You are currently viewing नाम.दिपक केसरकरांनी मारला चौकार..तर राजन तेलींची पराभवाची हॅट्रिक

नाम.दिपक केसरकरांनी मारला चौकार..तर राजन तेलींची पराभवाची हॅट्रिक

*नाम.दिपक केसरकरांनी मारला चौकार..तर राजन तेलींची पराभवाची हॅट्रिक*

*दिपक केसरकर यांचा आत्मविश्वास आणि महायुतीच्या कार्यकर्त्यांचे कष्ट जिंकले*

सावंतवाडी मतदारसंघात चौरंगी लढत असा काहीसा प्रचार आणि प्रसार अवघ्या महाराष्ट्रभर झाला. सावंतवाडीचे लाडके नेतृत्व असलेले नाम. दिपक केसरकर यांच्यासाठी धोक्याची घंटा असा संभ्रम संपूर्ण मतदारसंघात पसरविला गेला. नाम.रवींद्र चव्हाण यांची अपक्ष उमेदवार विशाल परब यांना साथ, खास.नारायण राणे केसरकरांना मदत करणार का..? असे प्रश्न उपस्थित केले गेले. परंतु खास.नारायण राणे, नाम.रवींद्र चव्हाण हे दोघेही भाजपाचे नेते आपल्या पाठीशी राहतील आणि आपला मोठ्या मताधिक्याने विजय होईल एवढेच नव्हे तर जिल्ह्यात महायुतीच्या तिन्ही जागा निवडून येतील असा आत्मविश्वास नाम. दिपक केसरकर यांनी व्यक्त केला होता. नाम. दिपक केसरकरांचा हाच आत्मविश्वास आज जिंकल्याचे आपण पाहत आहोत. यासाठी खास.नारायण राणे, नाम.रवींद्र चव्हाण, नाम.नितेश राणे यांच्यासह शिवसेना आणि भाजपाच्या कार्यकर्त्यांनी घेतलेली प्रचंड मेहनत कमी आली असून पहिल्या फेरीपासून दोन हजार मतांनी घेतलेली आघाडी पुढे पुढे वाढत २३ फेरी अखेर नाम.दिपक केसरकर यांचा तब्बल ३९७२७ मतांनी मोठा विजय झाला आहे.
गेल्या पंधरा वर्षांत सावंतवाडी मतदारसंघ पिछाडीवर पडला, मतदारसंघाबरोबर जिल्ह्याचा विकास रखडला, केसरकर यांना मतदारांनी आमदार, मंत्री केले परंतु केसरकर विकास करण्यात कमी पडले असा अपप्रचार विरोधकांनी केला आणि नाम.केसरकरांची प्रतिमा मलिन करण्याचा केविलवाणा प्रयत्न केला. सावंतवाडी मतदारसंघात केसरकर यांच्या विरोधात उभे राहिलेले दोन्ही उमेदवार हे सावंतवाडी मतदारसंघातील स्थानिक नसल्याने लोकांनी त्यांचा अपप्रचार एका कानाने ऐकून दुसऱ्या कानाने सोडून दिला. त्यामुळे मतदारसंघात प्रचंड प्रमाणात वाटलेला पैसा सुद्धा विरोधकांना विजयाच्या समीप नेऊ शकला नाही. मतदारांनी सुसंस्कृत, सुशिक्षित, शांत, संयमी व्यक्तिमत्व अशी ओळख असलेल्या आणि महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात मानाने स्थान मिळवलेल्या, सावंतवाडीची शान असलेल्या नाम. दिपक केसरकर यांच्या पारड्यात विजयाचे दान टाकले आणि सावंतवाडी मतदारसंघाचा आमदार कसा असावा तर दिपक केसरकर यांच्या सारखाच असावा… हेच दाखवून दिले आहे.
नाम. केसरकर यांच्या विरोधात विरोधकांनी अपप्रचार करून रान उठविले. महाराष्ट्र सरकारच्या माध्यमातून जर्मनीमध्ये नोकऱ्या हा युवकांची महत्त्वाकांक्षा पूर्ण करणारा उपक्रम युवकांनी उचलून धरला पण, परदेशात नोकऱ्या देऊन आपल्या मुलांना कुटुंबापासून वेगळे करतात असा अपप्रचार करून केसरकरांना चारही बाजूंनी घेरण्याचा प्रयत्न केला गेला. एकीकडे बेरोजगारीच्या नावाने ओरड मारायची आणि दुसरीकडे परदेशात नोकऱ्या देऊन घरे ओस पडली असा गळा काढायचा हे उद्योग जनतेने बरोबर ओळखले आणि अपप्रचार करून मतदारसंघाचे नुकसान करणाऱ्यांना मतदारसंघातून तिसऱ्यांदा पराभूत करून जवळपास पुन्हा इथे उभेच राहू नये यासाठी हद्दपार केले. त्यामुळे पराभवाची हॅट्रिक साधण्याचा राजन तेली यांना योग आला आणि एकाच उमेदवाराला एक दोन नव्हे तर तब्बल तीन वेळा पराभूत करण्याचा विक्रम देखील नाम. दिपक केसरकर यांच्या नावावर लागला आहे.
“काही झाले तरी मी विधानसभा लढणार” हा हट्ट विशाल परब यांनी पूर्ण केला. निवडणुकीच्या आठवडाभर आधीच पत्रकारांना पेढे वाटून आपणच जिंकणार हा अतीआत्मविश्वास त्यांना निवडणूक म्हणजे काय असते..? हे शिकवून गेला आणि विशाल परब यांनी घाई न करता आधी राजकारण कसे केले पाहिजे याचा अनुभव घेतला पाहिजे हे सुद्धा दाखवून दिले. विशाल परब हे वयाने लहान असल्याने त्यांना राजकीय भविष्य आहे, निवडणुका लढण्यासाठी अजून बराच काळ शिल्लक आहे. परंतु निवडणूक जिंकणे म्हणजे पैशांच्या जोरावर काहीही करता येते असाच त्यांचा समज झाला होता. परंतु सावंतवाडी मतदारसंघातील जनता सुज्ञ आहे. एवढ्या कमी वयात कोणाचाही पाठिंबा नसताना, राजाश्रय नसताना निवडणुकीत पैशांचा पाऊस पाडण्या एवढा पैसा आला कुठून..? असाच सवाल पैसे घेणारे सुद्धा उपस्थित करत होते. त्यामुळे विशाल परब यांच्या “पैसा फेको तमाशा देखो” हा खेळ केवळ युवा वर्ग आणि पैशांची हाव असलेल्या मतदारांपर्यंतच खेळला गेला. दुसरं म्हणजे त्यांच्यासोबत फिरणाऱ्या कित्येक युवकांना तर स्वतःचे मत देखील नव्हते. अनेक बूथवर अठरा वर्षांखालील मुले बसलेली आढळत होती. त्यांच्यासोबत अनेक चेहरे दिसले तरी ते मतांमध्ये परिवर्तित होणारे नव्हते. त्यामुळे विशाल परब हा जरी “लंबी रेस का घोडा” वाटला तरी ती रेस आजची निवडणूक नव्हती हे मतदारांनी दाखवून दिले. त्यामुळे प्रचंड प्रमाणावर झालेले पैशांचे वाटप शेगडीला पेटण्यासाठी गॅस पुरवू शकले नाही. अनेकांनी केवळ सर्व उमेदवारांच्या कडून मिळणाऱ्या लक्ष्मीचे दर्शन घेतले, पूजन केले तर काहींनी तात्काळ सहली, देवदर्शन अशा कामी लावत सत्कर्म करण्यात खर्ची घातले. निवडणुकीत पैसा कधीही आपल्या सदुपयोगी येत नाही याचाच अनुभव कित्येकांना आला असेल.
आजच्या निवडणुकीचा निकाल अनेकांचे चेहरे उघडे नव्हे नागडे करणारा देखील ठरला. काहींनी भाजपा पक्षाचे कार्यकर्ते म्हणून काम करताना भाजपा मधून निलंबित झालेल्या विशाल परब यांना निवडणूक प्रचारात सर्वतोपरी सहकार्य केले. काहींनी आपले जीवनमान त्यातून सुधारले परंतु, निवडणुकीचा निकाल लागताच तेच चेहरे आपण भाजपचेच कार्यकर्ते आहोत याच आविर्भावात नाम.दिपक केसरकर यांच्या विजयी मिरवणुकीत सामील झाले. त्यामुळे असे दलबदलू कार्यकर्ते बाळगून विशाल परब यांनी केलेले राजकारण हे अपरिपक्वतेचं दर्शन देऊन गेलंच.. पण, तुमची चलती असेपर्यंत तुमची सावली सुद्धा सोबत असते अन् अंधार पडताच ती सुद्धा साथ सोडून जाते याचे उदाहरण याची डोळा याची देही दाखविले.
राष्ट्रवादी(शप) पक्षाच्या नेत्या अर्चना घारे यांनी बंडखोरी करून आपल्या स्वाभिमानाची लढाई म्हणून निवडणूक लढविली परंतु पैशांच्या खेळात त्या कमी पडल्याने किंवा अपक्ष उमेदवाराला मत देऊन आपले मत फुकट जाणार या समजा मुळे मतदारांनी आपले अमूल्य मत त्यांच्या पारड्यात न घालता निवडून येणाऱ्या उमेदवाराच्या पारड्यात घालणे योग्य ठरविले. त्यामुळे सौ.घारे यांना आपले डीपॉझिट देखील वाचविणे शक्य झाले नाही. मागील निवडणुकीत राष्ट्रवादी पक्षाचे पाठबळ असताना देखील प्रेमानंद उर्फ बबन साळगावकर यांना मिळालेले मताधिक्य यावेळी सौ.घारे यांना मिळाले त्यामुळे एकेकाळी राष्ट्रवादीचा बालेकिल्ला असलेल्या सावंतवाडी मतदारसंघात राष्ट्रवादीचे एवढेच मतदार शिल्लक राहिलेत की काय..? असाही प्रश्न निर्माण झाला आहे.
एकंदरीत आजची निवडणूक भविष्यात पैसा असेल त्याच भांडवलदाराने लढवावी अन्यथा मतदार म्हणून केवळ आपले अमूल्य मत (दान..?) करून कर्तव्य निभावावे असा सल्ला देऊन गेल्याचे दिसून आले.

प्रतिक्रिया व्यक्त करा