*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्मा सदस्य तथा संस्थापक अध्यक्ष महाकवी कालिदास प्रतिष्ठान पुणे लेखक कवी वि.ग.सातपुते लिखित कवितेचे लेखक विनय पारखी यांनी केलेलं एक सुंदर मनभावन रसग्रहण.*
*‘सुंदरसा एकांत’*
✒️रचना:- वि.ग.सातपुते (भावकवी).
भावकवी वि.ग.सा. सरांच्या ‘सुंदरसा एकांत’ या कवितेचे रसग्रहण सौ. ऐश्वर्या डगांवकर मॅडम यांनी अगदी कमी वेळात आणि अतिशय सुंदर आशयघन शब्दात केले आहे. त्यामुळे मलाही या भावकवितेचा मोह आवरता आला नाही आणि मलाही या कवितेवर भाष्य करावेसे वाटले.
रसग्रहण म्हणजे कवीने कमीतकमी शब्दांत रचलेल्या काव्याला तेवढ्याच ताकदीच्या परंतु कवितेचा भावार्थ लोकांपर्यंत पोहचावा या उद्देशाने कमीतकमी शब्दांत केलेले योग्य ते वर्णन असा आहे आणि हे काम सौ.ऐश्वर्या डगांवकर मॅडम यांनी अतिशय सुरेख पद्धतीने केले आहे. संत साहित्याचा अभ्यास केलेले भावकवी आप्पा ह्यांचा या कवितेतील एक एक शब्द तेवढाच विचार करून त्यांनी वापरला आहे याची प्रचिती ही कविता वाचताना येते. मी जे काही या कवितेवर विस्तृतपणे भाष्य करणार आहे ते म्हणजे लहानतोंडी मोठा घास घेतो आहे याची मला पुरेपूर जाणीव आहे.
अप्पांच्या या रचनेत आलेले “एकांत हा सुंदरसा निवांत, आसक्ती, जीव हा गूढ सृष्टीत रमलेला, आलिंगता अव्यक्त स्मृतींना, त्यांनी दिलेला भ्रमराच्या उदाहरणाचा दाखला, आत्मसमर्पणाचा ध्यास, अश्राप फुलांचे कोमेजणे हे वास्तवादी उदाहरण, निर्माल्य, गंगौध, प्रवाही प्रांजळी तल्लीन होता, मोक्षानंद आणि भावशब्दी पावित्र्य” यांसारखे अतिशय तोलून, मोजून, मापून वापरलेले आशयघन शब्द मनाचा ठाव घेतात आणि त्यावर आपल्याला विचार करायला लावतात की आप्पांनी हेच सारे शब्द का बरे इथे वापरले असतील आणि तिथून आप्पांनी रचलेल्या रचनेचा अभ्यास करणे सुरु होते.
एकांत हा सुंदरसा निवांत
आज आसक्ती उरली नाही
मन भावुक नादिष्ट, छंदिष्ट
भवताला या जुमानत नाही
‘एकांत हा सुंदरसा निवांत’ यातील एकांत म्हणजे निर्जन ठिकाणी, तनहा, शांत अथवा एकटा असा त्याचा वर वर सामान्य वाटणारा अर्थ. परंतु आप्पांना एकाकीपण जाणवत नाही, ते एकटे नाहीत मग एकांत म्हणजे काय यासाठी सौ.ऐश्वर्या डगांवकर मॅडम यांनी त्यासाठी छान शब्द वापरला आहे ‘आत्ममग्न’. कारण एकांतात असलेली व्यक्ती एकटी असेलच असे नाही. एकाकीपण हे मनाच्या दरिद्रीपणाचे लक्षण आहे आणि एकांत-निवांत हे मनाच्या श्रीमंतीपणाचे लक्षण आहे. कारण एकटेपण हे खायला उठतं आणि मिळालेला एकांत-निवांत आपलं जीवन सुसह्य करतं. एकटेपण, एकाकीपण हे परिस्थितीमुळे जीवाच्या वाट्याला येते आणि एकांत-निवांत हा साधायचा असतो. एकांत या शब्दाची जर आपण फोड केली तर एक+अंत =एकांत अशी असेल. म्हणून एकांत हा संख्या दर्शक आहे. ‘मी’ हे या एक-१ संख्येचे प्रतीक आहे. आपण, आम्ही म्हणजे एकापेक्षा जास्त. म्हणजेच ज्या वेळी त्या एकाचा म्हणजेच ‘मी’ चा अंत होतो त्यावेळीच एकांत साधता येतो. म्हणजेच ‘मी, माझे’ यांचा अंत झाला तरच एकांत-निवांत जिवाच्या वाट्याला येतो. हा एकांत आपल्याला कधी साधता येतो तर ज्यावेळी आपण देहबुद्धीकडून देवबुद्धीकडे जाण्याचा प्रवास करतो त्यावेळी तो साधता येतो. नित्यनेमाने आपण ज्यावेळी हा प्रवास करतो त्यावेळी आपल्याला समजतं एकांत म्हणजे आपला आपल्या मनाशी असलेला आंतरिक संवाद म्हणजेच ‘आत्ममग्न’ होणे.
आसक्ती हा मानवी मनाच्या भावनेचा एक पैलू आहे. अध्यात्मक वाढीस आसक्ती अडथळा ठरू शकतो. आसक्ती ही मनुष्याला जन्म आणि मृत्यूच्या चक्रात बांधून ठेवते. आसक्ती म्हणजे भ्रम, मोह, माया यामुळेच मनुष्याला नकारात्मकता येते. आसक्ती ही नकारात्मक नसली तरीही तिच्यातील आनंदाचे सेवन न केल्यास किंवा आसक्तीचा अतिरेक अवलंबल्यास मानवाच्या वाट्याला दुःख येते आणि ती नकारात्मकतेकडे झुकायला मानवाला भाग पाडते म्हणूनच श्रीमद्भगवत्गीतेत भगवान श्रीकृष्ण आपल्याला आसक्ती पासून अलिप्त राहायला सांगतात. म्ह्णूनच मनाचे जे विकार आहेत त्यांपासून कवी दूर दूर राहण्याचा प्रयत्न करतो आणि त्याला हवा असलेला एकांत त्याला साध्य होतो. येथे अलिप्ततेचा अर्थ उदासीनता नसून आपल्या दृष्टिकोनात बदल करून भौतिक जगापासून अलिप्त होऊन आंतरिक शांती आणि आध्यात्मिक पूर्णता मिळविणे हा आहे. येथे अलिप्त हा आसक्तीवर असलेला उतारा आहे.
एकदा का आत्ममग्न अवस्थेत पोहचलेल्या मनुष्याला ‘त्या अव्यक्त’ परमात्म्याचा म्हणजेच त्याच्या आत विसावणाऱ्या आत्मारामाचा ध्यास लागला आणि तो त्याच्यात रमला की मग तो सर्व भार त्याच्यावर सोडून तो निवांत होतो. आसक्तीच्या भ्रमातून मुक्तीचा मार्ग जो भगवत्गीतेने सांगितला आहे तो कवीला इथे अभिप्रेत आहे. अशा या परमात्म्याच्या चिंतनात आकंठ बुडून गेलेल्या मनुष्याला मग मी, माझे, तू, तुझे असे कुठलेच भान राहात नाही. एकांत हे सुख आहे आणि अपेक्षा या दुःख आहेत म्हणूनच संत साहित्याचा गाढा अभ्यास असलेले भावकवी विगसा यांना या वरील ओळी स्फुरल्या असतील असे मला वाटते.
जीव हा गुढ सृष्टीत रमलेला
त्याला कुणाचीच पर्वा नाही
आलिंगता अव्यक्त स्मृतींना
पूर आसवांचा थांबत नाही
असा हा एकांतात आत्मारामाशी आत्ममग्न झालेल्या जीवाला ‘त्या अव्यक्त असलेल्या हरीचा’ ध्यास लागला आहे. लागला आहे म्हणण्यापेक्षा ‘त्या हरीचा’ ध्यास जडला आहे. त्याला भेटण्यासाठी त्यांचे मन आनंदाने उचंबळून आले आहे. जळी, स्थळी, काष्टी, पाषाणी सर्वत्र त्यांना तोच वावरत असताना दिसत आहे.
अव्यक्त म्हणजे जो दृश्यमान नाही परंतु त्याला आपण आपल्या ज्ञानेंद्रिये आणि कर्मेद्रियें द्वारे त्याची अनुभूती घेऊ शकतो असा. त्याच्या या अव्यक्त गुणांमुळे तो सर्वांत सूक्ष्म आहे आणि ती सूक्ष्मता ही प्रकृतीचा अंतिम आधार आहे अशा अव्यक्तरूपी परमेश्वराच्या स्मृतींना त्याच्या अशा या अव्यक्त रुपाला भेटायला त्यांचे डोळे आसुसले आहेत.
वर वर पाहता स्मृती म्हणजे मेमरी, आठवणीं ज्याची नोंद आपण आपल्या मेंदूतील पेशींच्या साहाय्याने करतो त्या गोष्टी म्हणजेच त्या आठवणी. स्मृतींचे कार्य कसे चालते ते आपण बघूया. समजा आपल्या मनात एखाद्या फुलाचा विचार आला तर त्याच्या रंग, रूप, गंधांद्वारे आपण त्या फुलाला आपल्या ‘आठवणींशी पडताळून’ ओळखू शकतो. यालाच आपल्या मनावर कोरल्या गेलेल्या त्या फुलाच्या ‘भावना’ असं म्हणतो. मग कदाचित त्या भावनांत एखादी आपली जुनी आठवण आपल्याला आठवते तिला आपण ‘स्मृती’ असे म्हणतो. कदाचित ती आठवण आपल्याला सुख देणारी असेल तर आपल्या शरीरावर त्याचा प्रभाव पडतो आणि त्या स्मृतीचे ‘मूर्त कार्य’ चालू होते. त्या आठवणीने आपल्याला हसू येते याला आपले ‘वर्तन’ असे म्हणायचे आणि ते फुल दुसऱ्या बागेतील आहे आणि त्यामुळे ते आपण तोडणे योग्य नाही म्हणून आपण ते फुल तोडले नाही याला ‘तारतम्य’ असे म्हणायचे. म्हणजेच मूर्त आणि अमूर्त अशा ज्या संवेदनांचा आपल्या शरीरावर वेगाने प्रभाव पडतो त्यालाच ‘स्मृती’ असे म्हणायचे. परंतु इथे विगसा सरांनी अत्यंत सखोल असा विचार करून अत्यंत खुबीने ‘स्मृती’ हा शब्द वापरला आहे. म्हणजे आपल्या अंगी असलेल्या त्या गूढ शक्तीचे त्याच्या आलेल्या अनुभूतींची आठवण करत त्याचे ‘स्मरण करणे’ असा आहे.
अशा या अव्यक्त रुपाला आतुरतेने भेटायला त्यांचे डोळे आसुसले आहेत. त्या आतुरतेने त्यांच्या डोळ्यांतून निरंतर अश्रुधारा वाहात आहेत व त्याला भेटण्यासाठी त्यांचा जीव व्याकुळ झाला आहे.
कळ्याकळ्यात भ्रमर गुंतता
तयांना कशाचेच भान नाही
ध्यास एक आत्मसमर्पणाचा
दुजा कोणताच विचार नाही
संत ज्ञानेश्वरांनी पहिल्या अध्यायात फुलातील परागकण भुंगे घेऊन जातात, परंतु त्या फुलांना, त्यांच्या पाकळ्यांना त्याची जराही खबर नसते परंतु तोच भुंगा अति मोहापायी त्या फुलांच्या पाकळीत अडकतो आणि बंदिस्त होतो. कारण त्यावेळी त्याला त्याचा मोह आवरता येत नाही तो मोहाकडे आकर्षित होतो आणि तोच मोह त्याचा घात करतो असा दृष्टांत दिला आहे. त्याचेच उदाहरण देत कवी म्हणतात एकांतात बंदिस्त झालेल्या भ्रमराला त्यावेळी आत्मसमर्पणाचा विचार मनात येतो परंतु मानवाला मिळालेल्या एकांतात तो निवांत असताना त्याच्या मनात हळुवार क्षण डोकावतात आणि हाच तो क्षण असतो स्वतःला सावरण्याचा. एखाद्या भ्रमराप्रमाणे मनुष्याचे जीवन आहे ज्याला ही मोहाची नदी ओलंडता आली, पार करता आली तो या मोहातून तरला आहे आणि हे कधी होऊ शकते ज्यावेळी श्रद्धेने, भक्तिभावाने आपला भाव आपण परमेश्वराच्या चरणी आदरपूर्वक त्याला नतमस्तक होऊन समर्पित करतो त्याचवेळी आपल्या मनात परमेश्वराच्या व्यतिरिक्त कोणताही भाव मनाला शिवत नाही. थोडक्यात ती जी आपली स्थिती असते तो असतो जीवाचा शिवाशी झालेला संवाद आणि त्यावेळेला आपल्या मनात दुसरा कोणताही भाव स्पर्श करत नाही. पण हे फक्त साध्य होऊ शकत ज्यावेळी आपण एकांत-निवांत असतो असे कवीला म्हणायचे आहे.
कोमेजणे या अश्राप फुलांचे
कुणा सहृदाला उमजत नाही
निर्माल्यातही श्रद्धा देवत्वाची
गंगौघाही त्याविण शांती नाही
जन्माला आलेल्या प्रत्येकाचा अंत आहे. परंतु या जन्म-मरणाच्या फेऱ्यात आपण कसं जगायचं हे ज्याचे त्याने ठरवायचे असते. यासाठी भावकवी विगसा इथे फुलांचे उदाहरण देतात. आता फुलाचे उदाहरण का दिले आहे याचा विचार करू.
एखाद्या फुला प्रमाणे झाडावर बसून कोमेजून जायचं की ईश्वराच्या चरणी नतमस्तक होऊन त्याच निर्माल्य व्हायचं. याचा विचार सुरु होतो त्याचवेळी आपल्या असं लक्षात येत की निर्माल्य म्हणजे देवाला आदरपूर्वक समर्पित केलेली म्हणजेच वाहिलेली फुलं दुसऱ्या दिवशी कोमेजून जातात, ती शिळी होतात कारण कोमेजून जाणे हा फुलांचा स्वधर्म आहे. ती शिळी झालेली फुलं ते निर्माल्य आपण पायदळी तुडवत नाही कारण देवापाशी समर्पित झाल्याने त्याला देवत्व प्राप्त झाले आहे अशी आपली धारणा असते. त्याला त्या फुलांना आपण पवित्र समजून ते निर्माल्य आपण नदीत किंवा वाहत्या पाण्यात विसर्जित करतो आणि तसे केल्याने पवित्र असलेल्या गंगेच्या प्रवाहाला सुद्धा शांती मिळते असा याचा सरळ सरळ अर्थ.
परंतु इथे गंगौध हा शब्द सरांनी जाणीवपूर्वक वापरला आहे. कारण सखोल सात्विक आणि आशयघन शब्द वापरून लेखन करताना कवी आपल्या मनातल्या नाहीतर अंतर्मनातल्या अनुभूतींना आपल्या समोर प्रस्तुत करत असतो. इथे तर ते नदी किंवा वाहते पाणी सुद्धा म्हणू शकले असते परंतु त्यांनी ‘गंगौध’ हा शब्द वापरला आहे. गंगौध म्हणजे गंगेचे वाहते पाणी हा त्याचा खरा अर्थ. परंतु कवी बा.भ.बोरकर सांगायचे जसा कवी आपल्या लेखणीने प्रगल्भ होतो तसे वाचकांनी सुद्धा कवीने सांगितलेल्या विचारांनी जाऊन प्रगल्भीत व्हायला पाहिजे. ‘गंगौघ’या शब्दाची असीम व्याप्ती सांगतांना ते म्हणतात ‘गंगौध’ म्हणजे ‘जाणिवेचे रस्ते सोडून नेणिवेच्या मार्गाने जाणे’. आपल्या सर्व आठवणी, स्मृती या जाणिवेत जमा होतात आणि काही कालांतराने त्या विस्मरणाने त्या जाणिवा नष्ट होतात. परंतु आपल्याच अंतर्मनात असलेल्या नेणीवे बद्दल आपण उदासीन असतो कारण आपण तिकडे लक्षच देत नाही.
जणिव नेणीव या विषयावर बोलताना आपल्या असं लक्षत येतं की विगसा ज्यावेळी भावकविता लिहितात त्यावेळी ते कवितेला मूर्त स्वरूप देताना जाणीवपूर्वक शब्दांची रचना करतात. परंतु अनुभवसिद्ध आणि इंद्रिये आणि संवेदनांच्या विश्वातून जन्मलेली त्याची कविता वाचताना ती आपल्याला जाणिवे पासून नेणीवे पर्यंतचा प्रवास घडवते. नेणीव म्हणजे दैवी समीकरणांनी व्यापलेला एक अमूर्त, अव्यक्त, अस्तित्वहीनतेचा संभ्रम निर्माण करणारी जागा, जिथल्या तारा झंकारल्या की सतारीच्या तारांप्रमाणे जाणिवेच्या भागातील स्पंदने आपोआप जागृत होतात आणि मग आपल्याला जाणवते ती कवितेला जन्म देण्यासाठी त्यांनी शब्दांची ओंजळ करून अनुभवसिद्ध केलेली भावकविता.
प्रवाही प्रांजळी तल्लीन होता
जीवाला दुजा मोक्षानंद नाही
अंतरात मौनास कवटाळताना
भावशब्दी पावित्र्य भंगत नाही
अशा या ओंजळीत ते आपल्या अनुभवसिद्ध लेखणीतून जन्मलेले शब्द त्या शब्दांचे अर्ध्य आपल्या रसिकांसमोर अर्पण करतात आणि त्यातून त्यांना जो काही आनंद मिळतो तो आनंद मोक्षप्राप्तीच्या आनंदापेक्षाही कमी राहात नाही. त्यांच्या अंतर्मनात वसलेला ईश्वर म्हणजेच त्यांच्या कवितांचे मायबाप रसिक प्रेक्षकांना ते आपलं काव्य समर्पित करतात. थोडक्यात ईश्वरास समर्पण केलेले त्यांचे शब्द अखेर मौन होतात आणि परमात्म्याशी तादात्म्य पावलेल्या भावशब्दांचे पावित्र्य भंग पावत नाही.
अशा अतिशय सुंदर शब्दांनी परमेश्वराच्या चरणी अत्यंत नम्रपणे लिन होऊन अत्यंत समर्पित भावनेने रचलेली ही रचना मानवाच्या मनस्थितीचे यथोचित वर्णन करते. भौतिक सुखांपासून अलिप्त राहात निष्काम कर्म करत षड्रिपूंचा त्याग करत आपले जीवन कसे जगता येते याचे कमीतकमी शब्दांत केलेले यतार्थ वर्णन म्हणजे ही ‘सुंदरसा एकांत’ ही कविता.
(c) विनय पारखी, अंधेरी (प), मुंबई
मो. ९८१९६७३३२०