*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्माननीय सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री अरुणा दुद्दलवार लिखित अप्रतिम काव्यरचना*
*दिवाळीनंतर…*
दिवाळीनंतर….
फटाक्यांच्या चिंधड्या
राॅकेट आले भुईवर
विझलेल्या फुलझड्या
पसरल्या कोपराभर
दिवाळीनंतर….
क्षीण दीपमाळा
आकाश कंदील हेलकावला
रांगोळीतील रंग विस्कटत चालला…..
दिवाळीनंतर….
फराळाचे डबे
मोठ्यातून छोटे झाले
गोल चकलीचे तुकडे उरले…
दिवाळीनंतर….
चिवडा तळाला
साखर खसखस तीळ
उरली केवळ डब्यात चवीला…
दिवाळीनंतर….
अख्खा लाडू
कुठं शोधून मिळेना
खायचा उरलासुरला वेचून बेदाणा….
दिवाळीनंतर…
जरीकाठाच्या साड्या
कपाटात पुन्हा जातात
सोन्याचे दागिन्यांची रवानगी कुलुपात….
दिवाळीनंतर
लेकी सासरी
निघता नातवंड मुलंसुना
होतो घराचा चेहरा
उदासवाणा…..
दिवाळीनंतर
पूर्वीसारखं घर
मनही रिकामं शांत
उरतो वेळ पुन्हा निवांत….!!
〰️〰️〰️〰️〰️〰️〰️
अरुणा दुद्दलवार @✍️