You are currently viewing कुडाळ-मालवणसाठी १८०० कर्मचारी २७९ मतदानकेंद्रावर रवाना

कुडाळ-मालवणसाठी १८०० कर्मचारी २७९ मतदानकेंद्रावर रवाना

निवडणूक निरीक्षक प्रवीणकुमार थिंद यांनी घेतला आढावा..

कुडाळ :

लोकशाहीचा उत्सव मानला जाणाऱ्या विधानसभा निवडणुकीसाठी उद्या २० नोव्हेंबरला मतदान होतंय. त्यासाठी सिंधुदुर्ग जिल्हा प्रशासन सज्ज आहे. आज कुडाळ मालवण मतदारसंघातील २७९ मतदान केंद्रांवर निवडणूक साहित्य घेऊन सुमारे १८०० कर्मचारी रवाना झाले. त्यांना निवडणूक निर्णय अधिकारी ऐश्वर्या काळूशे यांनी मार्गदर्शन करत शुभेच्छा दिल्या.

कुडाळ मालवण मतदारसंघासाठी कुडाळ हे मुख्य केंद्र आहे. त्यामुळे आज सकाळपासूनच मतदान केंद्रावर मतदान साहित्य घेऊन जाण्यासाठी निवडणूक कर्मचारी तहसील कार्यालयात उभारलेल्या भव्य मंडपात गोळा झाले होते. निवडणूक साहित्य ताब्यात घेतल्यावर सर्व कर्मचाऱ्यांना निवडणूक निर्णय अधिकारी ऐश्वर्या काळूशे यांनी मार्गदर्शन केलं. मतदानावेळी नेमकी कोणती काळजी घ्यावी याविषयी त्यांनी मौलिक सूचना दिल्या. यावेळी सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी विरसिंग वसावे, वर्षा झालटे, शीतल जाधव उपस्थित होत्या. मतदान निरीक्षक प्रवीणकुमार थिंद यांनीसुद्धा यावेळी भेट देऊन आढावा घेतला.

तहसील कार्यलयाच्या बाजूच्याच मैदानावर निवडणूक कर्मचाऱ्यांना घेऊन जाण्यासाठी राज्य परिवहन महामंडळाच्या बसेस उभ्या होत्या. सर्व कर्मचारी मग साहित्य घेऊन आपापल मतदान केंद्र असलेल्या बस मध्ये बसण्यासाठी रवाना झाले. या कुडाळ मालवण मधील २७९ मतदान केंद्रावर घेऊन जाण्यासाठी एकूण ४३ एसटी बसची व्यवस्था करण्यात आली होती. त्याशिवाय ४५ झोन साठी ४५ जीपची व्यवस्था करण्यात आली आहे. मतदान केंद्र घेऊन जाण्यासाठी कुडाळ तालुक्यात २२ तर मालवण तालुक्यात २ अशा २४ जीपची व्यवस्था करण्यात आली आहे. एकूण १ हजार २३२ निवडणूक कर्मचारी आणि प्रत्येक केंद्रावर दोन असे एकूण ५५८ पोलीस कर्मचारी या वाहनातून आपापल्या मतदान केंद्रावर रवाना झाले. कुडाळ-मालवण मतदारसंघात मालवण तालुक्यात १ ते १२२ आणि कुडाळ तालुक्यात १२३ ते २७९ क्रमांकाची मतदान केंद्र आहेत.

कुडाळ मालवण मतदार संघात एकूण २ लाख १७ हजार १८६ मतदार असून त्यात महिला मतदार १ लाख ९ हजार २२१ आणि पुरुष मतदार १ लाख ७ हजार ९६४ तर एक तृतीयपंथी मतदार आहे. एकंदरीतच लोकशाहीच्या या महाउत्सवासाठी कुडाळ मालवण मतदारसंघ निवडणूक निर्णय अधिकारी ऐश्वर्या काळूशे यांच्या मार्गदर्शनाखाली सज्ज झाला आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा