*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्माननीय सदस्य ज्येष्ठ लेखिका कवयित्री सौ ऐश्वर्या डगांवकर लिखित कविता रसग्रहण*
*सुंदरसा एकांत*
✒️ कवी: विगसा
***************
एकांत हा सुंदरसा निवांत
आज आसक्ती उरली नाही
मन भावुक नादिष्ट , छंदिष्ट
भवताला या जुमानत नाही
जीव हा गुढ सृष्टीत रमलेला
त्याला कुणाचीच पर्वा नाही
आलिंगता अव्यक्त स्मृतींना
पूर आसवांचा थांबत नाही
कळ्याकळ्यात भ्रमर गुंतता
तयांना कशाचेच भान नाही
ध्यास एक आत्मसमर्पणाचा
दुजा कोणताच विचार नाही
कोमेजणे या अश्राप फुलांचे
कुणा सहृदाला उमजत नाही
निर्माल्यातही श्रद्धा देवत्वाची
गंगौघाही त्याविण शांती नाही
प्रवाही प्रांजळी तल्लीन होता
जीवाला दुजा मोक्षानंद नाही
अंतरात मौनास कवटाळताना
भावशब्दी पावित्र्य भंगत नाही
************************
*रचना क्र. १८६ /१२/११/२०२४*
*©️वि.ग.सातपुते.(भावकवी)*
📞 *( 9766544908 ) बेंगलोर*
——————————————–
*सुंदरसा एकांत*
*-रसग्रहण-*
कवी –वि.ग.सा. आत्ममग्न अवस्थेत पोचलेल्या मनुष्याला परमात्म्याचा ध्यास लागला आहे.त्याची आता ब्रह्मानंदी टाळी लागली आहे.
एकांतात रमलेला तो आता निवांत झाला आहे .निरासक्त झाला आहे.मन परमात्म्याचा ध्यासात गुंतले आहे.त्याला ईश्वराचा नाद ,छंद लागल्याने तो
भान हरपला आहे.कुणालाच जुमानत नाही.
त्या गुढ शक्तीचा त्याला ध्यास लागला आहे.त्याला आता कुणाचीच पर्वा नाही.आतापर्यंत अव्यक्त अशा स्मृतींना भेटण्यासाठी नयन आतुरले आहे.त्या आतुरतेतच डोळ्यातून अश्रूधारा निरंतर वहात आहे.जीव ” त्या “ला भेटण्यास
व्याकूळ झाला आहे.
ज्याप्रमाणे भ्रमर रसपान करण्यासाठी कळीमध्ये स्वतः ला समर्पित करतो.तोच भाव परमेश्वराला स्वतःला समर्पण करण्यात जाणवतो.त्यात स्वतःचे भविष्य काय याचा विचार नसतो.
परंतु कोमेजणं हा फुलांचा स्वधर्म आहे. तो कुणासही उमजत नाही.निर्माल्यातही देवत्वाची श्रद्धा आहे.देवावर चढविलेल्या फुलांना आपण पायदळी तुडवत नाही कारण त्यातही देवत्व निर्माण होतं.म्हणून ते निर्माल्य आपण नदीत विसर्जित करतो.त्याशिवाय नदीही पवित्र होत नाही.गंगेच्या प्रवाहाला सुद्धा त्या विना शांती मिळत नाही.देवाच्या निर्माल्यामुळे तो स्वतःस पवित्र मानतो.
गंगेच्या पाणी ओंजळीत भरताना तल्लीन होऊन अर्घ्य देताना जो आनंद मिळतो तो मोक्षापेक्षा कमी नाही .याचाच अर्थ असा की ईश्वरास समर्पण भाव निर्माण झाला की अंतरात एक मौन निर्माण होते.आत्म्याचा परमात्म्याशी संवाद साधला जातो.. अशावेळी शब्दांची गरजच नाही.त्या मौनापुढे शब्दांत व्यक्त होताना न समर्पण भावाचे पावित्र्य भंग होत नाही.
अतिशय सुंदर परमेश्वर चरणी लीन होताना मानवाच्या मनस्थिती चे वर्णन समर्पक उदाहरणे देऊन रचलेले हे काव्य मनास भावूक करते. त्याचप्रमाणे ईश्वरचरणी समर्पण करतांना षड्रिपूंचा त्याग करून ,भौतिक सुखांचा त्यागून निष्काम होणे गरजेचे असते हा संदेश पण आपल्याला या काव्यातून मिळतो.
*सौ ऐश्वर्या डगांवकर इंदूर* *(मप्र)*