जेष्ठ साहित्यिक पद्मश्री मधु मंगेश कर्णिक यांनी बजावला मतदानाचा हक्क
लोकशाही बळकट करण्यासाठी सर्वांनी मतदान करा
सिंधुदुर्गनगरी
मतदान हा आपला हक्क व कर्तव्य आहे. भारतीय लोकशाही अधिक बळकट करण्यासाठी प्रत्येक नागरिकाने आपला मतदानाचा हक्क बजवावा असे आवाहन ज्येष्ठ साहित्यिक पद्मश्री मधु मंगेश कर्णिक यांनी केले.
महाराष्ट्र विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी २० नोव्हेंबर रोजी मतदान होणार आहे. या निवडणुकीमध्ये मतदानाची टक्केवारी वाढण्यासाठी भारत निवडणूक आयोग व जिल्हा प्रशासन विविध उपाय योजना राबवित आहे. याचाच भाग म्हणून भारत निवडणूक आयोगाने ८५ वर्षांवरील ज्येष्ठ नागरिक व दिव्यांग मतदार यांना गृह मतदानाव्दारे मतदान करण्याची सुविधा उपलब्ध करुन दिली आहे. या अंतर्गत आज २६८- कणकवली विधानसभा मतदार संघात ज्येष्ठ साहित्यिक मधु मंगेश कर्णिक यांनी करुळ येथील आपल्या निवासस्थानी गृह मतदानाचा हक्क बजावला यावेळी ते बोलत होते. ते म्हणाले की, भारत निवडणूक आयोगाने ज्येष्ठ नागरिक आणि दिव्यांगांसाठी गृह मतदानाची सुविधा उपलब्ध करुन दिली आहे. या सुविधेचा लाभ घेऊन मी आज मतदान करुन माझे राष्ट्रीय कर्तव्य पार पाडले आहे. तसेच इतर मतदारांनी सुध्दा आपले मतदानाचे पवित्र कर्तव्य बजावावे असेही आवाहन त्यांनी यावेळी केले.
००००००००