अपक्ष उमेदवार अर्चना घारे परब यांचा सवाल..
सावंतवाडी :
लोकसंख्येच्या मानाने सिंधुदुर्ग हा तसा छोटा जिल्हा. सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या निर्मिती पूर्वी सावंतवाडीचे सुपूञ स्व. माईसाहेब सावंत हे अखंड रत्नागिरी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष असताना काही प्रमाणात सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणेकडे त्यांनी लक्ष दिले होते. राज्यांचे आरोग्य मंत्री म्हणून काम करण्याची संधी मिळाली तेव्हा स्व. भाईनी सिंधुदुर्ग जिल्ह्यात आणि विशेषतः सावंतवाडी तालुक्यात अनेक प्राथमिक आरोग्य केंद्राना मंजुरी दिली त्यानंतर मात्र आरोग्य यंत्रणेच्या विस्तारीकरणासाठी वा नव्याने काही मंजूरीसाठी विशेष प्रयत्न झालेले दिसत नाहीत. काही नव्याने निर्माण झाले असले तरी त्या ठिकाणी अत्यावश्यक आरोग्य सुविधांचा पूर्णपणे अभाव आहे.
सावंतवाडी शहराच्या सभोवताली तालुक्यातील अनेक गावं जोडलेली आहेत तसेच सावंतवाडी शहरातही अल्प उत्पन्न असलेली अनेक कुटुंबे राहतात मात्र सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात आवश्यक डॉक्टर, कर्मचारी वर्ग तसेच आवश्यक औषधही मिळत नाही ही तक्रार सर्वश्रुत आहे. याच्या पेक्षा वेगळी परिस्थिती दोडामार्ग व वेंगुर्ला नाही.
जे सधन आहेत ते खाजगी दवाखान्यात उपचार घेतात किंवा गोवा, बेळगाव, कोल्हापूर येथे जातात मात्र ज्यांची आर्थिक परिस्थिती नाही त्यांना उपचारा अभावी आपला जीव गमवावा लागतो.
मल्टीस्पेशालीटीचं गाजर आपण गेली अनेक वर्षे लोकप्रतिनिधींनी कडून ऐकत आहोत. अगदी अनेकदा पञकार परिषदा झाल्या. दोन वेळा भूमीपुजनही झाल.. आता घोषणा करणारे चौथ्यांदा निवडणूक लढवत आहेत. मल्टीस्पेशालीटी होईल तेव्हा होईल पण जे उपजिल्हा रुग्णालय आहे किंवा सावंतवाडी, दोडामार्ग व वेंगुर्ला या तालुक्यात असलेली प्राथमिक आरोग्यसेवा सक्षम करण्यासाठी गेल्या पंधरा वर्षात मोठ्या विश्वासाने जनतेने निवडून दिलेल्या लोकप्रतिनिधी काय प्रयत्न केले ? ते नुसते पंधरा वर्षे आमदार नव्हते तर साडेसात वर्षे मंञीपद भोगलयं. सावंतवाडी शहरातील उपजिल्हा रुग्णालय असो वा ग्रामीण भागातील शासकीय प्राथमिक आरोग्य केंद्र असो. ही सगळी आरोग्य यंत्रणा व्हेंटीलेटरवर असून लोकप्रतिनिधींनी या जनतेला अत्यावश्यक असलेला सेवेकडे मुळीच लक्ष दिलेलं नाही.
आपण मागील अनेक वर्षे गावागावात जावून प्रत्यक्ष पाहत आहे. सावंतवाडी विधानसभा मतदारसंघातील आरोग्य व्यवस्था व्हेंटीलेटरवर आहे. भविष्यात शासन, सामाजिक संस्था आणि लोकसहभागातून या आरोग्य यंत्रणेकडे प्राधान्याने लक्ष देवून ती सक्षम करण्यासाठी मी कटिबद्ध आहे. अशा प्रकाराच्या भावना अपक्ष उमेदवार अर्चना घारे परब यांनी व्यक्त केल्या.