करपलेली भाकरी परतण्याची वेळ : संजय गवस शिवसेना उबाठा तालुकाप्रमुख
वृक्षतोडीच्या अन्यायकारक जुलमी अध्यादेशा विरुद्ध मंत्री दीपक केसरकर यांनी आवाज का उठवला नाही? : केला सवाल
दोडामार्ग
निवडणुकांच्या तोंडावर नेहमीच गोड गोड बोलून लोकांना भूलथापा देण्यास मंत्री दीपक केसरकर यांचा हात कोणीच धरू शकत नाही, त्यांनी मागील पंधरा वर्षे हेच केलं आहे. सध्या सिंधुदुर्ग जिल्ह्यात वृक्ष तोडीस सुमारे ५० हजार रु. दंडआकारण्यात येतो, असा शेतकऱ्यावर अन्यायकारक दंड, जुलमी अध्यादेश काढून, लाकूड व्यावसायिक व बागायतदारांना रोजगारांपासून वंचित करण्याचे महापाप महायुतीच्या शासनाच्या लोकप्रतिनिधी केले असून या निर्णयाला कॅबिनेट मंत्री असताना दिपक केसरकर यांनी का विरोध केला नाही.. असा सवाल शिवसेना उबाठा तालुका प्रमुख संजय गवस यांनी केला आहे.
सावंतवाडी मतदारसंघ हा संपूर्ण पणे बागायत दार व शेतकरी यांनी मोठ्या प्रमाणात व्यापलेला आहे. लाकूड तोड हा पारंपरिक व्यवसाय असून एक झाड तोडले तर ५० झाडे लावली जात आहे. तसेच काजू बागायत व शेतीची मशागत करण्यासाठी काही वेळ, काही प्रमाणात वृक्ष तोड केली जाते. पंरतू आता यावर ही बंधने आली असून.वनविभागाचे पूर्वी असलेला किरकोळ दंड आता ५० हजार रुपये च्या वर गेल्याने बागायतदार, लाकूड व्यावसायिक आर्थिक अडचणीत आले आहेत. विधानसभा सभेत यावर कोणत्याही प्रकारची हरकत घेतली गेली नाही. त्यामुळे या निर्णयाचे कायद्यात रूपांतर झाले. कॅबिनेट मंत्री असताना ही श्री. केसरकर यांनी कोणत्याही प्रकारची ठोस भूमिका यावेळी घेतली नाही. त्यामुळे दोडामार्ग तालुक्यात यांचा मोठा फटका सर्वसामान्य शेतकऱ्यांना व जनतेला बसत आहे. त्यामुळे जनतेच्या विरोधात निर्णयाला साथ देणाऱ्या या आमदाराला आज घरी बसविण्याची आवश्यकता आहे. भाकरी करपरली ती आता परतली पाहिजे असे स्पष्ट आवाहन संजय गवस यांनी जनतेला केलेले आहे.
त्यामुळे आता मशालीला साथ द्या आणि महायुतीचे उमेदवार राजन तेली यांना एकमताने निवडून द्या असे आवाहनही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे चे दोडामार्ग तालुका प्रमुख संजय गवस यांनी केले.