करोडोची उलाढाल असणारा माणूस आपल्या गुजरात मधील मेहसाणा जिल्ह्यातील विस नगर तालुक्यातील समर्थ डायमंड कंपनीमध्ये कंपनीचे कामकाज बंद ठेवून लोकांचे जीवन समृद्ध करणाऱ्या जीवन विद्या ह्या सात दिवसाच्या शिबिराचे आयोजन करतो .या शिबिराला संपूर्ण भारतातून सुमारे पाचशेच्या जवळपास शिबिरार्थी येतात. या शिबिरार्थीचे आगमनापासून तर प्रस्थानापर्यंत सर्व नियोजन जो माणूस स्वतः पुढाकार घेऊन करतो. त्या माणसाचे नाव आहे दशरथभाई पटेल. गुजरात मधील मेहसाणा जिल्ह्यातील वीसनगर या तालुक्याच्या गावी त्यांची समर्थ डायमंड नावाची हिऱ्याची निर्मिती करणारी कंपनी आहे. पण हा माणूस खऱ्या अर्थाने डायमंड आहे. आपल्या ४००० कर्मचाऱ्यांच्या भल्यासाठी झिजणारा आहे. आपल्या कर्मचाऱ्यांचे मानसिक आरोग्य सकारात्मक राहावे यासाठी नियमितपणे कर्मचारी वर्गाचे प्रशिक्षण घडवून आणणारा आहे .
प्रशिक्षण शिबिरे घडवून आणणारा आहे. हे काम त्यांनी सातत्याने सुरू ठेवलेले आहे. सुरुवातीला त्यांनी वेगवेगळ्या प्रशिक्षकांना बोलावले. नंतर मात्र त्यांचा अमरकंटक येथील श्री नागराजन यांच्या जीवनविद्या या प्रणालीवर विश्वास बसला. माणसाचे मन खऱ्या अर्थाने शुद्ध करणारी ही प्रणाली आहे. सुरुवातीला त्यांनी जीवन विद्याचे प्रयोग आपल्या परिवारावर केले. तिथे त्यांना अनुकूल परिस्थिती दिसल्यानंतर त्यांनी आपल्या कर्मचाऱ्यांसाठी दर आठवड्याला दीड तासाची गोष्टी म्हणजे चर्चा एकमेकांच्या सुखदुःखाची आपसात शेअर करण्यासाठी आयोजित केली. त्याचा इतका चांगला परिणाम झाला की त्यांच्या कर्मचाऱ्यावर सकारात्मक बदल घडून आलेला दिसला.
या समाजाचे आपण काहीतरी देणे लागतो आपण डायमंड फॅक्टरीच्या मार्फत भरपूर पैसे मिळवले. पण ज्या समाजात आपण राहतो त्या समाजासाठी काहीतरी केले पाहिजे आणि ते राष्ट्रीय स्तरावर केले पाहिजे हे त्यांना पटले. जीवन विद्याचे सगळे प्रशिक्षक दशरथभाईच्या मदतीला आले आणि गेल्या काही वर्षापासून समृद्ध समर्थ डायमंडमध्ये एक दिवसाचे शिबिर तीन दिवसाचे शिबिर सात दिवसांचे शिबिर अध्ययन वर्ग दीड दीड तासाच्या गोष्टी सातत्याने व्हायला लागल्या. आणि त्याचे अनुकूल परिणाम देखील दशरथभाईंना जाणवायला लागले
हा माणूस साधा सरळ पायजमा शर्ट घालणारा माणूस.त्यांना पहा. त्यानंतर हा माणूस डायमंड फॅक्टरीचा मालक आहे याच्यावर कोणाचा विश्वासच बसणार नाही. थोडाही अहंकार त्यांच्या मनामध्ये नाही. एवढ्या मोठ्या फॅक्टरीचा मालक सभागृहात येतो. तो स्टेजवर बसत नाही. तो खुर्चीवर बसत नाही. तर सरळ प्रेक्षकांमध्ये सतरंजीवर जाऊन बसतो. केवढा हा साधेपणा आणि या साधेपणातूनच त्यांनी जीवनाचा समतोल साधला आहे. खऱ्या अर्थाने त्यांना जीवन गवसले आहे .नाहीतर आपल्याकडे थोडीफार कमाई केली की अहंकार वाढतो आणि हा अहंकारच मग माणसाचा बळी घेतो. दशरथभाई कोणाशीही बोलतात .चर्चा करतात. चर्चामध्ये येऊन बसतात .पण त्यांची भूमिका ही एकण्याची असते. इतरांची ऐकून घ्यावे आणि मग आपली काही मते त्यांना सांगावी असे त्यांचे एकंदर आयोजन आहे.
फॅक्टरीचा पूर्ण परिसर पंचतारांकित आहे. सभागृह पाहण्यासारखे आहे .500 लोक एका वेळेस जेवण करायला बसू शकतील एवढा मोठा डायनिंग हॉल आहे. प्रत्येक ठिकाणी व्यवस्थित पाट्या लावलेल्या आहेत. त्यांचे कर्मचारी देखील तुमचे अगदी दशरथ बाईच्या थाटातच तुमचे स्वागत करताना दिसतात. धावपळ नाही .कुठेही गैरसोय नाही. जिकडे तिकडे स्वच्छता स्वच्छताच तुम्हाला दिसेल. विशेष म्हणजे यावेळेस जीवन विद्या शिबिरासाठी संपूर्ण भारतातून पाचशेच्या जवळपास शिबिरार्थी आले. शिबिरामध्ये एका वर्षाच्या मुलापासून तर 90 वर्षांच्या म्हाताऱ्यापर्यंत समावेश आहे. लहान मुले मोठ्या लोकांना प्रशिक्षणाचा आनंद घेऊ देणार नाहीत हे ध्यानात घेऊन दशरथभाईंनी मुलांसाठी त्यांच्या मनोरजनासाठी एक टीम तयार केली. मुलांना वेगवेगळे गाणे शिकवने .त्यांच्याकडून वेगवेगळे खेळ करून घेने. इकडे मोठ्या लोकांचे प्रशिक्षण सुरू आहे आणि तिकडे लहान मुलांचे मनोरंजनाचे तसेच क्रीडा प्रकाराचे मनोरंजन सुरू आहे.
जीवन विद्या च्या शिबिरामध्ये सहा वाजल्यानंतर गोष्टी नावाचा हा चर्चात्मक कार्यक्रम असतो. गोष्टी म्हणजे त्या गटातील लोकांनी एकत्र यावे. दिवसभरात जे शिकवण्यात आले आहे. त्यावर साधक बाधक चर्चा करावी .त्यासाठी एक सव्वा तासाचा वेळ दिलेला असतो. पाचशेच्या जवळपास लोक आल्यामुळे त्यांचे एकंदर 21 गट पाडण्यात आले. 21 गटासाठी दशरथभाईंनी आपली पूर्ण फॅक्टरीज मोकळी करून दिली. 21 गटासाठी 21 दालने पाहिजेत .त्यासाठी त्यांनी आपल्या सगळ्या संचालक मंडळाचे केबिन डायरेक्ट प्रत्येक गटांच्या हवाली केले. या केबिनमध्ये तुम्हाला कुठेही कुलूप दिसणार नाही. केबिनमध्ये पुस्तके आहेत .कागदपत्र आहेत. पेन आहेत .सर्व वस्तू आहेत. दशरथ भाईंना जाणीव आहे ही विशिष्ट ध्येय ठरवून ही माणसे आलेली आहेत. त्यामुळे हे इथल्या टाचणीलाही हात लावणार नाहीत.
दशरथभाईचा उद्योग संपूर्ण भारतामध्ये आणि परदेशामध्ये पसरलेला आहे. ते खऱ्या अर्थाने डायमंडचे व्यापारी आहेत .पण जीवन विद्या शिबिराची अंमलबजावणी आपल्या कर्मचाऱ्यांसाठी आपल्या नातेवाईकांसाठी तसेच आपल्या भारतातील विविध प्रांतातील लोकांसाठी करून दशरथभाइनी खऱ्या अर्थाने समर्थ डायमंडची दारे लोकांसाठी मोकळी करून दिलेली आहेत .हा खरं तर त्यांच्या मनाचा मोठेपणा आहे .अशा मोठ्या मनाची माणसे जर समाजामध्ये असली तर समाजातील लोकांची मने स्वच्छ व्हायला वेळ लागणार नाही. त्यासाठी दशरथ भाईंनी मनापासून पुढाकार घेतलेला आहे आणि खऱ्या अर्थाने लोकांचे मने स्वच्छ करणारा हा माणूस खऱ्या अर्थाने डायमंड मॅन आहे असेच म्हणावे लागेल. अशा या दिलदार मन स्वच्छ असलेल्या लोकांसाठी काहीतरी चांगले करू इच्छिणाऱ्या दशरथभाईना समाजकार्यसाठी मनापासून शुभेच्छा…!
प्रा. डॉ. नरेशचंद्र काठोळे
संचालक मिशन आयएएस
अमरावती कॅम्प
9890967003