*स्टेपिंग स्टोन ग्लोबल स्कूलमध्ये ‘बालदिन’ हा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करताना बालमेळ्याचे जल्लोषी आयोजन :**
सावंतवाडी
स्टेपिंग स्टोन ग्लोबल स्कूलमध्ये आज दिनाक १४ नोव्हेंबर २०२४ रोजी, भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या जन्मदिनाच्या स्मरणार्थ ‘बालदिन’ हा उत्सव मोठ्या जल्लोषात साजरा करण्यात आला. मुलांचे हक्क, त्यांचे महत्त्व आणि त्यांच्या प्रति समाजाच्या जबाबदाऱ्यांची आठवण करून देणारा हा विशेष दिवस म्हणून बालदिन साजरा केला जातो. मुले हे समाजाचे भविष्य आहेत याकरिता त्यांचे बालपणीचे जीवन आनंदी व सुरक्षित वातावरणात जगू शकतील, तसेच त्यांच्या जीवनालाही योग्य वळण लावून भावी संस्कारी व कृतिशील पिढी निर्माण करणे हा या दिनामागील उद्देश लक्षात घेऊन आज प्रशालेत बालदिन साजरा करण्यात आला. कार्यक्रमाच्या सुरुवातीला शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. प्राची साळगावकर यांनी इयत्ता पहिली व दुसरीच्या विद्यार्थ्यांसमवेत जवाहरलाल नेहरू यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण केला. तसेच विद्यार्थ्यांना चाचा नेहरू यांच्या विषयी माहिती देण्यात आली व बालदिन का व केव्हापासून साजरी केली जाते हे सांगण्यात आले. यानंतर सर्व शिक्षकांनी मिळून विद्यार्थ्यांसाठी ‘ आओ बाच्चो मिलजूलकर हम बालदिन मनायेंगे ‘ हे गीत म्हटले. हे गीत प्रशालेच्या संगीत शिक्षक श्री. कपिल कांबळे यांचे स्वानिर्मित गीत असून या काव्याला संगीत संयोजन देऊन हे गीत विद्यार्थ्यांसमोर सादर करण्यात आले. यावर विद्यार्थ्यांचाही खूप मोठा प्रतिसाद मिळाला. तसेच प्रशालेतील संगीत शिक्षक श्री. कपिल कांबळे यांनी या दिवशी चाचा नेहरू यांच्यासारखा वेश परिधान केला व कार्यक्रमाची शोभा वाढवली. विद्यार्थ्यांनीही यादिवशी छान रंगीबेरंगी वेश परिधान केले होते. त्याचप्रमाणे, इयत्ता पहिली ते सहावीच्या विद्यार्थ्यांच्या इंटरहाऊस काॅम्पेटिशनस घेण्यात आल्या. यामध्ये , इयत्ता पहिली व तिसरीच्या विद्यार्थ्यांची ‘स्पेल बी ‘ ही स्पर्धा घेण्यात आली, इयत्ता दुसरीच्या विद्यार्थ्यांची हस्ताक्षर स्पर्धा, इयत्ता चौथीच्या विद्यार्थ्यांची ज्ञानेन्द्रियांद्वारे वस्तूंची ओळख, इयत्ता पाचवीची गणित प्रश्नमंजुषा तर इयत्ता सहवीच्या विद्यार्थ्यांची रांगोळी स्पर्धा घेण्यात आली. या विविध स्पर्धांचा आस्वाद प्रत्येक विद्यार्थ्यांनी घेतला. या स्पर्धा घेतल्यानंतर प्रशालेतील सर्व शिक्षकांनी मिळून विविध पदार्थांचे स्टॉल घातले. प्रत्येक स्टॉलवर त्या – त्या पदार्थांच्या नावाचे बॅनर लावले गेले. वेगवेगळ्या चविष्ट पदार्थांनी स्टॉलची शोभा वाढवली गेली. प्रशालेत या खमंग पदार्थांचा सुवास पसरला होता. या बलमेळ्याचे चाचा नेहरूंचा वेश परिधान केलेले शालेय संगीत शिक्षक श्री. कपिल कांबळे तसेच, शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. प्राची साळगावकर व शालेय समन्वयक सौ. सुषमा पालव यांनी लहान मुलांसमवेत उद्घाटन केले. विद्यार्थ्यांनी व शिक्षकांनी या बालमेळ्याचा अनुभव अगदी उत्साहाने अनुभवला. यामध्ये, शेवपुरी, पाणीपुरी, मोमोज, मोजीतो पेय, रगडा चॅट, चायनीज भेळ, शेजवान कॉर्न, चटपटे कॉर्न, भेल, ओरिओ शेक, थंडपेय, कॉर्न चॅट, लेज चॅट, पिझ्झा, नूडल्स, कपकेक अशा विविध स्वादिष्ट पदार्थांचे स्टॉल लावण्यात आले होते. तसेच विद्यार्थ्यांसाठी विविध खेळही ठेवण्यात आले होते. जसे की, गाढवाला शेपटी काढणे, बाटलीत चेंडू घालणे, ग्लास मध्ये नाणे घालणे, रिंगचा खेळ अशा खेळांचाही विद्यार्थ्यांनी मनसोक्त आनंद लुटला. अशाप्रकारे, स्टेपिंग स्टोन ग्लोबल स्कूलमध्ये आजचा बालदिन मोठ्या जल्लोषात साजरा करण्यात आला. तसेच उद्या दिनाक १५ नोव्हेंबर २०२४ रोजी गुरुनानक जयंती असून प्रशालेस सुट्टी असल्याकारणाने आज विद्यार्थ्यांंना शालेय सहा. शिक्षिका कु. सुझैन शेख यांनी गुरुनानक यांच्याविषयी माहिती सांगितली. या कार्यक्रमाचे आयोजन शालेय समन्वयक सौ. सुषमा पालव यांनी केले. तसेच, कार्यक्रमाच्या शेवटी शाळेचे संस्थापक श्री. रुजुल पाटणकर व मुख्याध्यापिका सौ. प्राची साळगावकर यांनी प्रशालेतील सर्व शिक्षक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी कार्यक्रमात उत्तमरित्या सहभाग घेतल्यामुळे त्यांचे कौतुक केले व सर्व विद्यार्थ्यांना बालदिनाच्या शुभेच्छा दिल्या.