*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्माननीय सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री प्रा सौ सुमती पवार लिखित अप्रतिम काव्यरचना*
*अंधार सारा संपू द्या…*
तेलवाती उजळतां अंधार सारा संपू द्या
देवतांनो मानवाला छानसे वरदान द्या…
धर्मपंथ जाती भेद का उपाधी मानवा
माणूस आहे एक सारा हीच फक्त बुद्धी द्या..
लेकरे सारी तुझी रे रूधीर आहे सारखे
माणुसकीला सांग देवा का रे होतो पारखे?
सत्संग लाभो सद्गुणांचा छंद लागो रे तुझा
बंधुभावाचीच व्हावी फक्त येथे स्मारके…
द्वंद्व सारे नष्ट होवो माणसाला जागवा
स्वच्छ सारी व्हावी देवा येथली रे ही हवा
प्रेम द्यावे प्रेम घ्यावे उपचार व्हावा रोजचा
सौख्य हीच होऊ देरे मानवाला ही “दवा”…
एकता नि बंधुता ही रोज व्हावी प्रार्थना
वरदान द्यावे कल्याणकारी मागतो दयाघना
माणसाने माणसाला माणूस म्हणूनी वागवा
हित सारे मागतो रे विश्वव्यापी या जना….
प्रा.सौ.सुमती पवार नाशिक
(९७६३६०५६४२)