तातडीने निर्णय घेईल, असं सूचक वक्तव्य केलं आहे. असं असलं तरी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी मात्र धनंजय मुंडे यांच्यावरील आरोप हे ब्लॅकमेलिंगचा प्रकार असल्याचं सांगत, पोलिस चौकशीअंती निर्णय घेऊ, असं म्हटल्यानं धनंजय मुंडे यांना दिलासा मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
राष्ट्रवादीच्या कोअर कमिटीची बैठक
दरम्यान, जयंत पाटील यांच्या निवासस्थानी गुरुवारी रात्री उशिरापर्यंत राष्ट्रवादी काँग्रेसचा कोअर कमिटीची बैठक पार पडली.
या बैठकीला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार सुप्रिया सुळे, मुख्य प्रवक्ते आणि अल्पसंख्याक विकासमंत्री नवाब मलिक, आरोग्यमंत्री राजेश टोपे, गृहमंत्री अनिल देशमुख, गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड उपस्थित होते. या बैठकीत धनंजय मुंडे यांच्यावरील आरोपांबाबत सविस्तर चर्चा झाल्याची माहिती मिळत आहे. या बैठकीनंतर जयंत पाटील यांनी पक्षाची भूमिका मांडली आणि पक्ष पूर्णपणे धनंजय मुंडे यांच्या पाठीशी उभा असल्याचं दिसून आलं.
हा ब्लॅकमेलिंगचा प्रकार- पाटील
“रेणू शर्मा यांनी धनंजय मुंडे यांच्यावर जे गंभीर आरोप केले आहेत, ती एक विचारपूर्वक केलेली व्यूहरचना आहे. ब्लॅकमेलिंग केलं जात आहे. यामागे राजकीय षडयंत्र आहे. त्या महिलेविरोधात खुद्द भाजपच्याच नेत्यांनी आरोप केले आहेत. या प्रकरणाचा तपास पोलिस करत आहेत. मला पूर्ण विश्वास आहे की, धनंजय मुंडे यांना ब्लॅकमेल केलं जात आहे. या तपासातून काही निष्पन्न होणार नाही. पोलिस योग्यरित्या तपास करतील अशी अपेक्षा आहे,” असं जयंत पाटील गुरुवारी रात्री झालेल्या बैठकीनंतर म्हणाले.
शरद पवार काय म्हणाले?
“धनंजय मुंडे यांच्यावरील आरोपांचं स्वरुप गंभीर आहे. पक्ष आणि पक्षप्रमुख म्हणून आम्ही चर्चा करुन योग्य निर्णय घेऊ. त्याचवेळी कोणावरही अन्याय होणार नाही हे सुद्धा पाहू” असं शरद पवार म्हणाले. यावेळी शरद पवारांना मुख्यमंत्र्यांची काय भूमिका आहे असंही विचारण्यात आलं. त्यावेळी शरद पवारांनी रोखठोक भाष्य केलं. मला आधी माझा निर्णय घेऊ द्या, नंतर मुख्यमंत्र्यांचं बघू. आम्हाला आमच्या सहकाऱ्यांशी चर्चा करुन पुढची भूमिका काय असावी, याचा विचाराने निर्णय होईल, असं शरद पवार गुरुवारी म्हणाले.
दरम्यान, धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी भाजप नेत्यांकडून सातत्याने करण्यात येत आहे. आमदार अतुल भातखळकर यांनीतर निवडणूक आयोगाला पत्र लिहून त्यांची आमदारकी रद्द करण्याची मागणी केली आहे. त्यामुळे धनंजय मुंडे यांच्याबाबत राष्ट्रवादी काँग्रेस आज काय निर्णय घेतं हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.