शर्पे येथील तरुणाचा नापणे धबधब्यात बुडून मृत्यू…
वैभववाडी
मित्रांसोबत नापणे धबधबा येथे फिरण्यासाठी गेलेल्या तरुणाचा पाण्यात बुडून मृत्यू झाला आहे. विक्रम विठोबा नमसे वय वर्ष 30 राहणार शेर्पे भट्टवाडी असे या तरुणाचे नाव आहे. ही घटना शनिवारी दुपारी २ वाजण्याच्या सुमारास घडली. मयत विक्रम नमसे हा आपल्या दोन मित्रासह गोठणे नदीवरील नापणे येथील धबधब्यावर फिरलायला गेला होता. तिथे गेल्यानंतर त्याला पाण्यात अंगोळी करण्याचा मोह झाला. मित्रा समवेत तो धबधब्याच्या वरच्या बाजूला अंगोळीसाठी पाण्यात उतरला. मात्र त्याला पाण्याचा अंदाज न आल्यामुळे तो पाण्यात बुडाला. त्याला पोहताही येत नव्हते. त्याच्या मित्रांनी त्याला वाचवण्याचा प्रयत्न केला. मात्र तोपर्यंत तो मयत झाला. मयत विक्रम आपल्या आई वडिलांसमवेत शेर्पे येथे राहात होता. आई वडील आजारी असतात. तो मोलमजुरी करून कुटूंबाचा उदरनिर्वाह करीत होता. तर त्याचा एक भाऊ कामानिमित्त मुंबई येथे राहतो. घटनेची माहिती मिळताच वैभववाडी पोलीस ठाणेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील अवसरमोल यांनी आपल्या सहकारी पोलीस कर्मचारी बिलपे, उद्धव साबळे, महिला पोलीस श्रीमती पाटील यांनी घाटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. ग्रामीण रुग्णालय वैभववाडी येथे शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला.
नापणे धबधबा हा बारमाही वाहणारा धबधबा म्हणून सुप्रसिद्ध असून या धबधब्यावर वर्षभर पर्यटकांची वर्दळ सुरू असते. या धबधब्यावर यापूर्वीही अशाप्रकारे पोहण्यासाठी पाण्यात उतरलेल्या पर्यटकांचा पाण्याचा अंदाज न आल्याने पाण्यात बुडून मृत्यू झाला आहे. धबधब्यावर सुरक्षितेच्या दृष्टिकोनातून प्रशासनाकडून उपाय योजना करणे आवश्यक आहे तसेच आनंद लुटताना पर्यटकांनीही काळजी घेणे गरजेचे आहे.